ठळक मुद्देजवळपास ८६ टक्के चलन रद्द करणार्‍या निश्चिलनीकरणाला आज एक वर्ष पूर्ण‘तुमको ना भूल पायेंगे’ असे म्हणत ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटांना श्रद्धांजली

पुणे : ‘नोटाबंदीग्रस्त प्यारे देशवासियों’, ‘नव्या नोटांची प्रथम पुण्यतिथी’, ‘नोटाबंदी-हत्याकांड की आत्महत्या?’, ‘मोदींनी १०० दिवस मागितले होते, आम्ही ३६५ दिवस दिले आता काय?’, ‘८ नोव्हेंबर २०१७ला नवी नोटाबंदी’, ‘८ नोव्हेंबर २०१७ ला महावितरणने भारनियमन घोषित करावे’, ‘नोटाबंदी-वर्षातील सर्वांत मोठा विनोद’ अशा प्रकारच्या पोस्ट आणि मेसेजना सध्या सोशल मीडियावर उधाण आले आहे. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त सोशल मीडियावर सकारात्मक आणि नकारात्मक पोस्टचे पेव फुटले आहे. वर्षपूर्तीनिमित्त नोटाबंदीचे जोरदार ट्रोलिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. 
८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक आदी सोशल मीडियांवर लाखो मेसेज, पोस्ट आणि जोक्सचा पाऊस पडला होता. व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व ग्रुपवर संकेदाला एक या वेगाने पोस्ट फिरत होत्या. या पोस्टमधून लोकांचा खूप गोंधळ उडालेला दिसत होता. हा गोंधळ कमी झाल्यानंतर मात्र व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर या निर्णयावर जोक्स मोठया प्रमाणात सुरुवात झाली होती. त्यानंतर वर्षभरामध्ये सामान्यांना नोटाबंदीच्या अनेक परिणामांना सामोरे जावे लागले. जवळपास ८६ टक्के चलन रद्द करणार्‍या निश्चिलनीकरणाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षपूर्तीनिमित्तही सोशल मीडियावर विविध प्रकारच्या पोस्टना उधाण आले आहे. ‘तुमको ना भूल पायेंगे’ असे म्हणत ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. आपले शोकाकुल असे म्हणत १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटा शोकाकुल अशा विविध मेसेज इनबॉक्समध्ये विराजमान झाले आहेत.

 

मोदीभक्त आणि मोदीविरोधक यांच्यामध्ये सोशल मीडियावर चांगलीच जुंपली आहे.  

  • काळ्या पैशांना मिळाली तिलांजली 
  • मोदींच्या धाडसाचे अभिनंदन
  • वंदे मातरम्, राष्ट्रगीताने नोटाबंदीची वर्षपूर्ती होणार साजरी 
  • अँटी ब्लॅक मनी डे  
  • अर्थव्यवस्थेची डिजिटल क्रांती 
  • अशा मेसेजमधून मोदींच्या नोटाबंदी निर्णयाच्या समर्थनार्थ पोस्टही मोठ्या प्रमाणात फिरत आहेत.