पुणे : गुंतवणूकदार फसवणूकप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डीएसके यांना एका आठवड्याचा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे.  एक आठवड्यात सर्व व्यवहार पूर्ण करता आले तर पहा, नाही तर ठोस प्रपोजल घेऊन जामिनासाठी या, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

बांधकाम व्यावसायिक डीएसके यांनी पुणे विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी बुधवारी तो फेटाळला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती यांच्या वतीने अ‍ॅड. श्रीकांत शिवदे, अ‍ॅड. गिरीष कुलकर्णी व अ‍ॅड. सुशीलकुमार पिसे यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर प्रत्येकी १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आज (शुक्रवार, दि. १० नोव्हेंबर) या प्रकरणी न्यायालयाने डीएसके यांना एका आठवड्याचा अंतरिम जामिन मंजूर केला.