कुलगुरूंच्या स्वीय सहायकाच्या बहिणीची पात्रता डावलून निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 03:22 AM2019-03-23T03:22:19+5:302019-03-23T03:22:32+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंग्रजी विभागामध्ये सहायक प्राध्यापकपदी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या स्वीय सहायकाच्या बहिणीची पात्रता डावलून निवड करण्यात आल्याची लेखी तक्रार पात्रताधारक उमेदवारांनी केली आहे.

The choice of the Vice-Chancellor's sister assistant's eligibility | कुलगुरूंच्या स्वीय सहायकाच्या बहिणीची पात्रता डावलून निवड

कुलगुरूंच्या स्वीय सहायकाच्या बहिणीची पात्रता डावलून निवड

googlenewsNext

- दीपक जाधव
पुणे  - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंग्रजी विभागामध्ये सहायक प्राध्यापकपदी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या स्वीय सहायकाच्या बहिणीची पात्रता डावलून निवड करण्यात आल्याची लेखी तक्रार पात्रताधारक उमेदवारांनी केली आहे. ही निवड तात्काळ रदद् न केल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विद्यापीठातील इंग्रजी विभागात सहायक प्राध्यापक पदांच्या दोन जागांसाठी (एक वर्षाकरिता) नुकतीच भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या पदासाठी ६ मार्च रोजी मुलाखती पार पडल्या. एकूण १५ उमेदवारांनी या पदासाठी मुलाखती दिल्या. या दोन जागांवरील नियुक्या नुकत्याच जाहीर झाल्या. यातील खुल्या गटातील जागेवर निशा गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांची पीएच.डी. नसतानाही विभागातील सहायक प्राध्यापकपदी नियुक्ती करण्यात आल्याने पात्रताधारक उमेदवारांना धक्का बसला. डॉ. नितीन करमळकर यांचे स्वीय सहायक म्हणून विनोद गोसावी हे कार्यरत आहेत. त्यांच्या निशा गोसावी या बहीण आहेत, त्यामुळे वशिलीबाजीतून ही निवड झाल्याचा आरोप पात्रताधारक उमेदवार राज नेरकर, किरण मांढरे यांनी केला आहे. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे मुलाखत घेण्यासाठी उपस्थित होते, तरीही अपात्र उमेदवारांची निवड कशी झाली अशी विचारणा पात्रताधारक उमेदवारांनी केली आहे. पात्रताधारक उमेदवारांनी या निवडी विरोधात कुलगुरूंची भेट घेऊन तक्रार केली आहे. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयात सेट-नेट पात्रतेबाबत अनेक याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर निकाल देताना सहायक प्राध्यापकपदी सेट-नेट पात्र उमेदवारांची निवड करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच ३ मार्च २०१९ रोजी याबाबतचा एक महत्त्वपूर्ण निकाल दिला, असे राज नेरकर यांचे म्हणणे आहे.

वशिलेबाजीचा आरोप
इंग्रजी विभागातील सहायक प्राध्यापकपदी निवडलेल्या महिला उमेदवार पात्रता पूर्ण करीत नव्हत्या. मुलाखत स्वत: कुलगुरुंनी घेतली. संबंधित महिलेचा भाऊ कुलगुरुंच्या कार्यालयात नोकरी करीत असल्याने वशिल्याने संबंधित महिलेची निवड झाली, असा आरोप पात्रताधारक उमेदवारांनी केला आहे.

महाविद्यालयातील पदांवरही सेट-नेट पात्रताधारकच
खेडयापाडयातील महाविद्यालयातही सहायक प्राध्यापक पदासाठी सध्या सेट-नेट उत्तीर्ण उमेदवारांचीच निवड केली जाते. विद्यापीठात मात्र सेट-नेट पात्रतेचा निकष डावलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नियमानुसार प्रक्रिया पार पाडली
इंग्रजी विभागातील सहायक प्राध्यापक निवडीची प्रक्रिया ही नियमानुसार राबविली आहे. यामध्ये कुठल्याही नियमाचा भंग झालेला नाही.
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: The choice of the Vice-Chancellor's sister assistant's eligibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.