मार्केटमध्ये सुरक्षा रक्षकांकडून बेकायदेशीर वसूली, कंत्राटदारावर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 10:08 PM2018-03-04T22:08:16+5:302018-03-04T22:08:16+5:30

महाराष्ट्रासह परराज्यातून गुलटेकडी येथील मार्केट यार्डात शेतीमाल घेवून येणा-या वाहन चालकांकडून बाजारातील प्रवेशासाठी सुरक्षा रक्षकाकडून बेकायदेशीरपणे पैसे घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बाजार समितीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

Demand for illegal recovery from security guard, action against contractor in the market | मार्केटमध्ये सुरक्षा रक्षकांकडून बेकायदेशीर वसूली, कंत्राटदारावर कारवाईची मागणी

मार्केटमध्ये सुरक्षा रक्षकांकडून बेकायदेशीर वसूली, कंत्राटदारावर कारवाईची मागणी

Next
ठळक मुद्दे मार्केट यार्ड परिसरातील वाहतुक कोंडीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे.संबंधित ठेकेदाराकडून घडलेल्या घटनेचा लेखी खुलासा मागविण्यात आला आहे

पुणे: महाराष्ट्रासह परराज्यातून गुलटेकडी येथील मार्केट यार्डात शेतीमाल घेवून येणा-या वाहन चालकांकडून बाजारातील प्रवेशासाठी सुरक्षा रक्षकाकडून बेकायदेशीरपणे पैसे घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बाजार समितीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.सुरक्षा रक्षक पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्याला काढून टाकले आहे.मात्र,केवळ सुरक्षा रक्षकाला काढून प्रश्न सुटणार नाही तर कंत्राटदारावर कारवाई करावी,अशी मागणी केली जात आहे.
राज्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी येथील मार्केट यार्डात पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातून व परराज्यातून मोठ्या प्रमाणात शेतमाल येतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने खासगी कंत्राटदाराला सुरक्षा व्यवस्थेचे काम देण्यात आले आहे.एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर शेतमालाची आवक झाल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात.त्याचप्रमाणे  परराज्यातून शेतमाल घेऊ आलेली वाहने पुन्हा शेतमाल घेऊन जातात. मार्केट यार्ड परिसरातील वाहतुक कोंडीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे. परंतु, वाहतुक कोंडी सोडविण्यात बाजार समिती पूर्णपणे अपयशी ठरली आहे.त्यात सुरक्षेसाठी नियुक्त केलेले खासगी सुरक्षारक्षकच शेतीमाल घेवून येणा-या वाहनचालकांची लुट करत आहेत. शेतमालाची भरलेली वाहने आणि रिकामी वाहने आत-बाहेर सोडण्यासाठी सुरक्षारक्षक पैसे घेत आहे. काही दिवसांपूर्वी त्यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला होता. शेतक-यांच्या मालाला कमी भाव मिळत असताना वाहनचालकांकडूनही होणा-या लुटीचा भार शेतक-यांनाच सोसावा लागत आहे.त्यामुळे  बाजार समिती केवळ शेतक-यांची लुट करण्यासाठी स्थापन झाली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
 बाजार आवारात सुरक्षा पुरविण्याचे काम एका खासगी कंपनीला दिली आहे. वाहन चालकांकडून पैसे घेण्याचा प्रकार घडला त्याच दिवशी संबंधित सुरक्षारक्षकाला काढून टाकण्यात आले.तसेच संबंधित ठेकेदाराकडून घडलेल्या घटनेचा लेखी खुलासा मागविण्यात आला आहे,असे बाजार समितीच्या पदाधिका-यांकडून सांगितले जात आहे.
-------------------------------------------------------------
मार्केट यार्डाच्या सुरक्षेसाठी दरमहा 30 लाख रुपये खर्च केले जातात. मात्र,सुरक्षा करणारेच शेतकरी व वाहनचालकांना लुटत असतील तर ते बेकायदेशीर आहे. केवळ शेतमाल घेवून येणा-या वाहनांकडून पैसे घेणा-या सुरक्षारक्षाकाला काढून टाकल्यामुळे प्रश्न सुटणार नाही.तर असे प्रकार कोणाच्या संगनमताने सुरू आहेत,हे समोर आले पाहिजे.त्यासाठी कंत्राटदाराची चौकशी करून कारवाई करावी,अशी मागणी बाजार समिती प्रशासक मंडळाचे संचालक दादासाहेब घाटे यांनी केली आहे.

Web Title: Demand for illegal recovery from security guard, action against contractor in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.