सायकल मार्गात अडथळ्यांची शर्यत !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 04:25 AM2018-08-22T04:25:03+5:302018-08-22T04:25:33+5:30

सायकल मार्गांचे अस्तित्वच धोक्यात : खड्डे, पार्किंग, भाजीविक्रेते, राडारोडा, पथारी व्यावसायिकांचे अतिक्रमण

Cycle road hurdles race! | सायकल मार्गात अडथळ्यांची शर्यत !

सायकल मार्गात अडथळ्यांची शर्यत !

- सुषमा नेहरकर-शिंदे 

पुणे : ‘सायकलींचे शहर’ म्हणून असलेली ओळख परत मिळविण्यासाठी गेल्या आठ-दहा वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात मोठ्या प्रमाणात सायकल मार्ग बांधण्यात आले. परंतु, सध्या या सायकल मार्गांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले असून जागोजागी पडलेले खड्डे, रिक्षा, दुचाकी पार्किंग, भाजी विक्रेत्यांकडून ठिकठिकाणी अतिक्रमण करून व्यापलेले सायकल मार्ग, महापालिकेच्या वतीने पदपथाचे काम करताना टाकलेला राडारोडा, लहान-मोठ्या टपऱ्या, टूव्हीलर सर्व्हिस सेंटर असे एक ना अनेक प्रकारचे अडथळे सध्या शहरातील सर्वच सायकल मार्गांवर झाल्याचे ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीमध्ये निदर्शनास आले.

स्मार्ट सिटी व पुणे महापालिकेच्या वतीने शहरामध्ये ‘पब्लिक बायसिकल’ योजना सुरू करण्यात आली असून, त्याअतंर्गत सध्या शहरामध्ये हजारो सायकली विविध खासगी कंपन्यांनी नाममात्र भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु, सध्या शहरातील प्रचंड वाहतूककोंडी आणि अस्तित्वात असलेल्या सायकल मार्गांची झालेली प्रचंड दुरवस्था यांमुळे पुणेकरांकडून या सायकल योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, ‘लोकमत’च्या वतीने शहरातील काही सायकल मार्गांची पाहणी केली असता वरील वस्तुस्थिती समोर आली.
शहरात जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत सन २००९नंतर मोठ्या प्रमाणात सायकल मार्ग बांधण्यात आले. सध्या शहरातील प्रमुख १४ ते १५ रस्त्यांवर सुमारे ५७ किलोमीटरचे सायकल मार्ग अस्तित्वात आहेत. हे सायकल मार्ग करण्यासाठी महापालिकेने १० ते १५ कोटी रुपयांचा खर्च केला आहे.

या १४-१५ रस्त्यांवर गेल्या १० वर्षांत रस्त्यांची विविध कामे करण्यात आली आहेत. काही ठिकाणी पूल बांधण्यात आले, काही ठिकाणी भुयारी मार्ग तर काही ठिकाणी नव्याने करण्यात आलेले पदपथ, बीआरटी मार्ग यांमध्येदेखील अनेक सायकल मार्गांचे अस्तित्व नष्ट झाले आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेले बहुतेक सर्व मार्ग विविध अडथळ्यांमुळे बंद पडले असल्याची वस्तुस्थिती आहे.

‘सायकल धोरण’ कागदावरच
महापालिकेच्या वतीने तब्बल एक कोटी रुपये खर्च करून एका खासगी कंपनीकडून शहराचे ‘सायकल धोरण’ तयार करून घेण्यात आले. या धोरणात सध्या अस्तित्वात असलेल्या सायकल मार्गांची दुरुस्ती करून बंद पडलेले मार्ग वापराखाली आणणे, नव्याने उत्तम सायकल ट्रॅक तयार करणे, रस्त्यावर स्वतंत्र सायकल लेन आखणे, सायकल पार्कसाठी जागा उपलब्ध करून देणे आदी विविध कामांचा सामावेश आहे. यासाठी धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या सन २०१८-१९च्या अंदाजपत्रकामध्ये ५५ कोटी रुपयांची तरतूददेखील केली आहे. परंतु, सध्या तरी सायकल धोरण कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अतिक्रमण, बंद पडलेले व दुरवस्था झालेले मार्ग
सिंहगड रस्ता, पौड रस्ता ते चांदणी चौक, कर्वे रस्ता-पौड फाटा, पुणे स्टेशन ते फित्झगेराल्ड पूल, गणेशखिंड रस्ता-संचेती रुग्णालय रस्ता, संगमवाडी पूल ते सादलबाबा चौक, येरवडा, बॉम्बे सॅपर्स, विश्रांतवाडी, डेक्कन कॉलेज ते बॉम्बे सॅपर्स, हॉटेल ग्रीन पार्क ते बालेवाडी, नगर रस्ता-खराडी नाला आदी विविध मार्ग बंद पडले आहेत.

सायकलसाठी प्रचंड काम करावे लागणार
पुण्याची खूप वर्षांपूर्वी असलेली ‘सायकलींचं शहर’ ही प्रतिमा निर्माण करण्यासाठी प्रचंड काम करावे लागेल. यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण शहरात सायकल ट्रॅक, सायकल लेन तयार करणे, प्रत्यक्ष सायकली उपलब्ध करून देणे, नियमांची कडक अंमलबजावणी करणे आणि नागरिकांची मानसिकता बदलणे, असे विविध पातळीवर एकाच वेळी प्रचंड काम करावे लागले.
-राजेंद्र जगताप, स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी

Web Title: Cycle road hurdles race!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.