अमोल काळे सीबीआयच्या ताब्यात, आज न्यायालयात हजर करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 10:11 AM2018-09-06T10:11:46+5:302018-09-06T10:19:16+5:30

पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील प्रमुख आरोपी अमोल काळेचा सीबीआय पथकाने बुधवारी बंगळूर येथील तुरुंगातून ताबा घेतला.

CBI gets custody of Amol Kale, accused in Gauri Lankesh killing, to be presented in court | अमोल काळे सीबीआयच्या ताब्यात, आज न्यायालयात हजर करणार

अमोल काळे सीबीआयच्या ताब्यात, आज न्यायालयात हजर करणार

Next

पुणे :  पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील प्रमुख आरोपी अमोल काळेचा सीबीआय पथकाने बुधवारी बंगळूर येथील तुरुंगातून ताबा घेतला. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांडातही तो मास्टरमाइंड असावा असा सीबीआयच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. अमोल काळेला गुरुवारी (6 सप्टेंबर) पुण्यातील न्यायालयात हजर केले जाणार आहे.

काळे आणि डॉ. दाभोलकर हत्याकांडातील संशयित सचिन अंदुरे यांची औरंगाबादमध्ये भेट झाली होती. औरंगाबादमधील वास्तव्यादरम्यान काळे याने अंदुरेला एक पिस्तूल दिले होते. दरम्यान, काळेने अंदुरेकडे दिलेल्या पिस्तुलाबाबतचा अहवाल अजूनही प्रलंबित आहे. डॉ. दाभोलकर हत्याकांडातील संशयित शरद कळसकर तसेच राजेश बांगेरा आणि अमित दिगवेकर यांना 10 सप्टेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली आहे. मात्र, सचिन अंदुरे याला न्यायालयीन कोठडी मिळाली.

अमोल अरविंद काळे मुळचा चिंचवडचा असून त्याला कर्नाटकातील दावणगिरी येथून विशेष पथकाने (एसआयटी) ताब्यात घेतले. त्यावेळी बंगळुरू येथील पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणात त्याचा संबंध असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. डॉ. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्याकांडाचे सूत्रधार एकच असावेत, या दिशेने तपास केला जात असताना, चिंचवडच्या अमोल काळे या संशयिताकडे तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रीत केले.  

एसआयटीने दावणगिरी येथे 21 मे रोजी काळे याला अटक केली होती. तो चिंचवडला वास्तव्यास असल्याची माहिती घेऊन कर्नाटक पोलिसांचे विशेष पथक चिंचवडला येऊन गेले. 23 मे 2018 ला त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने माणिक कॉलनी येथील अक्षय प्लाझा या इमारतीत पहिल्या मजल्यावरील अमोल काळे रहात असलेल्या 3 क्रमांकाच्या सदनिकेची तपासणी केली. त्याच्या घराची तब्बल सहा ते सात तास कसून चौकशी झाली होती. पोलिसांना त्याच्या घरी पुण्यातून तसेच महाराष्ट्रातील अन्य शहरांतून खरेदी केलेली अनेक सीमकार्ड आढळून आली होती. त्याच्या डायरीतील नोंदीत पत्रकार गौरी लंकेश यांच्या नावाचाही उल्लेख असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले असल्याची चर्चा होती.  

इंजिनिअरिग कंपन्यांना आवश्यक असणारे सुटे भाग पुरविण्याचा काळे याचा छोट्या स्वरूपातील व्यवसाय आहे. गेल्या 15 वर्षांपासून तो चिंचवडला राहत आहे. काळे धार्मिक संघटनेशी संलग्न काम करीत असल्याचे नागरिक सांगतात. तो फारसा लोकांमध्ये मिसळत नसे. 5 सप्टेंबर 2017 ला  बंगळुरू येथील पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. या हत्येप्रकरणाशी संबंधीत आरोपींचा शोध घेतला जात असताना आरोपी काळे याची चौकशी केली असता, पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागले. त्यामुळे 31 मे रोजी आरोपी काळे याला गौरी लंकेश हत्येसंबधीच्या गुन्ह्यात अटक केली होती. आता डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनात त्याला सीबीआयने अटक केली आहे.

Web Title: CBI gets custody of Amol Kale, accused in Gauri Lankesh killing, to be presented in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.