असहिष्णू शक्तींना घालवा, देशभरातील ६०० रंगकर्मींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 01:39 AM2019-04-06T01:39:40+5:302019-04-06T01:40:34+5:30

रंगकर्मींचे आवाहन : देशभरातील ६०० जणांचा सहभाग

Avoid intolerance of power, attracting 600 paint workers from all over the country | असहिष्णू शक्तींना घालवा, देशभरातील ६०० रंगकर्मींचे आवाहन

असहिष्णू शक्तींना घालवा, देशभरातील ६०० रंगकर्मींचे आवाहन

Next

पुणे : असहिष्णू आणि विभाजनवादी शक्तींना सत्तेतून घालवा आणि भारतीय संविधान, सहिष्णू आणि धर्मनिरपेक्ष वातावरणाचे रक्षण
करा, असे मतदारांना आवाहन करण्यासाठी देशभरातील ६00 रंगकर्मी एकवटले आहेत. यात पुण्यातील सात रंगकर्मींचाही
समावेश आहे.

दोनच दिवसांपूर्वी चित्रपट-दिग्दर्शक-निर्माते तसेच साहित्यिक आणि विचारवंतांनी मतदारांना सुज्ञपणे मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या पाठोपाठ आता देशभरातील रंगकर्मी एकत्र आले आहेत. आपली भूमिका मांडत मतदारांचे प्रबोधन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात पुण्यातील आशुतोष पोतदार, अतुल पेठे, मनस्विनी लता रवींद्र, मकरंद साठे, मोहित टाकळकर, प्रमोद काळे आणि सतीश आळेकर या रंगकर्मींचाही समावेश आहे.

ब्रिटिश काळापासूनच भारतीय रंगकर्मींनी आपल्या कामांमधून भारताची विविधता वेळोवेळी प्रकट केली आहे. आम्ही स्वातंत्र्य लढ्याचा भाग म्हणून नाटके केली आहेत, आम्ही सामाजिक प्रश्नांना नाटकांतून हाताळले आहे. पितृसत्ता- ब्राह्मण्यवाद - जातीआधारित शोषण यांना कायमच आव्हान दिले आहे. धार्मिक फुटीरतावाद, कट्टरतावाद, संकुचितपणा, अविवेकीपणा आदी शक्तींच्या विरोधात उभे राहण्याची भारतीय रंगकर्मींची गौरवशाली परंपरा राहिली आहे. आज भारताची सर्वसमावेशक संकल्पनाच नेमकी धोक्यात आली आहे. आज आमचे नाच, गाणी, विनोद धोक्यात आले आहेत. आज आमचे प्रिय संविधानदेखील या तडाख्यातून सुटलेले नाही. प्रश्न विचारणे, खोटारडेपणा
उघड करणे यांना ‘राष्ट्रद्रोही’ ठरवले जाते आहे.

विद्वेषाची बीजे आता थेट आमच्या खाण्यापिण्यांत, सण-समारंभांत, प्रार्थनांमध्ये मिसळली आहेत. ही धोक्याची घंटा आहे. हे थांबलेच पाहिजे, या भूमिकेतून देशभरातील रंगकर्मी अभिव्यक्त झाले आहेत. धर्मनिरपेक्ष, सर्वसमावेशक भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

स्वातंत्र्य, समता, बंधुता, सहिष्णुता आणि लोकशाही या मूल्यांचे जतन होणे आवश्यक आहे. मात्र ते होत आहे असे वाटत नाही. या महत्त्वाच्या बाबींचा विचार करूनच निवडणुकीत मतदान व्हावे.
- मकरंद साठे, रंगकर्मी

जे मतदान होईल ते धार्मिक किंवा जातीयतेवर होऊ नये. धार्मिक विद्वेष पसरवला जाऊ नये. लोकांनी त्याला बळी पडू नये. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सहिष्णूतेचे जतन केले पाहिजे. ज्या गोष्टी लोकशाहीच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत त्यांना वेळीच थांबवायला हवे. - अतुल पेठे, रंगकर्मी

Web Title: Avoid intolerance of power, attracting 600 paint workers from all over the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे