भोसरीत इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारण्यास मान्यता, मराठा चेंबरचा पुढाकार; आवश्यक त्या सर्व सुविधा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:58 AM2017-09-19T00:58:40+5:302017-09-19T00:59:14+5:30

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मंत्रालयाने भोसरीत इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारण्यास तत्त्वत: मंजुरी दिली असून येथील कंपन्यांना एकाच छताखाली निर्यातीपासून सर्व आवश्यक त्या सुविधा मिळणार आहेत, असे मराठा चेंबर आॅफ कॉमर्स अँड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी सांगितले़

Approval of Maratha Chamber in Bhosari electronic cluster; All the necessary facilities will be available | भोसरीत इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारण्यास मान्यता, मराठा चेंबरचा पुढाकार; आवश्यक त्या सर्व सुविधा मिळणार

भोसरीत इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारण्यास मान्यता, मराठा चेंबरचा पुढाकार; आवश्यक त्या सर्व सुविधा मिळणार

Next

पुणे : इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मंत्रालयाने भोसरीत इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारण्यास तत्त्वत: मंजुरी दिली असून येथील कंपन्यांना एकाच छताखाली निर्यातीपासून सर्व आवश्यक त्या सुविधा मिळणार आहेत, असे मराठा चेंबर आॅफ कॉमर्स अँड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी सांगितले़
मराठा चेंबरच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर गेल्या १ वर्षामध्ये केलेल्या कामांचा आढावा चौधरी यांनी पत्रकार परिषदेत घेतला़ या वेळी चेंबरचे महाव्यवस्थापक अनंत सरदेशमुख, उपाध्यक्ष दीपक करंदीकर, सचिव ऋजुता जगताप, विश्वास महाजन उपस्थित होते़
मराठा चेंबरने आतापर्यंत छोट्या व मध्यम उद्योजकांसाठी १३ क्लस्टर उभारले असून त्यात १२३ कंपन्या काम करीत आहेत़ भोसरीत चेंबरच्या जागेवर इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारण्यात येणार असून त्यासाठी ६६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे़ त्यापैकी ५० कोटी रुपये केंद्र सरकार देणार असून राज्य शासन १० टक्के रक्कम देणार आहे़ चेंबरची जागा ३० वर्षांच्या लीजने देण्यात येणार आहे़
या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांना सॉफ्टवेअर, हार्डवेअर संबंधित सर्व प्रकारच्या तपासण्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ याशिवाय निर्यातीसाठी आवश्यक ते सर्व तांंत्रिक सहकार्य उपलब्ध असणार आहे़ केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर १२ महिन्यांत सुरू होणार आहे़
>संरक्षण उत्पादनासाठी २५ कंपन्या उत्सुक
संरक्षण मंत्रालयाला लागणा-या विविध प्रकारच्या उत्पादनासाठी केंद्र सरकारने देशातील खासगी कंपन्या प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे़ खासगी कंपन्यांनी पुढे यावे, यासाठी मराठा चेंबरने पुढाकार घेतला असून पुणे, नाशिक, कोल्हापूर येथील २५ कंपन्यांनी उत्सुकता दाखविली आहे़
चेंबरने जीएसटीबाबत २५ हून अधिक चर्चासत्रे घेतली असून त्यात उद्योजकांना येणा-या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला़ त्यात ३ हजारांहून अधिक जणांनी सहभाग घेतला़ टिळक रोड येथील कार्यालयातील फूड टेस्टिंग लॅबचे आधुनिकीकरण केले़ राज्यातील १९ इंडस्ट्रीजच्या असोसिएशनना एका मंचावर आणण्यात आले असून वेगवेगळ्या बाबींची देवाणघेवाण सुरू झाली आहे़
कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत मराठा चेंबरकडून आतापर्यंत ४०० जणांना प्रशिक्षित करण्यात आले असून सध्या १०० जण प्रशिक्षण घेत आहेत़ त्यातील ९० टक्क्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे़ पुरंदर येथे होणारे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ लक्षात घेऊन मराठा चेंबरच्या हडपसर येथील कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे प्रमोद चौधरी यांनी सांगितले़

Web Title: Approval of Maratha Chamber in Bhosari electronic cluster; All the necessary facilities will be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.