पुणे : निवडणुकांमध्ये ईव्हीएमच्या वापराबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. तरी, लोकशाहीत आता नागरिकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी सोमवारी केले.
महापालिका निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांनी ईव्हीएम मशीनमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. त्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. ईव्हीएम मशीनविरोधातील आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्यासाठी सोमवारी इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंटच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी बी. जी. कोळसे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेसचे पदाधिकारी तेहसीन पूनावाला, माजी नगरसेवक रूपाली पाटील-ठोंबरे, बंडू केमसे, बाळासाहेब बोडके, दत्ता बहिरट, बाबू वागस्कर, विकास दांगट उपस्थित होते. ईव्हीएम मशीनविरोधात येत्या २५ मार्च रोजी भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. ईव्हीएम मशीन हटाव परिषद येत्या ११ एप्रिल रोजी भरविण्यात येणार असल्याचीही माहिती या वेळी देण्यात आली. ईव्हीएम मशीनविरोधातील आंदोलनासाठी कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. या कमिटीत ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी नावे द्यावीत, असे आवाहन या वेळी दत्ता बहिरट यांनी केले.