लोणी काळभोर : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यावर एका शासकीय अधिकाऱ्यासह १३ सदस्यीय प्रशासकीय संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वी सोशल मीडियामध्ये वायरल झालेल्या यादीतील ४ संचालकांना नवीन यादीतून वगळण्यात आले आहे. या यादीतही सर्व जण भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाच स्थान देण्यात आले असून, मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला याही वेळी डावलण्यात आले आहे.
तत्कालीन संचालक मंडळाच्या कथित गैरव्यवहारामुळे गेली पाच वर्षे बंद असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय संचालक मंडळाची आज घोषणा करण्यात आली. शासकीय अधिकारी व पात्र व्यक्तींचे अशासकीय सदस्यांचे प्रशासकीय मंडळ अधिनियम, नियम व पोटनियम यास अधीन राहून कारखान्याचे कामकाज पाहावे व केलेल्या कामकाजाचा वेळोवेळी अहवाल सादर करावा, असा आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे विभाग, पुणे यांनी या संचालकांना दिलेल्या पत्रात दिला आहे.
या प्रशासकीय संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून विशेष लेखापरीक्षक पी. आर. घोडके या शासकीय आधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित संचालक मंडळ पुढीलप्रमाणे : दादासाहेब बबन सातव (आव्हाळवाडी), गणेश भगवान कुटे (आव्हाळवाडी), केशव रामभाऊ कामठे (फुरसुंगी), संदेश आनंदराव काळभोर (कदमवाकवस्ती), पूनम सागर चौधरी (सोरतापवाडी), पांडुरंग रामचंद्र काळे (थेऊर), चित्तरंजन त्रिंबक गायकवाड (कदमवाकवस्ती), बाबासाहेब ज्ञानोबा शिंगोटे (मांजरी बुद्रुक), गोरख देवराम ससाणे (हडपसर), अतुल सुभाष परांडे (धानोरी), संदीप मारुती लोणकर (मुंढवा) व शिवाजी गंगाराम चांधेरे (वडगावशेरी) या १३ जणांचा प्रशासकीय संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे.
या प्रशासकीय संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले पी.आर. घोडके हे विशेष लेखापरीक्षक, शासकीय अधिकारी म्हणून काम करीत आहेत. दादासाहेब सातव हे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य असून गणेश कुटे हे हवेली तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. केशव कामठे हे भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पूनम चौधरी यांचीही नियुक्ती संचालक मंडळावर करण्यात आली आहे. यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी ज्येष्ठ संचालक पांडुरंग काळे यांचाही समावेश संचालक मंडळात करण्यात आला आहे. भाजपाच्या कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांचाही समावेश आहे.