army major shashidharan nair martyred at Jammu Kashmir | जरा याद करो कुर्बानी : घरच्यांसोबतचे नववर्षाचे सेलिब्रेशन ठरले अखेरचे !
जरा याद करो कुर्बानी : घरच्यांसोबतचे नववर्षाचे सेलिब्रेशन ठरले अखेरचे !

पुणे :नियतीच्या मनात काय असेल याची कल्पना कोणालाही नसते. क्षणभंगुर असणाऱ्या आयुष्यात कधी कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल यांचा  अंदाज बांधणे ना कोणाला जमले आणि जमेलही...! पुण्यातील नायर कुटुंबालाही बारा दिवसांपूर्वी नववर्षाचे आगमन साजरा करणारा आपला मुलगा आज या जगात नसेल याची पुसटशी कल्पनाही नव्हती. 

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडीच्या स्फोटात भारतीय लष्कराचे मेजर शशीधरन विजय नायर शहीद झाले आहेत. ते पुण्याच्या खडकवासला येथे राहात होते. नौशेरा सेक्टरमध्ये पेट्रोलिंग करत असलेल्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी इम्प्रोव्हाईज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईसच्या मदतीनं स्फोट घडवून आणला. त्यात नायर यांना वीरमरण आले.  


  मूळ केरळचे असणाऱ्या नायर कुटुंबातील मेजर शशीधरन यांचे कुटुंब सध्या पुण्याजवळील खडकवासला परिसरात राहतात.केंद्रिय विद्यालयात शालेय शिक्षण झाल्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयापासून त्यांना देशसेवेची वेडाने झपाटले होते. महाविद्यालयात असताना त्यांनी एनसीसीमध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट स्नातक किताब त्यांच्या नावावर केला होता.सध्या ते गोरखा राफलच्या 2/1 मध्ये कार्यरत होते. 2007 मध्ये डेहराडून येथील राष्टीय रक्षा अकादमी मधून प्रशिक्षण पूर्ण करून ते लष्करात दाखल झाले होते. त्यांच्या 11 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेत नेत्रदीपक कामगिरी केली. या सोबतच उंच आणि अतिशय थंड ठिकाणी असलेल्या भारतीय सीमांवर देखील ते कार्यरत होते.  त्यांच्या घरी आई लता, बहीण सीना व पत्नी तृप्ती राहतात. त्यांचे वडील पुण्यातीलच केंद्रीय जलसंसाधन संस्थेत नोकरी करत होते. त्यांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले असून कुटुंबप्रमुख म्हणून शशीधरन यांच्यावरच कुटुंबाची जबाबदारी होती. अवघ्या तीन वर्षांपूर्वी तृप्ती यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. तृप्ती व्यवसायाने संगणक अभियंता आहेत. 

 यंदा अनेक वर्षांनी ते नवीन वर्ष साजरे करताना कुटुंबासोबत होते. ४० दिवसांची सुट्टी संपवून ३ जानेवारीला ते पुन्हा कामावर रुजू झाले. त्यावेळी त्यांचा चेहरा अजूनही समोर येत असल्याचे नातेवाईक सांगतात. अतिशय हसरे, चुणचूणीत असे वर्णन त्यांचे शेजारी करत आहेत. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण खडकवासला परिसरावर शोककळा पसरली आहे. 


Web Title: army major shashidharan nair martyred at Jammu Kashmir
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.