Current governance anti reforms and transformation: Dr. Yashwant Manohar; Samyak Sahitya Sammelan in Pune | आताचे शासन सुधारणा व परिवर्तनविरोधी : डॉ. यशवंत मनोहर; पुण्यात सम्यक साहित्य संमेलन

ठळक मुद्देफुले, शाहू, आंबेडकर ही फक्त नावे नाहीत तर देशाचे भवितव्य : यशवंत मनोहरविचार हेच आपले भांडवल आहे, हे लक्षात ठेवणे आवश्यक : के. इनोक

पुणे : इंग्रजी शासन सामाजिक सुधारणांच्या आणि परिवर्तनाच्या बाजूंनी होते. आज संपूर्ण देशातील चित्र वेगळे आहे. शासन आणि धर्म एकत्र येऊन सुधारणांच्या विरोधात लढत आहे. याला प्रतिकार करण्यासाठी आपल्याकडे संविधान हे शस्त्र आहे. हे शस्त्र टिकविण्यासाठी सर्व परिवर्तनवादी लोकांनी एकत्र यायला हवे. एकत्र येत नसल्याने आपण बुद्धीवादी असूनही दुबळे आहोत. कवी आणि लेखकांनी संविधान डोक्यात घेऊन निर्भय आणि निर्भिड लिखाण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन  ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व स्टडीज सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंंदिर (संविधान नगरी) येथे आयोजित केलेले सहाव्या सम्यक साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणात डॉ. मनोहर बोलत होते. विचारपीठावर  संमेलनाचे उद्घाटक डॉ. के. इनोक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. दिनानाथ मनोहर, डॉ. विजय खरे, मुख्य संयोजक परशुराम वाडेकर उपस्थित होते. 
डॉ.  मनोहर म्हणाले, 'फुले, शाहू, आंबेडकर ही फक्त नावे नाहीत तर देशाचे भवितव्य आहेत. आपण संविधानाचे बोट धरून पुढे जाणारे आणि अन्याय अत्याचाराविरोधात लढणारे लोक आहोत, हे विसरता कामा नये. आपण आपल्या शब्दाची व्याख्या करताना त्याला जाती धमार्ची नाही तर मानवतेची जोड देणे गरजेचे आहे. चुकूनही आपले मन आणि वागण्यात  जात, धर्म, येता कामा नये. आपण आपल्या भवती सिमा, चौकट घालून घेऊ नयेत.'
साधारणत: १९६०नंतर राज्यात नवजागृत गटांचे साहित्य प्रवाह तयार झाले आहेत. यातून दलित, स्त्री, आदिवासी असे विविध साहित्य प्रवाह तयार झाले. या सर्व प्रवाहापासून आपले संविधान निर्माण झाले. राज्यात परिवर्तनवादी आणि परंपरावादी असे दोन साहित्य प्रवाह आहेत. विविध साहित्य प्रवाह एक कुटुंब आहे. भारतीय संस्कृती आणि संविधान यांच्यात कोणताही भेद नाही. प्रत्येक गोष्टीची चर्चा करून किस पाडत बसू नका, क्रांतीची मशाल हाती घ्या. तरच देशात वाढणाऱ्या अराजकतेला आपण प्रतिकार करू. आरएसएसला आणि भाजपला मदत होईल, असे आपले वागणे असू नये. आपल्यातले जे लोक त्यांच्या हाती लागले आहेत, त्यांना परत आपल्यात आणणे गरजेचे आहे, असे डॉ. मनोहर म्हणाले.
के. इनोक म्हणाले, की आंबेडकरांना अपेक्षीत असलेल्या विचारांचा परामर्श सर्वांनी घेणे गरजेचे आहे. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात दलित संघटना कार्यरत आहेत. विचार हेच आपले भांडवल आहे, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपले भविष्य विचारच घडवू शकतो.
डॉ.  कसबे म्हणाले, 'आज देश आपली कुस बदलून अराजकतेकडे वाटचाल करत आहे. देशातील ८० टक्के लोक अस्पृश्यतेच्या पातळीवर येऊन आरक्षणाची मागणी करत आहेत. जातीचा अहंकार वाढवणारे लोक आज निराधार झाले आहेत. सत्तर वर्षात आपण फक्त राजकीय लोकशाही आणली. सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आणलीच नाही. देशातील प्रत्येक तरूणांच्या हाताला काम मिळाले नाही, तर देशात असंतोष माजेल. हेच सत्ताधाऱ्यांना अभिप्रेत आहे. अराजकतेतून राज्यघटना नष्ट करण्याचे षडयंत्र रचले जात असून दोन समाजात वाद निर्माण केले जात आहेत. हे होऊ न देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. दलितेत्तर लोक आज आंबेडकरवादी होत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. कोरेगाव भीमा येथे भगव्या आतंकवादाचे दर्शन झाले. हा आतंकवाद थोपविण्यासाठी समविचारी समाज एकत्र येणे गरजेचे आहे.
संमेलनाचे उद्घाटन बोधी वृक्षास मान्यवरांच्या हस्ते जल अर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले. प्रास्ताविक डॉ. विजय खरे यांनी तर आभार परशुराम वाडेकर यांनी मानले.