अजित पवार नेत्यांना भेटत नसल्याने कॉँग्रेस कार्यकर्त्यांत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 11:59 AM2019-03-29T11:59:25+5:302019-03-29T12:07:42+5:30

बारामती लोकसभा मतदारसंघाती प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, कॉँग्रेस कार्यकर्ते अद्यापही प्रचारात सक्रिय झालेले नाहीत. कारण...

Ajit Pawar is not meeting the leaders, the confusion of the Congress workers | अजित पवार नेत्यांना भेटत नसल्याने कॉँग्रेस कार्यकर्त्यांत संभ्रम

अजित पवार नेत्यांना भेटत नसल्याने कॉँग्रेस कार्यकर्त्यांत संभ्रम

googlenewsNext
ठळक मुद्देबारामतीतील आघाडीधमार्साठी कॉँग्रेसला हवे आश्वासन पुणे जिल्ह्याच्या राजकारणात अजित पवार यांची भूमिका महत्वाची

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाती प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, कॉँग्रेस कार्यकर्ते अद्यापही प्रचारात सक्रिय झालेले नाहीत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार कॉँग्रेस नेत्यांची भेट टाळत असल्याने कॉँग्रेस कार्यकर्त्यांत नाराजी आहे. आघाडीधर्म पाळण्याचे आश्वासन अजित पवार यांनीच द्यावे, अशी कॉँग्रेसची मागणी आहे. 
बारामती लोकसभा मतदारसंघातून आमदार राहूल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून निवडणूक चुरशीची झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील, आमदार संग्राम थोपटे आणि जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांची भेट घेतली होती. मात्र, तरीही अद्याप कॉँग्रेस कार्यकर्त्यांना संदेश गेलेला नाही. 
पुणे जिल्ह्याच्या राजकारणात अजित पवार यांची भूमिका महत्वाची मानली जाते. आघाडीच्या राजकारणातही त्यांचाच शब्द अंतिम मानला जातो. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला तरी अजित पवारांचे राजकारण वेगळे असते. याचा अनुभव जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी घेतला आहे. २००९ च्या निवडणुकीत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसची आघाडी होती. परंतु, तरीही राष्ट्रवादी कॉँग्रेसने इंदापूर तालुक्यातून दत्तात्रय भरणे यांना हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उभे केले होते. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आघाडी धर्मातील प्रामाणिकपणा दाखविण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सभा घ्यावी लागली. मात्र, अजित पवार यांनी आपली सर्व ताकद भरणे यांच्यामागे उभी केली होती. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना केवळ आठ हजार मतांच्या निसटत्या फरकाने निवडणूक जिंकता आली. पक्षाच्या आदेशाविरुध्द बंडखोरी करूनही दत्तात्रय भरणे यांच्यावर कारवाई केली गेली नाही. उलट जिल्हा परिषद अध्यक्षपद बहाल करून त्यांना आणखी बळ देण्यात आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांचे प्रामाणिकपणे काम केले. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस वेगवेगळे लढले. त्यावेळी भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून इंदापूरच्या जागेबाबत स्पष्ट आश्वासन मिळत नाही तोपर्यंत प्रचारात उतरायचे नाही, असा इशारा कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला. हे आश्वासनही खुद्द अजित पवार यांच्याकडूनच मिळाले पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. 
भोर मतदारसंघातही आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांचे वेट अँड वॉच आहे. भोर- वेल्हा-मुळशी तालुका पूर्वी खेड लोकसभा मतदारसंघात होते. मात्र, मतदारसंघाच्या पुर्नरचनेनंतर भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघ बारामती लोकसभेत समाविष्ठ झाला आहे. तेव्हापासून थोपटे यांच्याशी जुळवून घेण्याचा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा प्रयत्न आहे. मात्र, थोपटे यांना दर निवडणुकीला राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून उमेदवार येण्याची धास्ती वाटते.   राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर १९९९ साली झालेल्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचा काशिनाथ खुटवड यांनी पराभव केला होता. त्यानंतर २००४ मध्ये कॉँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी झाली. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसने ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांना उमेदवारीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रतिक्षा करायला लावली. दिल्लीमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चेतून ही जागा कॉँग्रेससाठी सोडण्यात आली. मात्र, त्यावेळीही अजित पवार यांचे जवळचे कार्यकर्ते असलेल्या मानसिंग धुमाळ यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी घेतली होती. भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघात कॉग्रेस- राष्ट्रवादीची एकत्रित ताकद मोठी असूनही थोपटे यांना शिवसेनेकडून आव्हान उभे राहते. राजगड सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातूनही थोपटे यांना घेरण्याचाराष्ट्रवादीचा प्रयत्न असतो.
अजित पवार यांच्या राजकारणाचा चांगलाच फटका संजय जगताप यांचे वडील चंदुकाका जगताप यांना बसला आहे. २०१० मध्ये राज्यात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसची आघाडी आणि सत्ता असतानाही जगताप यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला होता. जगताप यांना आघाडीकडून अधिकृत उमेदवारी मिळाली होती.  पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आघाडीचे पुरेसे संख्याबळ होते. मात्र, त्यावेळी अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या लक्ष्मण जगताप अपक्ष उमेदवार होते. त्यांना सर्व रसद पुरविण्यात आली. यामध्ये चंदुकाका यांचा पराभव झाला. जिल्ह्यात कॉँग्रेसची ताकद असलेल्या मोजक्या मतदारसंघात पुरंदरचा समावेश आहे. त्यामुळे ही जागा कॉँग्रेससाठी सोडावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. संजय जगताप यांना राष्टÑवादीने आश्वासन दिले तरच प्रचारात उतरायचे असा निर्धार कॉँग्रेसने केला आहे. 
बारामती लोकसभा मतदारसंघाचे स्वरुप यंदाच्या निवडणुकीत बदलले आहे. खडकवासला, दौंड आणि पुरंदर येथे शिवसेना- भाजपा युतीचे आमदार आहेत. भोरमध्ये कॉँग्रेसचा आमदार आहे. इंदापूरमध्ये राष्टÑवादीचे आमदार असले तरी कॉँग्रेसची ताकद मोठी आहे. हे सर्व राजकीय गणित जुळविण्यासाठी अजित पवार यांना अद्याप वेळच मिळत नाही, अशी चर्चा आहे. मावळमधून त्यांचे पुत्र पार्थ लढत असल्याने संपूर्ण प्रचारमोहीम त्यांच्याच खांद्यावर आहे. दुसºया बाजुला शिरूरमधून अमोल कोल्हे यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात लक्ष घालण्यासाठी त्यांना वेळच नाही, अशी भावना राष्टÑवादीच्याच कार्यकर्त्यांची झाली आहे. 

Web Title: Ajit Pawar is not meeting the leaders, the confusion of the Congress workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.