पुणे : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी उद्या मंगळवारी (दि. २१) निवडणूक होत असून अध्यक्षपदासाठी बारामतीतून विश्वास देवकाते, जुन्नरमधून पांडुरंग पवार हे प्रमुख दावेदार समजले जात आहेत. असे असले तरी अजित पवार यांचे धक्कातंत्र पाहता अध्यक्ष कोण होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पाच जण अध्यक्षपदासाठी इच्छुक असून यात तीन महिलांचा समावेश आहे. मात्र महिलांना देणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. विश्वास देवकाते, पांडुरंग पवार यांच्यापैैकी एकाला संधी मिळण्याची
शक्यता आहे.
दरम्यान, अध्यक्ष व उपाध्यक्षपद हे अडीच वर्षांसाठीच असणार असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. सव्वा, सव्वा वर्षासाठी पदे देणार असल्याची
चर्चा होती.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ७५ जागांपैकी ४४ जागा मिळून राष्ट्रवादी काँगे्रसने एकहाती सत्ता मिळविली आहे. त्यामुळे
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी, विविध समित्यांच्या ४ सभापतिपदी राष्ट्रवादी काँगे्रसचेच सदस्य निवडून येणार, हे निश्चित आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुढील अडीच वर्षांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षित आहे. सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्यावर अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व विजयी उमेदवारांशी चर्चा केली. अध्यक्ष, उपाध्यक्षसह चारही सभापतिपदांसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेतल्या.
मुलाखती झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे पत्रकारांशी बोलले. अध्यक्षपद हे मूळ मागास वर्गातीलच सदस्यांना देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांनी अध्यक्षपासाठी पाच व उपाध्यक्षदासाठी सहा जण इच्छुक असल्याचे सांगितले. अध्यक्षपदासाठी पांडुरंग पवार, विश्वास देवकाते, वैैशाली पाटील, सुचिता गावडे, कुसुम मांढरे व उपाध्यक्षपदासाठी वीरधवल जगदाळे, प्रवीण माने, विवेक वळसे-पाटील, शंकर मांडेकर, दिलीप घुले, सुजाता पवार इच्छुक आहेत.
असे असले तरी जर अध्यक्षपद हे बारामतीला दिले तर उपाध्यक्षपद हे आंबेगावला जाण्याची शक्यता आहे. अध्यक्षपद हे जुन्नरला गेले तर उपाध्यक्षपद हे बारामतीला मिळण्याची शक्यता आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्षपद आपल्याला मिळावे, यासाठी उमेदवारांनी जोरदार अगोदरपासूनच मोर्चेबांधणी केली होती. आजही समर्थकांनी चांगलीच गर्दी केली होती.
अजित पवार यांनी निवडणुकीच्या सुरुवातीलाच तालुक्यात पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील, त्यांनाच अध्यक्षपद दिले जाईल, असे स्पष्ट केले होते. यानुसार बारामती तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व जागा राष्ट्रवादीने मिळवल्या आहेत. त्यामुळे बारामती तालुक्याचा अध्यक्षपदावर दावा असून विश्वास देवकाते यांचे नाव चर्चेत आहे. मुलाखतीनंतर पत्रकारांनी त्यांना छेडले असता, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे सांगत, अध्यक्षपद मला मिळेल की नाही हे माहीत नाही, मात्र बारामतीला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते राजुरी-बेल्हा गटातून निवडून आलेले पांडुरंग पवार यांचे नावही चर्चेत आहे. पवार यापूर्वी दोन वेळा जिल्हा परिषदेवर निवडून आले असून, उपाध्यक्ष म्हणून कामदेखील केले आहे. त्यांनी आपण पक्षाकडे मागणी केल्याचे सांगितले.
त्याचप्रमाणे इंदापूरच्या वैशाली पाटील यांनी अध्यक्षपदाची मागणी केली आहे. मुलाखतीदरम्यान बांधकाम समितीचा वरिष्ठांनी उल्लेख केला असता, माझी अध्यक्षपदाची मागणी असल्याचे ठामपणे सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.
मंगळवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांची निवडणूक होऊन नवीन सभागृह अस्तित्वात येईल. त्यानंतर सभापती पदांसाठी निवडणूक होईल. (प्रतिनिधी)