बँकांमध्ये हवी तज्ज्ञ सायबर सल्लागारांची नियुक्ती - नितीन पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 01:32 AM2018-08-15T01:32:39+5:302018-08-15T01:32:46+5:30

वाढत्या मोबाईल, इंटरनेटच्या आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे अत्यंत गोपनीय माहितीची नागरिकांकडून देवाण-घेवाण केली जात आहे. त्याचाच फायदा घेऊन आयटी क्षेत्रातील गुन्हेगार बँकेमधील रक्कम चोरत आहेत.

Cyber ​​advisor to be appointed expert in banks - Nitin Patil | बँकांमध्ये हवी तज्ज्ञ सायबर सल्लागारांची नियुक्ती - नितीन पाटील

बँकांमध्ये हवी तज्ज्ञ सायबर सल्लागारांची नियुक्ती - नितीन पाटील

वाढत्या मोबाईल, इंटरनेटच्या आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे अत्यंत गोपनीय माहितीची नागरिकांकडून देवाण-घेवाण केली जात आहे. त्याचाच फायदा घेऊन आयटी क्षेत्रातील गुन्हेगार बँकेमधील रक्कम चोरत आहेत. त्यामुळे बँकांनीच नाही तर बँकेच्या सर्व खातेदारांनीसुद्धा जागृत राहिले पाहिजे. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे बँकेतील पैैसे सुरक्षित राहावेत यासाठी बँकांनी तज्ज्ञ सायबर सल्लागारांची तत्काळ नियुक्ती करणे गरजेचे आहे, असे सायबर क्राईमचे अभ्यासक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागातील प्रा. नितीन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

कॉसमॉस बँकेचे ९४ कोटींहून अधिक रक्कम आॅनलाईन पद्धतीने दुसऱ्या खात्यात जमा करणे हॅकर्सला सहज शक्य झाले. त्यामुळे बँकेने सायबर सुरक्षेबाबत पाहिजे तेवढी काळजी घेतली नसल्याचे समोर येते. त्यामुळे कॉसमॉस बँकेसह देशभरातील सर्व बँकांनी या घटनेतून धडा घेण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे आपल्या सर्व्हरमधील माहिती चोरीला जाणार नाही, तसेच त्याचा कोणीही दुरुपयोग करणार नाही यासाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे, असे नितीन पाटील यांनी सांगितले.
बँकेच्या सर्व्हरमधील डेटा चोरून तो दुसºया सर्व्हरवर घेऊन त्यातून बँकेच्या विविध खात्यांतील रक्कम काढली जाऊ शकते. त्यामुळे खातेदाराला बँकेच्या खात्यातून रक्कम काढण्यात आली आहे याबाबतचे एसएमएस मोबाईलवर जात नाहीत. तसेच ई-मेलवर यासंदर्भातील मेलही जात नाहीत. त्याचप्रमाणे बँकेची एसएमएस पाठविण्याची सिस्टीमसुद्धा हॅक केली जाऊ शकते, असे नमूद करून पाटील म्हणाले, कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यात नेमक्या कोणत्या पद्धतीचा वापर करण्यात आला हे लवकरच समोर येईल. बँकेच्या सिस्टीममध्ये एखादा व्हायरस गेल्यामुळेसुद्धा सायबर हल्ला होऊ शकतो.
कॉसमॉस बँक ही मोठी बँक असल्याने त्यांनी सायबर सुरक्षेच्या दृष्टीने काही तपासण्या केल्या असतील. मात्र, अशी एखादी तपासणी करण्याची राहून गेली असवी की ज्या पद्धतीचा अवलंब करून सायबर क्षेत्रातील गुन्हेगारांनी आॅनलाईन पद्धतीने हजारो खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे ट्रॅन्जेक्शन केले असावे, असेही पाटील यांनी नमूद केले.
बँकेवरच सायबर हल्ला होतो असे नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यामधूनही पैैसे काढून घेतल्याच्या घटना देशभरात पाहायला मिळतात. आधारकार्ड व मोबाईल क्रमांक बँक खात्यांशी जोडण्यात आले आहेत. त्यामुळे इंटरनेटद्वारे त्रयस्थ खात्यावरून ई-मेल पाठविले जातात. त्यात बँक व्यवहाराशी निगडित माहिती मागविली जाते. मात्र, नागरिकांनी ई-मेलद्वारे कोणालाही आपल्या खात्याची माहिती देऊ नये. तसेच कोणत्याही व्यक्तीने मोबाईलवर फोन करून ओटीपी क्रमांक किंवा तुमच्या एटीएम कार्डचा पासवर्ड विचारला तर तो कोणालाही देऊ नये. बँकांकडून तसेच शासनाकडून याबाबत जागृती केली जाते. मात्र, तरीही फसवणूक होत असल्याच्या घटना वृत्तपत्रांमध्ये वाचायला मिळतात. त्यामुळे नागरिकांनी यातून बोध घेण्याची आवश्यकता आहे, असेही पाटील म्हणाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सर्व विद्यार्थ्यांसाठी चार क्रेडिटचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागाने हा अभ्यासक्रम पाच ते सहा वर्षांपूर्वीच सुरू केला होता. त्याचप्रमाणे विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागाने ‘क्विक हिल’बरोबर करार करून ‘एमटेक नेटवर्क सिक्युरिटी’ हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यामुळे सायबर सिक्युरिटीबाबत आवश्यक असलेले मनुष्यबळ तयार केले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आॅनलाईन बँक व्यवहार करताना काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच बँकिंग व्यवहाराबाबत प्रत्येकाने सज्ञान होणे गरजेचे आहे.
आॅनलाईन पद्धतीने डाटा चोरून त्यातून गैैरव्यवहार केला जातो. तो स्नूपिंग किंवा स्पूफिंग पद्धतीने केला जाऊ शकतो. सायबर सिक्युरिटी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, बँकांनी तज्ज्ञ सल्लागारांच्या मदतीने आपली यंत्रणा सक्षम आहे किंवा नाही याबाबत तपासणी करावी. तसेच वेळोवेळी अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून आपल्या सिस्टीममध्ये कोणत्याही प्रकारचा व्हायरस प्रवेश करणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच एखाद्या खातेदाराच्या खात्यातून अचानक रक्कम कमी झाल्यास संबंधितांनी बँकेला याबाबत तत्काळ माहिती देणे आवश्यक आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

Web Title: Cyber ​​advisor to be appointed expert in banks - Nitin Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.