दहावीची पुस्तके व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल; मुंबईत गुन्हा दाखल, प्रकाशकांकडून गैरफायदा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:01 PM2018-02-01T12:01:18+5:302018-02-01T12:04:22+5:30

आगामी शैक्षणिक वर्षासाठी (२०१८-१९) बालभारतीकडून तयार करण्यात येत असलेली दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके व्हॉटस्अ‍ॅपवरून व्हायरल झाली आहेत.

Class X Books Viral on whatsapp; Filed a complaint in Mumbai | दहावीची पुस्तके व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल; मुंबईत गुन्हा दाखल, प्रकाशकांकडून गैरफायदा?

दहावीची पुस्तके व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल; मुंबईत गुन्हा दाखल, प्रकाशकांकडून गैरफायदा?

Next
ठळक मुद्देतपास सायबर शाखेकडून करण्यात येत असल्याचे बालभारती संचालक सुनील मगर यांनी केले स्पष्टबालभारतीकडून पुस्तके कधी बाजारात आणली जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष

पुणे : आगामी शैक्षणिक वर्षासाठी (२०१८-१९) बालभारतीकडून तयार करण्यात येत असलेली दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके व्हॉटस्अ‍ॅपवरून व्हायरल झाली आहेत. गाइड, व्यवसाय माला व इतर साहित्य प्रकाशित करणाऱ्या खासगी प्रकाशकांकडून याचा गैरफायदा घेतला जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. 
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाकडून इयत्ता दहावीच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारीत पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम सुरू आहे. यातील काही पुस्तके व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने याप्रकरणी मुंबईच्या दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर शाखेकडून करण्यात येत असल्याचे बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी स्पष्ट केले आहे.       
शिक्षकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर गेल्या तीन-चार दिवसांपासून इयत्ता दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाचे विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचे भाग एक व भाग दोन अशी दोन पुस्तके शिक्षकांच्या काही ग्रुपवर व्हायरल झाली होती. या पुस्तकफुटीचा सर्वाधिक गैरफायदा खासगी प्रकाशकांकडून उचलला जाण्याची शक्यता आहे. अधिकृत पुस्तके बाजारात येण्यापूर्वीच व्हाइरल झालेल्या पोस्टच्या आधारे त्यांच्याकडून पुस्तके बाजारात आणण्याची शक्यता आहे. त्याचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसू शकतो, अशी भीती शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर खासगी क्लासचालकही त्याआधारे विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये शिकविण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
बालभारतीकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. ही पुस्तकफुटी कशी झाली, याचा शोध घेण्यात येत आहे. सायबर शाखेकडून त्याचा तपास केला जात आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी स्पष्ट केले आहे.  

दहावीची पुस्तके लवकर बाजारात उपलब्ध व्हावीत
दहावी हे बोर्डाचे वर्ष असल्याने त्याची तयारी विद्यार्थ्यांकडून नववीपासूनच केली जाते. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक या सगळ्यांचे त्याकडे लक्ष लागलेले असते. त्यामुळे बालभारतीच्या दहावी अभ्यासक्रमाच्या नवीन पुस्तकांचे काम पूर्ण झाले असल्यास त्यांनी त्याबाबत गुप्तता न बाळगता ती तातडीने बाजारात उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून झालेल्या पुस्तकफुटीमुळे निर्माण झालेला संभ्रम त्यामुळे दूर होऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे बालभारतीकडून पुस्तके कधी बाजारात आणली जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Class X Books Viral on whatsapp; Filed a complaint in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.