शिरुर, मावळच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 06:34 PM2019-04-27T18:34:51+5:302019-04-27T18:36:50+5:30

जिल्ह्यातील शिरूर व मावळ लोकसभा मतदार संघासाठी येत्या सोमवारी (दि.२९)मतदान होणार असून जिल्हा प्रशासनाने मतदानाची आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.

administration is ready for maval and shirur election | शिरुर, मावळच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज

शिरुर, मावळच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज

Next

पुणे : जिल्ह्यातील शिरूरमावळ लोकसभा मतदार संघासाठी येत्या सोमवारी (दि.२९)मतदान होणार असून जिल्हा प्रशासनाने मतदानाची आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला प्रचार करता येणार नाही. मात्र. त्यानंतरही काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी प्रचार सुरूच ठेवला तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे,असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शनिवारी स्पष्ट केले. शिरूरमावळ या दोन्ही मतदार संघात ६५ टक्क्यांपर्यंत मतदान होईल, या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न केले असल्याचेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील चौथ्या व अंतिम टप्प्यातील मतदान येत्या २९ एप्रिल रोजी पार पडणार असून त्यात पुणे जिल्ह्यातील मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणूकीची सर्व तयारी पूर्ण केली असून येत्या रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ईव्हीएम मशीन सर्व मतदान केंद्रावर पोहचविले जाणार आहेत. याबाबतची अधिक माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत नवल किशोर राम बोलत होते. यावेळी ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील,उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह आदी उपस्थित होते.

नवल किशोर राम म्हणाले, शिरूर लोकसभा मतदार संघात २ हजार २९६ तर मावळमध्ये २ हजार ५०४ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. मावळमध्ये १० लाख ९४ हजार ४५४ स्त्री मतदार तर १२ लाख २ हजार ९१२ पुरूष असे एकूण २२ लाख ९७ हजार ४०५ मतदार आहेत. तसेच शिरूर लोकसभा मतदार संघात १० लाख ४३ हजार १२५ स्त्री मतदार आणि ११  लाख ३० हजार ३१५ पुरूष मतदार असे एकूण २१ लाख ७३ हजार ४२४ मतदार आहेत.


शिरूर मतदार संघातील ३१ व  मावळ मतदार संघातील ४७ या संवेधनशील मतदान केंद्रांसह शिरूरमधील १२४ आणि मावळातील २३० मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग केले जाणार आहे,असे नमूद करून नवल किशोर राम म्हणाले, मावळमध्ये ३३ हजार २२९ लिटर तर शिरूरमध्ये २५ हजार ८३ लिटर मद्य जप्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दोन्ही मतदार संघातून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच सी-व्हीजील अ‍ॅपवर मावळमधून प्राप्त झालेल्या २२५ आणि शिरूरमधील १९६ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

शिरुर व मावळ मतदार संघात प्रत्येकी 6 मतदान केंद्रे महिला चालविणार 
जिल्हा प्रशासनाने मतदानासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी पूर्ण केली असून मावळात १२ हजार ६५९ मनुष्यबळ आणि शिरूरमध्ये १५ हजार ३६१ मनुष्यबळ प्रत्यक्ष निवडणूक केंद्रावर नियुक्त करण्यात आले आहे.शिरूर व मावळ मतदार संघात प्रत्येकी ६ मतदान केंद्र महिलांकडून चालविली जाणार आहेत.तसेच प्रशासनातर्फे दोन्ही मतदार संघातील मतदारांना मतदान स्लिपांचे वाटप करण्यात आले असून मावळमध्ये ८१ टक्के आणि शिरूरमध्ये ८६.७ टक्के स्लिपांचे वाटप करण्यात आले आहे,असे नवल किशोर राम यांनी सांगितले.

Web Title: administration is ready for maval and shirur election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.