दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता, पाच वर्षात काम पूर्ण होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 08:37 PM2017-09-12T20:37:39+5:302017-09-12T20:37:39+5:30

गेल्या एक तपापासून मागणी असलेल्या दौंड -मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून हे काम पुढील पाच वर्षात २०२१-२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Cabinet approval for doubling of Daund-Manmad rail route, likely to be completed in five years | दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता, पाच वर्षात काम पूर्ण होण्याची शक्यता

दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता, पाच वर्षात काम पूर्ण होण्याची शक्यता

googlenewsNext

पुणे, दि. 12 -  गेल्या एक तपापासून मागणी असलेल्या दौंड -मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून हे काम पुढील पाच वर्षात २०२१-२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

दौंड -मनमाड या २४७़५ किमी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचा अंदाजित २ हजार ८१ कोटी आणि पूर्णत्वाचा खर्च २ हजार ३३० कोटी तसेच वार्षिक ५ टक्के वाढीसह असेल. या दुहेरीकरणामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक परिसरातील प्रवासी आणि मालवाहतूकीला फायदा होणार आहे़ त्याचबरोबर पुण्याहून दौंड - मनमाडमार्गे उत्तर भारतात जाणा-या तसेच शिर्डी आणि शनि शिंगणापूर या तीर्थक्षेत्रांना जाणा-या यात्रेकरुंसाठी महत्वाचा ठरणार आहे.  इगतपूरी -कल्याण दरम्यान पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अपघातामुळे अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या.  काही गाड्या मनमाड -दौंड, पुणे मार्गे वळविण्यात आल्या होत्या. तसेच गेल्या आठवड्यात खंडाळा घाटात मालगाडीचे डबे घसरल्यामुळे मुंबईहून दक्षिणेत जाणा-या अनेक गाड्या कल्याण -इगतपूरी, मनमाडमार्गे वळविण्यात आल्या होत्या. पण मुळात मनमाड -दौंड हा मार्ग एकेरी असल्याने अगोदरच या मार्गावर रेल्वेगाड्यांचा अतिरिक्त ताण आहे. त्यामुळे सध्याच अनेक गाड्यांना भरपूर वेळ लागतो़ त्यात या गाड्यांची भर पडल्याने अडचणीत आणखी वाढ झाली होती.  

दौंड -मनमाड एकेरी मार्गाचे विद्युतीकरणाचे काम काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे. पुण्याहून उत्तर भारतात जाणा-या गाड्यांना या मधल्या टप्प्यात खूप वेळ जातो़ त्यात काही कारणाने या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना उशीर झाला तर सर्वच वेळापत्रक बिघडून जाते. त्याचा परिणाम पॅसेंजर व अन्य गाड्यांना होत असतो. दुहेरीकरण पूर्ण झाल्यावर अनेक गाड्यांचा वेळ कमी होऊ शकणार आहे.  

पुणे -नगर दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेस चालविणे शक्य होऊ शकणार आहे. या दुहेरीकरणाच्या बांधकाम करताना सुमारे ५९़४० लाख मनुष्य दिवसांचा थेट रोजगार निर्माण होईल. २०१४ -१५ मध्ये दौंड -मनमाड विभागातील मार्ग क्षमतेचा वापर देखभालीसह १५६ टक्के होता. मुंबई -चिन्नई मार्गावर भिगवण -मोहोळ, होटगी -गुलबर्गा दुहेरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून ते पूर्ण झाल्यावर दौंड -मनमान विभागावरील वाहतूकीत प्रचंड वाढ होईल.  त्यावेळी हा एकेरी मार्ग वाढीव वाहतुकीला सामोरे जाण्याच्या स्थितीत नसेल़ त्यामुळे दौंड -मनमाड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करणे आवश्यक असल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्याला मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 

गेल्या १२ वर्षांपासून दौंड -मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची मागणी करण्यात येत होती. खरं तर विद्युतीकरणाच्या कामाबरोबरच दुहेरीकरणाचे काम करणे आवश्यक होते. या दुहेरीकरणानंतर पुणे -नगर दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेस सुरु करता येऊ शकेल. रेल्वेने आता वेळ न लावता लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे. 

- विकास देशपांडे, दौंड - सदस्य, सल्लागार समिती, पुणे रेल्वे विभाग

 

या दुहेरीकरणाचा फायदा...

- पुणे -नगर दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेस शक्य.

- लाब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळेत बचत शक्य.

- मालवाहतूकीत वाढ.

- पुणे -नगर रस्ते वाहतूकीवरील ताण कमी होऊ शकेल. 

- पुण्याहून उत्तरेकडील गाड्यांमध्ये वाढीस संधी.

Web Title: Cabinet approval for doubling of Daund-Manmad rail route, likely to be completed in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.