Deterioration of food-related work-its death | वणवा विझवताना भाजलेल्या वनकर्मचा-याचा मृत्यू  

भोर : आपटी (ता. भोर) येथील वनजमिनीत लागलेला वणवा विझवताना ७५ टक्के भाजलेले भोर वन विभागाचे कर्मचारी सदाशिव त्रिंबकअप्पा नागठाणे (वय ४५, रा. भोर, मूळ मु. पो. गौर, ता. पूर्णा, जि. परभणी) यांचा उपचार सुरू असताना रुग्णालयात मुत्यू झाला. वणवा विझवण्यासाठी १० वनरक्षक, १ वनपाल आणि २२ वनमजूर काम करीत होते. त्यात सदाशिव नागठाणे हे होते. मात्र, कोणतीही साधनसामग्री नसल्याने झाडांच्या पानांनी आग आटोक्यात येत नव्हती. अचानक आग वाढल्याने नागठाणे यांच्या अंगावर लोळ आला आणि त्यात ते ७० टक्के भाजले होते. तर, होनराव यांनी या वेळी खड्ड्यात उडी मारल्याने त्यांचा पाठीचा कणा भाजला होता; मात्र ते बचावले. आपला सहकारी आगीत जळत आहे, हे पहिल्यावर होनराव यांनीने कोणताही विचार
न करता नागठाणे यांना आगीतून बाहेर काढले. ६०० फूट डोंगरावरून खाली आणले. बाकीच्या सहकाºयांना पोहोचायला अर्धा तास उशीर झाला. त्यानंतर रोडवर आल्यावर गाडी मिळायला वेळ गेला. तेथून भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले; मात्र ७५ टक्के भाजल्याने त्यांना खेड-शिवापूर येथील खासगी दवाखान्यात नेले. दि. २९ डिसेंबर रोजी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहा दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, आज दुपारी ४ वाजता उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सदाशिव नागठाणे ४ वर्षांपूर्वी अंशकालीन कर्मचारी म्हणून भोर वन विभागात कामाला लागले होते. त्यांना ७ वर्षांचा मुलगा व ५ वर्षांची मुलगी आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, वन विभागाकडून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

सुरक्षित साधने नाहीत
अचानक वणवा लागला, तर वन विभागाकडे कोणतीही साधनसामग्री नसल्याने झाडांचा पाला काढून आग विझवावी लागते. हे अनेकदा जिवावर बेतते. त्यामुळे वन कर्मचाºयांना साधनसामग्री देणे गरजेचे आहे; अन्यथा त्यांना जीव धोक्यात घालावा लागतो. याचा वन विभागाने विचार करायला हवा.