बाप्पांमुळे उद्याेग- व्यवसायांची दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 08:24 PM2018-09-09T20:24:51+5:302018-09-09T20:26:10+5:30

देशभरातील गणेशोत्सवाच्या अर्थकारणाचा अभ्यास केला असता 20 हजार कोटींचा व्यवसाय असलेला उत्सव म्हणून समाेर येत अाहे. इतकेच नव्हे तर दरवर्षी या आकडेवारीत 20 ते 30 टक्यांनी वाढ होते.

business rises due to ganeshotchav | बाप्पांमुळे उद्याेग- व्यवसायांची दिवाळी

बाप्पांमुळे उद्याेग- व्यवसायांची दिवाळी

Next

पुणे :  लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या उत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेतील विविध उद्योगव्यवसायांना चालना मिळणार आहे. बदलत्या काळानुसार उत्सवाने देखील गेल्या काही वर्षांपासून कात टाकलेली पाहवयास मिळते. गणेशोत्सव हा केवळ एका धर्मापुरता उत्सव नसून या उत्सवाच्या औचित्याने इतर सर्वधर्मातील अर्थकारणाला तितकाच वेग येतो. 
    
    तीन वर्षापूर्वी दिल्लीतील एका संस्थेने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील गणेशोत्सवाच्या अर्थकारणाचा अभ्यास केला असता त्यांनी 20 हजार कोटींचा व्यवसाय असलेला उत्सव म्हणून उल्लेख केला होता. इतकेच नव्हे तर दरवर्षी या आकडेवारीत 20 ते 30 टक्यांनी वाढ होते. असे संशोधन करणा-या संस्थेचे म्हणणे आहे. त्यानुसार आकडेमोड करायची झाल्यास यंदाचा गणेशोत्सव किमान 40 हजार कोटींचा आहे. अर्थव्यवस्थेला चालना देवून त्यात प्रचंड बदल घडवून आणण्यात गणेशोत्सवाचा वाटा मोठा आहे. मंडप, सजावट, मिरवणूक , विद्युत रोषणाई, देखावे, धार्मिक विधी आणि अहवाल वाटप यांचा खर्च अनिवार्य असून अद्याप या बाबींवरील खर्च कमी करण्यास कुठलेही मंडळ सहजासहजी तयार होत नसल्याचे दृश्य पाहवयास मिळते. मंडळाचे स्वरुप व त्यांचा खर्च याविषयीची आकडेवारी सांगायची झाल्यास मध्यम स्वरुपाच्या मंडळाचा सजावटीवरील खर्च साधारण पाच ते दहा लाखांपर्यत आहे. तर मोठ्या मंडळाचा सजावटीचा खर्च पंधरा ते वीस लाखांपर्यत जातो. मध्यम स्वरुपातील एका गणेश मंडळाचा संपूर्ण उत्सवाचे बजेट किमान दहा ते पंधरा लाखांपर्यत असून मोठ्या गणेश मंडळांचा खर्च हा दुप्पट / तिप्पट असल्याचे पाहवयास मिळते. 

       गणेशोत्सवाची गंगोत्री म्हणून पुण्याचा उल्लेख करावा लागेल. नोंदणीकृत मंडळांची संख्या 4700 असून तेवढीच मंडळे अनोंदणीकृत आहेत. या आकडेवारीच्या चौपटीने शहरातील हौसिंग सोसायटीमध्ये उत्सव साजरा होतो. याशिवाय प्रत्येक शाळेत देखील उत्सव आनंदाने साजरा केला जातो.45 लाख वस्तीच्या पुणे शहरात किमान 4 लाख घरांमध्ये गणरायाचे आगमन होते. याचा किमान खर्च दोन ते तीन हजार रुपयांच्या आसपास असून याप्रमाणे विचार केल्यास शहरातील गणेशोत्सवातील अर्थकारणाची व्याप्ती कळुन येईल. असे सराफ सांगतात. 

सामाजिक समरसता व समाजपयोगी अर्थकारण जपणारा उत्सव 

 सामाजिक समरसता व समाजपयोगी अर्थकारण जपणारा उत्सव म्हणून गणेशोत्सवाचा उल्लेख करावा लागेल. उत्सवाकरिता लागणारी विड्याची पाने शुक्रवार पेठेतील तांबोळी समाज विकतो. श्रीं च्या मुर्तीपुढे जी पाच फळे ठेवावी लागतात त्यासाठी बागवान बांधवांकडे जावे लागते. तर सजावटीचे सामान घेण्यासाठी रविवार पेठेतील बोहरी आळीत जावे लागते. एकूणच हा उत्सव सामाजिक समरसता जपून समाजपयोगी अर्थकारण करणारा उत्सव आहे. - आनंद सराफ (गणेशउत्सवाचे अभ्यासक) 

Web Title: business rises due to ganeshotchav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.