डी. एस. के. विरोधात ठेवीदारांच्या तक्रारींचा ओघ, एसआयटी स्थापून चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 10:49 PM2017-11-01T22:49:33+5:302017-11-01T22:50:43+5:30

पुणे पोलिसांनी ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलिसांकडे तक्रार देणा-या ठेवीदारांचा ओघ सुरू झाला आहे.

D. S. K. Demand for filing of complaints against the Depositors' Complaints, SIT | डी. एस. के. विरोधात ठेवीदारांच्या तक्रारींचा ओघ, एसआयटी स्थापून चौकशीची मागणी

डी. एस. के. विरोधात ठेवीदारांच्या तक्रारींचा ओघ, एसआयटी स्थापून चौकशीची मागणी

Next

पुणे : पुणे पोलिसांनी ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलिसांकडे तक्रार देणा-या ठेवीदारांचा ओघ सुरू झाला आहे. बुधवारी तब्बल २५८ जणांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे दिली आहे. 

आतापर्यंत पोलिसांकडे आलेल्या तक्रारीतील रकमेची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून, ती किमान १० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. ठेवीदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असून, त्यात एसआयटी स्थापन करून डीएसके यांच्या सर्व कंपन्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गेल्या एक महिन्याभरापासून डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात सर्वप्रथम शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठेवीदारांनी फसवणुकीच्या तक्रारी देण्यास सुरुवात केली होती. या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्या. आर्थिक गुन्हे शाखेने या अर्जदारांचे जबाब नोंदविल्यानंतर २८ आॅक्टोबर रोजी डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर तक्रारींचा ओघ वाढला आहे. मंगळवारपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडे एकूण ४४ तक्रारी आल्या होत्या. त्यात फसवणूक झालेली रक्कम ४ कोटी ७८ लाख रुपये इतकी होती.

आर्थिक गुन्हे शाखेच्या संगम पुलाजवळील कार्यालयात डी. एस. के. उद्योगसमूहाविरोधात तक्रार देणा-या ठेवीदारांची बुधवारी सकाळपासून गर्दी झाली होती. अहमदनगर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई अशा विविध शहरांतून ठेवीदार आले होते. त्यातील बहुसंख्य हे ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी होते. त्यांनी आपल्याला मिळालेले फंड व अन्य पैसे डी. एस. के. उद्योगसमूहात गुंतविले आहेत. त्यातील बहुसंख्य लोकांना गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मुद्दल अथवा व्याजही मिळालेले नव्हते. अहमदनगरहून आलेल्या एका दाम्पत्याने सांगितले की, आम्ही आमची सर्व पुंजी ४० लाख रुपये २००४ मध्ये गुंतविली आहे. त्याचे व्याज गेल्या २ वर्षांपर्यंत मिळत होते. पण त्यानंतर मिळणे बंद झाले. अनेक वेळा पैसे परत मागितले, पण केवळ देऊ देऊ असे आश्वासन दिले जात होते. शेवटी आता आम्ही पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

पुण्यातील एक आजीही येथे आल्या होत्या. त्यांनी सांगितले की, मी ७ लाख रुपये गुंतविले आहेत. त्यावरील व्याज हेच म्हातारपणातला आधार होता. पण आता व्याजही मिळणे बंद झाले. मुद्दल मिळाली तरी खुप झाले असे आता वाटते. या प्रकरणी काही गुंतवणूकदारांनी एकत्र येत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की डी. एस. कुलकर्णी यांनी घरकुल लॉन्समध्ये बोलविलेल्या बैठकीत आम्हाला त्यांच्या विविध कंपन्यांमधील मुदत ठेवीची माहिती दिली. त्यावरून आम्ही मुदत ठेवी ठेवल्या. आता ठेवींची मुदत संपण्याच्या वेळी आम्हाला माहिती देण्यात आली की त्यांना मुद्दलाची रक्कम आणि त्यावरील व्याज परत देणे शक्य नाही. त्यामुळे आम्हाला पुढील तारीख घातलेले धनादेश स्वीकारणे भाग पडले. 

अनेकांशी चर्चा केल्यावर असे लक्षात आले की, डी. एस. कुलकर्णी व इतरांनी आम्हा गुंतवणूकदारांच्या समोर असे चित्र उभे केले की, त्यांना मुदत ठेवी स्वीकारण्याचा अधिकार आहे. त्यांना अधिकार नसतानाही त्यांनी आम्हाला आमिष दाखवले आणि हजारो गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रमाणात मुदत ठेव रकमा गोळा केल्या आणि आम्हाला फसवले आहे. स्वतंत्र एसआयटी स्थापन करून डीएसके कुटुंबाची व त्यांच्या सर्व कंपन्यांची आणि संचालकांची योग्य ती चौकशी करण्यात यावी.  आम्ही सर्व गुंतवणूकदार हे मध्यमवर्गीय असून ९० टक्के हे ज्येष्ठ नागरिक आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी त्यांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे,  असे त्यात म्हटले आहे.

Web Title: D. S. K. Demand for filing of complaints against the Depositors' Complaints, SIT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.