प्रशासन पडतंय कामाला कमी - भाजपाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 06:36 AM2018-02-21T06:36:10+5:302018-02-21T06:36:14+5:30

महापालिकेतील सत्ता मिळण्याला बरोबर वर्ष होत असताना भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी प्रशासनावर कामाला कमी पडत असल्याचा आरोप केला आहे

Decrease in governance - BJP claims | प्रशासन पडतंय कामाला कमी - भाजपाचा दावा

प्रशासन पडतंय कामाला कमी - भाजपाचा दावा

googlenewsNext

पुणे : महापालिकेतील सत्ता मिळण्याला बरोबर वर्ष होत असताना भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी प्रशासनावर कामाला कमी पडत असल्याचा आरोप केला आहे. आम्ही मात्र ८० टक्के चांगले काम केले आहे, असा दावा केला. प्रशासनाच्या चुकीमुळे डिपॉझिट म्हणून बँकेत जाणारे सुमारे १५० कोटी रुपये आम्ही विविध कामांसाठी वर्ग करून घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
वर्षपूर्तीनिमित्त पक्ष कार्यालयात घेतलेल्या बैठकीत गोगावले यांनी अनेक दावे केले. पक्षाने निवडणुकीआधी प्रभागनिहाय तसेच शहराचा म्हणून जाहीरनामा काढला होता. तो अमलात आणला जातो आहे.
नगरसेवकांनी करायच्या कामांसाठी म्हणून पक्षाच्या नगरसेवकांना मागील आर्थिक वर्षात ६०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. त्यातील ५०० कोटी रूपयांची कामे सुरू आहेत. उर्वरित १०० कोटी रूपये पीएमपीएलच्या बसखरेदीसाठी वर्ग करून देणार आहोत, असे गोगावले म्हणाले.
याशिवाय महापालिकेत कामाचा खर्च किती असेल ते निश्चित केले जाते व नंतर अंदाजपत्रकात ते नमूद केले जाते. तो खर्च मग दुसरीकडे कुठे करता येत नाही. त्यानंतर निविदा काढली जाते. अनेकदा या निविदा निश्चित केलेल्या रकमेपेक्षा कमी दराने येतात. असे मागील वर्षात तब्बल १५० कोटी रूपये वाचले असल्याचा दावा गोगावले यांनी केला. त्यातील १०० कोटी रूपये पुन्हा पीएमपीएलला बसखरेदीसाठी, २५ कोटी रूपये नियोजित शिवसृष्टीसाठी राखीव व २५ कोटी रुपये राज्य सरकारचा वृक्षारोपण कार्यक्रम शहरात राबवण्यासाठी वर्ग करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सत्तेच्या वर्षभरात पायाभूत सुविधांची कामे करण्याबरोबर २४ तास पाणी, स्मार्ट सिटी, ११ गावांचा महापालिकेत समावेश, चांदणी चौक उड्डाणपुलाची प्रक्रिया सुरू करणे, सायकल आराखडा, बीआरटी रचनेचा फेरआराखडा, कचरा व्यवस्थापन अशा अनेक मोठ्या कामांना सुरूवात केली आहे.
निवडणुकीआधी नागरिकांना त्यांच्या प्रभागात काय हवे त्याच्या सूचना मागवल्या होत्या. नगरसेवक त्यानुसार कामे करीत आहेत, असा दावाही गोगावले यांनी केला. येत्या आर्थिक वर्षात क्रीडांगणे, योग केंद्र, सांस्कृतिक कला केंद्र, अग्निशमन केंद्र, इ-लर्निंग स्कूल, महिला स्वच्छतागृह तसेच सॅनिटरी नॅपकिनबाबत जनजागृती या कामांना प्राधान्य देणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Decrease in governance - BJP claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.