Advertisement for sanitary latrines, policy for city cleanliness, proposal for standing before the Standing Committee | स्वच्छतागृहांवरही जाहिराती, शहरातील साफसफाईसाठी धोरण, स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवणार
स्वच्छतागृहांवरही जाहिराती, शहरातील साफसफाईसाठी धोरण, स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवणार

- राजू इनामदार

पुणे : शहरातील महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर आता जाहिरातीसाठी करण्यात येणार आहे. आर्थिक कारणासाठी नाही तर या स्वच्छतागृहांची साफसफाई नियमित व व्यवस्थित व्हावी, यासाठी हा विचार करण्यात आला असून प्रशासनाच्या वतीने स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.
शहरातील ४९३ पैकी २५० मोठ्या व वर्दळीच्या ठिकाणावरच्या स्वच्छतागृहांची यासाठी निवड करण्यात आली आहे. त्याच्या वरच्या भागावर डिजिटल जाहिरात करता येईल. दर्शनी भागाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना अ‍ॅक्रेलिकच्या फ्रेम लावता येणार आहेत. त्याचा आकार स्वच्छतागृहाच्या भिंतींच्या आकारावर ठरवण्यात येईल. अत्यंत कमी दरात (साधारण २२० रुपये चौरस फूट) कंपन्यांना ही जागा उपलब्ध करून देण्यात येईल. त्याबदल्यात जाहिरातदार कंपनीने त्या स्वच्छतागृहाची साफसफाईची जबाबदारी घ्यायची आहे.
कर्वेरस्ता येथील नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी त्यांच्या परिसरातील महापालिकेची दोन स्वच्छतागृहे या पद्धतीने खासगी कंपन्यांनाच चालवायला दिली आहेत. जाहिरातीसाठी म्हणून नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून ते हे काम करतात. त्यासाठी वर्षाला १ ते सव्वा लाख रुपये खर्च त्यांना येतो. नळस्टॉप येथे पुरुषांचे तर एसएनडीटी चौकात महिलांसाठीचे स्वच्छतागृह या पद्धतीने गेले तब्बल तीन वर्षे चालवले जात आहे. परिसरातील सर्वच नागरिकांची या स्वच्छतागृहांबाबत, तिथे दुर्गंधी येते, पाणी बाहेर वाहते अशी या तीन वर्षांत एकदाही तक्रार आलेली नाही. त्याच धर्तीवर पण महापालिकेला अल्प उत्पन्न मिळवून देणारा हा प्रस्ताव आकाशचिन्ह विभागाने तयार केला आहे. सध्या महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची वरची जागा व भिंतीही मोकळ्या असतात. त्यावर शिकवणी वर्गाच्या, राजकीय पक्षांच्या, जाहीर कार्यक्रमांच्या, सांस्कृतिक उपक्रमांच्या जाहिराती चिकटवल्या जातात. वरच्या बाजूलाही फलक लावून त्या जागेचा वापर केला जातो. याचे कसलेही पैसे महापालिकेला मिळत नाहीत व शहराचे विद्रूपीकरणही होत असते. त्यामुळेच अल्प पैसे आकारून जाहिरातींना परवानगी द्यायची व त्या बदल्यात त्यांच्यावर त्या स्वच्छतागृहाच्या साफसफाईची जबाबदारी टाकायची, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळेच स्थानिक नागरिकांकडून महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांना विरोध होता. त्यातूनच स्थानिक नगरसेवकांकडे ती स्वच्छतागृहे पाडून टाकण्याचा आग्रह धरला जातो. अनेक प्रभागांमधील स्वच्छतागृहे यामुळे पाडून टाकण्यात आली असून त्यामुळे परिसरात येणाºया नागरिकांची अडचण होते. प्रामुख्याने वर्दळीच्या भागात, बाजारपेठेत ही अडचण जास्त होते. विशेषत: महिलांना याचा त्रास सहन करावा लागतो. या प्रस्तावामुळे ही अडचण दूर होईल, कंपन्यांना स्वस्त दरात जाहिरात करायला मिळेल व स्वच्छतागृहांची स्वच्छताही राहील, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

अस्वच्छता : कर्मचारी वेळेवर नाहीत
१शहरातील महापालिकेच्या अन्य स्वच्छतागृहांच्या साफसफाईची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचाºयांवर आहे. त्यांच्याकडून ती व्यवस्थित पार पाडली जात नाही. त्यामुळेच शहरातील बहुसंख्य स्वच्छतागृहांची अवस्था दुर्गंधीयुक्त, आत पाऊलही ठेवता येणार नाही अशी असते.
२कर्मचारी वेळेवर येत नाहीत, आले तर व्यवस्थित काम करत नाहीत, काही ठिकाणी वापर जास्त असल्यामुळे स्वच्छता ठेवली तरीही ती कायम राहत नाही, कर्मचारी दिवसभर उपस्थित नसतात, त्यामुळे ते आहेत तोपर्यंत स्वच्छ व ते गेले की अस्वच्छता असेही प्रकार काही ठिकाणी आहेत.

प्रस्ताव स्थायीसमोर ठेवणार
अन्य जाहिरातींकरिता महापालिका आकारते त्यापेक्षा अत्यंत कमी दर यासाठी आकारण्यात येणार आहे. साधारण वर्षभराच्या मुदतीकरिता ते स्वच्छतागृह कंपनीला देण्यात येईल. त्यांच्याकडून चांगला अनुभव आला तर तो करार पुढेही सुरू ठेवण्यात येईल किंवा त्यांना नको असल्यास दुसºया कंपनीला ती जागा जाहिरातीसाठी उपलब्ध करून दिली जाईल. स्थायी समितीसमोर लवकरच हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.
तुषार दौंडकर,
उपायुक्त, आकाशचिन्ह विभाग, महापालिका

अनुभव चांगलाच
खासगी कंपन्यांना स्वच्छतागृह चालवण्यास देण्याआधी या भागातील नागरिकांकडून स्वच्छतागृहाच्या अस्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. मात्र आता त्या कंपन्यांनी फारच चांगल्या प्रकारे दोन्ही स्वच्छतागृहांची व्यवस्था ठेवली आहे. शहरातील अन्य स्वच्छतागृहांसाठी, त्यातही महिलांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांसाठी असे केले जात असेल तर ते चांगलेच आहे.
माधुरी सहस्रबुद्धे,
नगरसेविका


Web Title: Advertisement for sanitary latrines, policy for city cleanliness, proposal for standing before the Standing Committee
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.