Maratha Reservation: कायदा हातात घेऊन बसेस जाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार- दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 10:43 PM2018-07-31T22:43:31+5:302018-07-31T22:44:03+5:30

मराठा मोर्चाच्या कोणत्याही आयोजकांवर किंवा निरपराध व्यक्तींवर गुन्हे दाखल होणार नाहीत, मात्र चाकणमधील कालच्या आंदोलनात ज्यांनी कायदा हातात घेतला

Deepak Kesarkar will take legal action against those who burn the buses in law | Maratha Reservation: कायदा हातात घेऊन बसेस जाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार- दीपक केसरकर

Maratha Reservation: कायदा हातात घेऊन बसेस जाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार- दीपक केसरकर

googlenewsNext

चाकण : मराठा मोर्चाच्या कोणत्याही आयोजकांवर किंवा निरपराध व्यक्तींवर गुन्हे दाखल होणार नाहीत, मात्र चाकणमधील कालच्या आंदोलनात ज्यांनी कायदा हातात घेतला. ज्यांनी बसेस जाळल्या त्या दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांना त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी चाकण येथे केले.

येथील पोलीस ठाण्यात त्यांनी खेड तालुक्यातील मराठा मोर्चातील आयोजकांची संवाद साधला. ते म्हणाले, चाकणला औद्योगिक केंद्र म्हणून समजले जाते. हा मोर्चा नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे म्हणून सुरू झाला. त्यानिमित्ताने समाजबांधव रस्त्यावर आले. त्यांची मागणी योग्य असल्याने त्यांना पाठिंबा आहे. चाकणसारखं गाव दोन ते अडीच लाख लोकांना नोकऱ्या देत असतं. इथे शांतता राहावी, इथे ज्या वेगवेगळ्या परदेशी गुंतवणूक आहेत, त्याच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार मिळतो, ते फार महत्त्वाचे आहे आणि म्हणून पिंपरी-चिंचवडला नवीन आयुक्तालय स्थापन होत आहे. आपला चाकणचा परिसर त्या आयुक्तालयाचा भाग होत आहे. त्यानंतर अधिकचा पोलीस फोर्स आपल्याला उपलब्ध होणार आहे. आज मनं जुळवण्याची गरज आहे.

ते पुढे म्हणाले, मराठा समाजाचे वैशिष्ट्य आहे की लाखोंचे मोर्चे निघाले, त्यात कुठलाही हिंसाचार झाला नाही, साधा एक दगडही उचलला गेला नाही. कारण मराठा समाज महाराष्ट्राला अनेक वर्षे राजकीय नेतृत्व देत आहे आणि त्यामुळे सर्व मोर्चे शांततेत निघाले. समाजातील दुर्लक्षित वर्गाला आरक्षण देण्याची व शैक्षणिक आरक्षण देण्याची गरज आहे आणि खरी गरज आहे. ज्या मोठ्या योजना आहेत त्यात विशेषतः शिष्यवृत्तीची गरज आहे. अनेक मुलं डॉक्टर, वकील, इंजिनीअर होत असताना त्यांची पन्नास टक्के फी शासन भरणार आहे. या योजना जाहीर केल्यानंतर समाजापर्यंत पोहोचतात की नाही हेसुद्धा बघितले गेले पाहिजे, यासाठी शिक्षणमंत्र्यांनी बैठक घेतली आहे.

अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की आण्णासाहेब महामंडळाकडे जावे लागते, तुम्ही कुठल्याही बँकेकडे जाऊन आपण या समाजाचे आहे म्हणून अर्ज करावा व त्याची सबसिडी अण्णासाहेब महामंडळाकडून मिळण्याचे शासनाने जाहीर केले आहे. ती आपल्या तरुणांना मिळू शकते. चाकणसारख्या गावात अनेक तरुण उद्योजक बनू शकतात. या पुढील काळात स्वयंरोजगाराचा कार्यक्रम राबविण्यात येईल.

ते म्हणाले, आपण जरी सांगत असाल की हे लोक बाहेरचे होते, तर आपली पण जबादारी आहे की, हे लोक कोण होते, मी तुम्हाला आवाहन करतो की, आपल्यापैकी कोणत्याही पदाधिकाऱ्यांवर, कार्यकर्त्यांवर खटले दाखल होणार नाहीत. परंतु ज्या लोकांनी हे भीतीचं वातावरण निर्माण केलं, ही लोक तुम्हाला दाखवायला लागतील. फोटो व सीसीटीव्ही फुटेजवरून माणसे ओळखायची आहेत. कोणताही भाडेकरू ठेवायचा असेल तर त्याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. येथील इंडस्ट्रीज व परदेशी उद्योजकांना दिलासा देण्याची गरज आहे.

नाही तर त्यांच्यामध्ये परदेशात आपल्या बद्दल काय प्रतिमा जाईल हे पहिले पाहिजे व नवीन उद्योग येतील की नाही याचा विचार केला पाहिजे. पोलिसांसोबत स्थानिक नागरिकांनी ग्रुप बनवून हे लोक बाहेर हुसकावून लावले हे कौतुकास्पद आहे. आमदार सुरेश गोरे यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या वेळी प्रांताधिकारी आयुष्य प्रसाद, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त अधीक्षक तेजस्विनी सातपुते आणि मोर्चाचे आयोजक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Deepak Kesarkar will take legal action against those who burn the buses in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.