पुजा सकट आत्महत्येप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 09:30 PM2018-04-23T21:30:29+5:302018-04-23T21:30:29+5:30

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) जवळील वाडा पुनर्वसन येथे राहणारी पूजा सुरेश सकट (वय १९ वर्षे) ही युवती २१ एप्रिल रोजी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. २२ एप्रिल रोजी पूजाचा मृतदेह वाडा पुनर्वसन येथील एका विहिरीमध्ये आढळून आला.

complaint registred against 9 person with connection Pooja suicides, two arrested | पुजा सकट आत्महत्येप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल, दोघांना अटक

पुजा सकट आत्महत्येप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल, दोघांना अटक

Next
ठळक मुद्देअंत्यसंस्काराप्रसंगी मोठा पोलीस फौजफाटा सकट कुटुंबीयांचे एक महिन्यात पुनर्वसन करणार

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे वाडा पुनर्वसन येथे राहणारी पुजा सकट ही युवती बेपत्ता झाल्याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, २२ एप्रिल रोजी पुजाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तिच्या आत्महत्येप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात सोमवारी ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर दोघांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. सकट कुटुंबीयांच्या पुनर्वसनासंदर्भात सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरूर) जवळील वाडा पुनर्वसन येथे राहणारी पूजा सुरेश सकट (वय १९ वर्षे) ही युवती २१ एप्रिल रोजी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर रात्री उशिरा पूजा बेपत्ता झाल्याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर २२ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास पूजाचा मृतदेह वाडा पुनर्वसन येथील एका विहिरीमध्ये आढळून आला. त्यानंतर काही तणाव निर्माण झाला होता. पूजाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर सकट कुटुंबीयांनी पूजाच्या आत्महत्येप्रकरणातील आरोपींना अटक व सकट कुटुंबीयांचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत पार्थिव स्वीकारणार नसल्याचा पावित्रा घेतला. दरम्यान, पोलीस अधीक्षक सुएझ हक यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी संपर्क साधला असता एक महिन्यात पुनर्वसन करणार असल्याचे आश्वासन देत फिर्यादीने दाखल केलेल्या फिर्यादीतील इसमांवर गुन्हे दाखल करण्याचीही कार्यवाही सुरू केल्याने सोमवारी सकाळी कोरेगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता. 
 दरम्यान, दिलीप नानासाहेब सकट (रा. केडगाव, जि. अहमदनगर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुरेश सकट कुटुंबीयांना घर सोडून जाण्याची व जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान, २ जानेवारी रोजी संचारबंदी लागू असतानाही त्यांचे घर, कार्यालय जाळून टाकले होते. यावेळी जयदीप सकट व पूजा सकट यांच्या डोळ्यांसमोर हा प्रकार घडला असल्याने त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतरही ११ फेब्रुवारीसही सकट यांना धमकी देण्यात आली होती. दरम्यान, २० एप्रिल रोजी रातंजन, ता. कर्जत, जि. अहमदनगर येथील यात्रा असल्याने सुरेश सकट व जयदीप सकट हे यात्रेसाठी गावी गेले असताना, दि.२१ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पूजा घरातून गायब झाली. त्यानंतर तिचा शोध घेण्यात आला. दरम्यान, दि. २२ रोजी पूजा हिचे पार्थिव रोहिदास उंद्रे यांच्या विहिरीत सापडले. यावरून पूजा हिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अ‍ॅड. सुधीर ढमढेरे, विलास श्रीधर वेदपाठक, गणेश विलास वेदपाठक, नवनाथ ज्ञानोबा दरेकर, सोमनाथ फक्कड दरेकर, विलास काळुराम दरेकर, सुभाष गणपत घावटे, गोरक्ष पाटीलबुवा थोरात, गणेश गोरक्ष थोरात त्यांच्याविरुद्ध शिक्रापूर पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३०६, ३४, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याचे २०१५ चे सुधारित कलम ३ (२) (५) नुसार गुन्हे दाखल केला असून, पुढील तपास आर्थिक गुन्हे विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाकरे हे करीत आहे, तर विलास श्रीधर वेदपाठक, गणेश विलास वेदपाठक यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: complaint registred against 9 person with connection Pooja suicides, two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.