दागिने पॉलिशच्या बहाण्याने गंडा, महिलांच्या टोळीक डून ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:01 AM2018-07-09T01:01:06+5:302018-07-09T01:01:27+5:30

काटेवाडी येथे अनोळखी महिला व युवतीनी बक्षिसाचे आमिष दाखवून परिसरातील अनेक महिलांना गंडा घातला आहे. काटेवाडी येथे मागील चार ते पाच दिवसांपासून चार महिला व एक युवती दोन गट करून जुन्या भांड्यांवर नवीन भांडी देणार, असा प्रसार करीत होत्या.

Crime News | दागिने पॉलिशच्या बहाण्याने गंडा, महिलांच्या टोळीक डून ऐवज लंपास

दागिने पॉलिशच्या बहाण्याने गंडा, महिलांच्या टोळीक डून ऐवज लंपास

googlenewsNext

काटेवाडी - येथे अनोळखी महिला व युवतीनी बक्षिसाचे आमिष दाखवून परिसरातील अनेक महिलांना गंडा घातला आहे. काटेवाडी येथे मागील चार ते पाच दिवसांपासून चार महिला व एक युवती दोन गट करून जुन्या भांड्यांवर नवीन भांडी देणार, असा प्रसार करीत होत्या. गावात फिरून महिलांना या संधीचा लाभ घेण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.
या आमिषाला काही महिला बळी पडल्या. मात्र, अनवधानाने झालेला गलथानपणा इतरांसमोर आणायला नको, या भावनेतून लूट होऊनदेखील काही महिलांनी तोंडावर बोट ठेवणे पसंत केले आहे. काटेवाडी शेजारच्या सणसर गावात दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारचे आमिष दाखवून महिलांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची तक्रार पोलिसांत दाखल आहे. त्यामुुळे काटेवाडीसह बारामती तालुक्यात या महिलांच्या टोळीने लूट केल्याची चर्चा आहे.
लूट करण्यासाठी काटेवाडी येथे सुरुवातीला टोळीतील महिलांनी भोळ्या भाबड्या व अशिक्षित महिलांना हेरले. त्या महिलांच्या घरी पुुुरुषमंडळी नसल्याची खात्री केली. त्यानंतर आजूबाजूला नजर ठेवून डाव साधला. टोळीतील महिलांनी सुरुवातीला नवीन कुकर आदी भांडी बक्षीस दिली. त्यामुळे या टोळीतील महिलांच्या लुटीचा कोणाला संशय आला नाही.
टोळीतील महिला गावातील कुटुंबांकडून जुनी मोडकी भांडी घेऊन गेल्या. दुसऱ्या दिवशी नवी भांडी आणून संबंधित महिलांना दिली. यामुळे गावातील महिलांचा या अनोळखी महिलांवर विश्वास बसला. समोरील महिलांचा अंदाज घेऊन सलग दोन दिवस या अनोळखी महिलांनी जुन्या भांड्यांवर नवीन भांडी आणून दिली. उलट आमच्या कंपनीकडून तुम्हाला बक्षीस लागले आहे, असे सांगून काटेवाडीतील लोंढे कुटुंबातील महिलांची फसवणूक केली आहे.
काटेवाडीच्या लोंढे कुटुंबाने धाडसाने हा प्रकार पुढे आणला आहे. सुरुवातीला या कुटुंबाला जुनी भांडी घेऊन नवीन भांडी दिली. तसेच उलट बक्षीस लागले आहे, असे सांगून या कुटुंबाला नवीन प्रेशर कुकर दिला. अनोळखी महिलांनी लोंढे कुटुंबातील मनीषा लोंढे व संगीता लोंढे यांना विश्वासात घेतले. तुम्ही गळ्यातील मंगळसूत्र व घरातील दागिने द्या, आमची बारामती येथील कंपनी मोफत दागिने पॉलिश करून देते. बक्षीस म्हणून तुम्हाला मोठा दागिने देते, असे आमिष दाखविले. मात्र, त्या दिवशी या कुटुंबाने जुने पैंजण दिले. दुसºया दिवशी अनोळखी महिलांनी जुने पैंजण पॉलिश करून आणले. त्याबरोबर बक्षीस म्हणून नवीन पैंजणही लोंढे कुटुंबातील महिलांना दिले. अनोळखी महिलांनी परत मनीषा व संगीता यांना सोन्याचे दागिने मागितले. खरंच आम्हाला सोन्याचा दागिना बक्षीस मिळणार का, अशी विचारणा लोंढे कुटुंबीयांनी केली. यावर टोळीतील युवतीने ताई तुम्हाला पैंजण व कुकरचे बक्षीस लागले आहे, तसे मोठा दागिना बक्षीस मिळेल, असे सांगितले. लोंढे कुटुंबातील महिलांनी लहान मुलांच्या गळ्यातील बदाम, मंगळसूत्र व पायातील जोडवी आदींसह पंधरा ते वीस हजारांचे दागिने दिले. दुसºया दिवशी या अनोळखी महिला काटेवाडीत फिरकल्याच नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लोंढे कुटुंबातील महिलांच्या लक्षात आले.

 शेजारच्या गावात थांबून पोलिसांना दिली हुलकावणी

३ जुलै रोजी सणसर परिसरात अशाच प्रकारची घटना घडली आहे, तर त्यानंतरच्या तीन दिवसांत काटेवाडीत हा प्रकार घडला. सणसर येथील शेख कुटुंबीयांच्या घरी दोन महिला आल्या. त्यांनी तवे विकायचे आहेत, असे सांगून त्यांच्याशी संवाद साधला.
या महिलांनी सोने पॉलिश करण्याचे आमिष दाखविले. तसेच बक्षीस देण्याचेदेखील आमिष दाखविले. त्याला भुलून सुमारे ५ ते ६ तोळे घेऊन महिला पसार झाल्या. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल झाली. पोलिसांनी आसपास शोध घेतला असता तर आज त्या लुटारू महिलांची टोळी निश्चित गजाआड करणे शक्य होते. मात्र, शेजारच्या गावात थांबून पोलिसांना हुलकावणी देण्यात या लुटारू महिलांनी यश मिळविल्याचे वास्तव आहे.

लोंढे कुटुंबाप्रमाणे अनेकांची या अनोळखी महिलांनी फसवणूक केली आहे. यावेळी लोंढे कुटुंबातील महिलांसह इतरही शेजारच्या महिलांनी अ‍ॅल्युमिनीयमची भांडी व पैंजण दिले. शेजारच्या दुसºया महिलेलादेखील टोळीतील युवतीने गळ्यातील मंगळसूत्र मागितले. मात्र, त्यांनी आम्हाला लग्नाला जायचं आहे उद्या देते, असे सांगितले. त्यामुळे या महिलेचे दागिने वाचले. गावातील अनेक महिलांची या अनोळखी महिलांनी बक्षिसाचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. बारामती तालुक्यात या टोळीने अनेकांची फसवणूक केल्याची चर्चा आहे. हा प्रकार उघड करण्यासाठी धाडसाने पुढे येऊन तक्रार देण्याची गरज आहे.

Web Title: Crime News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.