- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : काही खासगी कोचिंग क्लास व महाविद्यालयांमध्ये झालेल्या छुप्या करारांमुळे अकरावी प्रवेशाचे कटआॅफ फसवे असण्याची शक्यता आहे. या करारानुसार काही महाविद्यालयांकडून ठराविक क्लासशी संबंधित चांगले गुण असलेल्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रक्रियेतून विज्ञान शाखेत प्रवेश मिळवून दिला जातो. त्यामुळे तुलनेने चांगल्या सोयीसुविधा नसलेल्या या महाविद्यालयांचे ‘कटआॅफ’ आपोआपच वाढत असल्याचे चित्र आहे. तसेच या वर्षी काढण्यात येणाऱ्या माहिती पुस्तिकेमध्ये मागील वर्षीच्या दुसऱ्या प्रवेश फेरीतील कटआॅफ दिले जाणार आहेत. त्यामुळे कटआॅफ पाहून पसंतीक्रम दर्शविल्याने विद्यार्थ्यांची फसगत होण्याची शक्यता अधिक आहे.
केंद्रीय प्रवेश समितीमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने पार पाडली जाते. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना आॅनलाईन महाविद्यालयांचे पसंतीक्रम दर्शविणे बंधनकारक आहे. हे क्रम ठरविताना अनेक विद्यार्थी संबंधित महाविद्यालयाचे मागील वर्षीचे कटआॅफ पाहून निर्णय घेतात. माहिती पुस्तिकेमध्ये हे कटआॅफ दिले जातात. त्यानुसार विद्यार्थी या कटआॅफचा आधार घेत पसंतीक्रमामध्ये संबंधित महाविद्यालयाचे नाव वरच्या क्रमांकावर टाकतात. मात्र, प्रत्यक्षात काही महाविद्यालयांत कटआॅफच्या तुलनेत दर्जेदार सुविधा, शिक्षक उपलब्ध नसल्याचे आढळून येते. याबाबत मागील वर्षी काही विद्यार्थ्यांनीही तक्रारी केल्या होत्या. हेच चित्र किंबहुना त्याहून अधिक तक्रारी यंदा वाढण्याची शक्यता आहे.

कोचिंग क्लास-महाविद्यालयांमध्ये छुपा करार
शहरातील काही कोचिंग क्लास व विज्ञान शाखा असलेल्या महाविद्यालयांमध्ये छुप्या करारांमध्ये वाढ झाल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आले आहे. या करारानुसार क्लासमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांत प्रवेश मिळवून दिला जातो. यातील बहुतेक विद्यार्थी ७५ ते ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले असतात. प्रवेश मिळाल्यानंतर या विद्यार्थ्यांना वर्गात उपस्थित राहण्यासाठी सशुल्क सवलत दिली जाते. या सवलतीमुळे महाविद्यालयांचे कटआॅफही वाढते. मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या या करारांमुळे यंदाही विद्यार्थ्यांची कटआॅफमुळे फसगत होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या माहिती पुस्तिकेमध्ये महाविद्यालयांसमोर देण्यात येणारे कटआॅफ मागील वर्षीच्या प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे दिले जाणार आहेत. मागील वर्षी पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी एक बेटरमेंटची संधी देण्यात आली होती. त्यामुळे माहिती पुस्तिकेत दुसऱ्या फेरीतील कटआॅफ देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारणांमुळे कटआॅफ पाहून संबंधित महाविद्यालयात प्रवेशासाठी पसंती दर्शविणे विद्यार्थ्यांना महागात पडू शकते.

कटआॅफ केवळ मार्गदर्शक
माहिती पुस्तिकेमध्ये देण्यात येणारे कटआॅफ मागील वर्षीच्या प्रवेशप्रक्रियेतील दुसऱ्या फेरीचे असतील. हे कटआॅफ केवळ मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदविताना संबंधित महाविद्यालयाची माहिती घेणे आवश्यक आहे. महाविद्यालयातील सोयीसुविधा, शिक्षक, अध्यापन, घरापासून महाविद्यालयाचे अंतर अशा गोष्टींची माहिती घेऊनच पसंतीक्रम देणे अपेक्षित आहे.- मीनाक्षी राऊत, विभागीय सहायक शिक्षण संचालिका