Close tension in the upper area;be averted of government property due to police alertness | अप्परमधील बंद तणावपूर्ण शांततेत; पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळले शासकीय मालमत्तेचे नुकसान 

ठळक मुद्देपुरुष तसेच युवकांसोबत महिला व मुलीदेखील या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागीपोलिसांनी अतिशय जबाबदारीचे भान राखत परिस्थिती जाऊ दिली नाही हाताबाहेर

बिबवेवाडी : अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळख असलेल्या अप्पर-इंदिरानगर भागातील बंद तणावपूर्ण शांततेत पार पडला. काही किरकोळ घटना वगळता या बंदला कोठेही गालबोट लागले नाही.
बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अप्पर येथील डॉल्फिन चौक, महेश सोसायटी चौक सकाळी ९च्या सुमारास आंदोलकांनी बंद केला. त्यामुळे या भागात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. पुरुष तसेच युवकांसोबत महिला व मुलीदेखील या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. एक-दोन बस वर काही आंदोलकांनी दगड मारले. त्यानंतर बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी सर्व बस अप्परकडे येण्यासाठी बंदी केली. काही बसेसना बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या मागे लावण्यात आले. तर काही बस रस्त्याच्या कडेला लावण्यात आल्या. 


पोलिसांनी अतिशय जबाबदारीचे भान राखत परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही. आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणा देत भीमा-कोरेगावला घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच प्रत्येक चौकात भाजपाच्या विविध नेत्यांचे रस्त्यावर लागलेले फलक काढुन जाळण्यात आले. दुपारी ३पर्यंत अनेक चौक अडवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना प्रंचड त्रास सहन करावा लागला. भागातील सर्व दुकाने, हॉटेल, पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते. काही शाळा, दवाखाने, बँक मात्र चालु होत्या.