बारामतीच्या लेकींमध्ये चुरशीची लढत होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 01:46 AM2019-03-24T01:46:29+5:302019-03-24T01:47:31+5:30

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये स्पर्धेत राहण्यासाठी बारामती विधानसभा मतदारसंघातील मते सर्वाधिक महत्त्वाची ठरणार आहेत.

Baramati's candidates will be a big challenge | बारामतीच्या लेकींमध्ये चुरशीची लढत होणार

बारामतीच्या लेकींमध्ये चुरशीची लढत होणार

googlenewsNext

- अविनाश थोरात

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये स्पर्धेत राहण्यासाठी बारामती विधानसभा मतदारसंघातील मते सर्वाधिक महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळेच भारतीय जनता पार्टीने दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहूल कुल यांच्या पत्नी कांचन यांना उमेदवारी देऊन ‘कुल’ खेळी केली आहे.
कांचन कुल यांचे माहेर बारामतीतील असल्याने बारामतीची लेक म्हणून त्यांना मतदारांपर्यंत जाता येईल. दौंडमधून जास्तीत जास्त आघाडी घेण्याचा प्रयत्न करता येईल. त्यामुळे कोणत्या लेकीच्या पाठीशी बारामती उभी राहणार याची उत्सुकता असल्याने निवडणूक चुरशीची ठरणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून २०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी- शिवसेना पुरस्कृत राष्टÑीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांनी चांगली लढत दिली होती. त्यांना ६९,७१९ मतांनी पराभव पत्करावा लागला. बारामतीतून ९०,६२८ मतांनी पिछाडीवर गेल्याचा फटका त्यांना बसला. कांचन कुल यांच्यासाठी बारामतीतून जास्तीत जास्त मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. बारामती तालुक्यातील ४० गावे पूर्वी दौंड विधानसभा मतदारसंघाला जोडलेली होती. या भागात कांचन कुल यांचे सासरे दिवंगत सुभाष कुल यांना मानणारा मोठा वर्ग होता. गेल्या वेळी दौंड मतदारसंघात जानकर यांना २५,५४८ मतांची आघाडी मिळाली होती. त्या वेळी राहूल कुल यांनी थेटपणे जानकर यांचा प्रचार केला नव्हता. त्यावेळी ते आमदारही नव्हते. यंदा साडेचार वर्षे असलेली आमदारकी आणि उघड प्रचार यामुळे दौंडमधून जास्तीत जास्त मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.
गेल्या वेळीचा धडा घेऊन खा. सुळे पाच वर्षे फिरत आहेत. मतदारसंघ पिंजून काढत आहेत. खडकवासला विधानसभा मतदारसंघाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. इंदापूर, भोर-वेल्हा-मुळशी व पुरंदर तालुक्यांत काँग्रेसची असलेली ताकद लक्षात घेऊन त्यांनी येथील नेत्यांशी संपर्क साधला आहे. हर्षवर्धन पाटील, संग्राम थोपटे, संजय जगताप यांना त्या स्वत: भेटत आहेत.

गणगोतातील लढाई
कांचन यांच्या सुनेत्रा पवार या सख्या आत्या आहेत. सुनेत्रा पवार यांनीच २००५ मध्ये राहुल आणि कांचन यांचे लग्न जमविले होते. कांचन यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर आहे. त्यांचे वडील कुमार राजे निंबाळकर हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांचे सख्खे चुलत बंधू आहेत. पद्मसिंह पाटील नात्याने कांचन यांचे चुलते आहेत.

Web Title: Baramati's candidates will be a big challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.