डेंगीची चाचणी १५ मिनिटांत करणे शक्य; डॉ. नवीन खन्ना यांच्याकडून लस, औषधाचे संशोधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:00 PM2017-11-18T12:00:26+5:302017-11-18T12:45:14+5:30

डेंगीच्या आजाराचे निदान केवळ १५ मिनिटांत करणे शक्य असणारे ‘डेंगी डे वन टेस्ट किट’ डॉ. नवीन खन्ना यांनी तयार केले आहे. घरीच वापरता येऊ शकणारे किटही बनविले असून, लवकरच डेंगीप्रतिबंधक लस आणि औषधे बाजारात येणार आहेत. 

Dengue can be tested in 15 minutes; Dr. New Khanna Research, Vaccine, medicine Research | डेंगीची चाचणी १५ मिनिटांत करणे शक्य; डॉ. नवीन खन्ना यांच्याकडून लस, औषधाचे संशोधन 

डेंगीची चाचणी १५ मिनिटांत करणे शक्य; डॉ. नवीन खन्ना यांच्याकडून लस, औषधाचे संशोधन 

Next
ठळक मुद्दे डॉ. नवीन खन्ना यांनी तयार केले ‘डेंगी डे वन टेस्ट किट’एकदा डेंगी झाल्यावर पुन्हादेखील उद्भवू शकतो. दुसऱ्यांदा झालेला डेंगी जास्त अपायकारकप्लेटलेट्स कमी झाल्यावर घाबरु नये, ४८ तास चांगल्या पद्धतीने उपचार व्हावे : डॉ. खन्ना

पुणे : पुण्यासह संपूर्ण देशात थैमान घालत असलेल्या डेंगीच्या आजाराचे निदान केवळ १५ मिनिटांत करणे शक्य असणारे ‘डेंगी डे वन टेस्ट किट’ डॉ. नवीन खन्ना यांनी तयार केले आहे.  त्याचबरोबर लहान मुलांचे निदान करता येणारी, घरीच वापरता येऊ शकणारे किटही बनविले असून, लवकरच डेंगीप्रतिबंधक लस आणि औषधे बाजारात येणार आहेत. 
डॉ. नवीन खन्ना यांना शुक्रवारी ‘अंजनी माशेलकर इन्क्ल्यूजिव्ह इनोव्हेशन पुरस्कार’ या वेळी प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने पुण्यात आले असताना ‘लोकमत’शी बोलताना खन्ना म्हणाले, ‘‘डेंगीच्या उपचारासाठी लवकरात लवकर निदान होणे आवश्यक असते. त्यादृष्टीने ही टेस्ट तयार केली आहे. अ‍ॅँटीजेन आणि अ‍ॅँटीबॉडी या दोन्ही प्रकारच्या टेस्ट या किटद्वारे होऊ शकतात. यापूर्वी देशात अमेरिका, आॅस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियातून येणारी किट वापरली जायची. परंतु, त्याची किंमत जास्त असल्याने हे किट तयार केले आहे. या टेस्टमध्ये रुग्णाच्या डेंगीचा इतिहासच समजणार आहे. डेंगी चार प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. त्यामुळे एकदा डेंगी झाल्यावर पुन्हादेखील उद्भवू शकतो. दुसऱ्यांदा झालेला डेंगी जास्त अपायकारक असतो. या किटद्वारे झालेल्या चाचणीत पूर्वी कधी झालेला डेंगीही समजणार असल्याने उपचार करणे सुलभ होणार आहे. लहान मुलांसाठी घरच्या घरी चाचणी करता येऊ शकेल अशी डेंगी फिंकर प्रिक नावाच्या किटमध्ये ग्लुकोमीटरप्रमाणे ही चाचणी करता येते. त्यासाठी स्ट्रिपवर रुग्णाचे दोन थेंब रक्त टाकावे लागते.’’
डॉ. खन्ना म्हणाले, ‘‘डेंगीमध्ये प्लेटलेट्स कमी झाल्यावर लोकांनी घाबरण्याची गरज नाही. केवळ ४८ तास चांगल्या पद्धतीने उपचार झाले पाहिजेत. डेंगीमध्ये डिहायड्रेशन होते आणि रक्त घट्ट होते. त्यामुळे हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. रक्तदाब नेहमीपेक्षा कमी ठेवण्याची दक्षता घ्यावी. रुग्णाने दिवसातून  ३ लिटर पाणी प्यावे.’’
डेंगीची तपासणीची किट पूर्वी आयात व्हायची. परंतु, भारतामध्ये डेंगीचे प्रमाण खूप जास्त आहे. २०१३ मध्ये किट कमी पडल्यानंतर डॉ. खन्ना यांनी विकसित केलेल्या किटचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. शासनाकडूनही त्याची खरेदी सुरू झाली. त्याची किंमतही कमी असल्याने आता परदेशी किट वापरलीच जात नसल्याचे डॉ. खन्ना यांनी सांगितले.

 

डॉ. अब्दुल कलाम यांच्याकडून प्रेरणा
डॉ. नवीन खन्ना गेल्या २६ वर्षांपासून नवी दिल्लीतील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग या संस्थेत कार्यरत आहेत. डॉ. कलाम राष्ट्रपती असताना त्यांनी एकदा डॉ. खन्ना यांना फोन केला.
भारतीय लष्करातील जवानांना डेंगीचा खूप त्रास होतो. त्यामुळे संशोधन करण्यास सांगितले. त्यानंतर डॉ. खन्ना यांनी संशोधन सुरू केले. कमी वेळेत निदान होणाऱ्या किटबरोबरच लस आणि औषधेही लवकरच बाजारात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
डेंगीचा डास हा केवळ २०० मीटरपर्यंत फिरू शकतो. स्वच्छ पाण्यामध्ये त्याची पैदास होते. यामुळे प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखून आपला परिसर स्वच्छ ठेवायला हवा. पाणी साठणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असे डॉ. खन्ना यांनी सांगितले. किटद्वारे डासांमध्येही डेंगीचे वाहक आहेत का याची तपासणी करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर डेंगीचा ताप 'प्रायमरी' आहे की 'सेकंडरी' हे देखील उपचारासाठी महत्त्वाचे असते. ते या चाचणीतून कळते, असे ते म्हणाले. 

Web Title: Dengue can be tested in 15 minutes; Dr. New Khanna Research, Vaccine, medicine Research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.