चिडलेल्या नागरिकांनी थेट क्षेत्रीय कार्यालयालाच केले डंपिंग ग्राऊंड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 05:06 PM2018-07-12T17:06:21+5:302018-07-12T17:12:51+5:30

जनता वसाहतीमध्ये महापालिकेकडून याेग्य प्रकारे स्वच्छता राखण्यात येत नसल्याने चिडलेल्या नागरिकांनी थेट टिळक राेड क्षेत्रिय कार्यालयात जाऊन कचरा फेकला.

angry citizens dump garbage in tilak road ward office | चिडलेल्या नागरिकांनी थेट क्षेत्रीय कार्यालयालाच केले डंपिंग ग्राऊंड

चिडलेल्या नागरिकांनी थेट क्षेत्रीय कार्यालयालाच केले डंपिंग ग्राऊंड

Next

पुणे: जनता वसाहत येथील स्वच्छतेच्या कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा निषेध म्हणून स्थानिक नागरिकांना बरोबर घेऊन महापालिकेच्या टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात आंदोलन केले. कार्यालच्या तिन्ही मजल्यांवर आंदोलकांनी कचरा फेकला, त्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करणे अवघड झाले. त्यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार केल्यामुळे आंदोलकांना अटक करण्यात आली.

    सूरज लोखंडे तसेच अन्य शिवसैनिकांनी सांगितले की टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात अनेकदा लेखी स्वरूपात तक्रार केली. संपुर्ण जनता वसाहत परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. खाणी, नाली, गटारे तुंबले आहेत. त्यातील घाण पाणी सातत्याने वहात असते. कचरा वेळेवर उचलला जात नाही. तो पडून राहिल्यामुळे कुजून दुर्गंधी सुटली आहे. अनेक तक्रारी आल्यानंतरही महापालिका प्रशासन त्याची दखल घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे चिडलेल्या नागरिकांनी आंदोलनाचा निर्णय घेतला. शिवसेनेने त्याला पाठिंबा दिला. 


    कार्यालय सुरू होताच तिथे २०० पेक्षा अधिक नागरिक तसेच शिवसैनिक जमा झाले. त्यांनी बरोबर कचरा आणला होता. प्रत्येक मजल्यावर जाऊन त्यांनी थेट दालनांमध्ये, लॉबीत कचरा फेकण्यास सुरूवात केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना तर काम करता येईनाच, शिवाय तिथे येणाऱ्या नागरिकांचीही अडचण झाली. महापालिकेच्या निषेधाच्या घोषणा देत तिथे आंदोलकांनी गोंधळ सुरू केला. त्यामुळे कर्मचारीही त्रस्त झाले. पीएमसी एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष बापू पवार यांनी त्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात तिथे पोलिस आले. त्यांनी सूरज लोखंडे व अन्य शिवसैनिकांना अटक केली. त्या सर्वांना स्वारगेट पोलिस ठाण्यात नेण्यात आले. बापू पवार व कर्मचाऱ्यांनीही मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. 

 

Web Title: angry citizens dump garbage in tilak road ward office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.