Action by RTO on 12 PMP's | पीएमपीच्या १२ बसेसवर आरटीओची कारवाई
पीएमपीच्या १२ बसेसवर आरटीओची कारवाई

ठळक मुद्देमागील काही महिन्यांत बसला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ मागील महिनाभरात १२ बसला योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्याची नोटीस

पुणे : आगीच्या घटना तसेच प्रवाशांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींमुळे प्रादेशिक परिवहन कार्यालया (आरटीओ) ने पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या बसची तपासणी सुरू केली आहे. मागील महिनाभरात १२ बसला योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे या बस मार्गावरून बंद करण्यात आल्या आहेत.
पीएमपीच्या मालकीच्या तसेचे ठेकेदारांकडील बसच्या स्थितीबाबत प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या जातात. आसनांची दुरावस्था, काटा फुटलेल्या, अग्निशमन यंत्र, प्रथमोपचार पेटी नसणे तसेच प्रवाशांसाठी आवश्यक सुविधांचा अभाव अशा अनेक तक्रारींचा दररोज पाऊस पडतो. तसेच मागील काही महिन्यांत बसला आग लागण्याच्या घटनाही घडत आहेत. काही बसच्या वायरींग, बॅटरी जळत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. बस रस्त्यावरच सुरू ठेऊन चालक अन्यत्र जाण्याचे प्रकारही समोर येत आहेत. काही दिवसांपुर्वी कात्रज येथे अशीच सुरू ठेवलेली बस अचानक उतारावरून पुढे गेल्याने काही वाहनांना धडकली. एका वाहनाला अडल्यामुळे अनर्थ ठळला. मात्र, त्यानंतरही असे प्रकार समोर येत आहेत. याबाबतही आरटीओकडे प्रवाशांकडून तक्रारी केल्या जात आहेत. देखभाल-दुरूस्तीच्या अभावामुळे ब्रेकडाऊनचे प्रमाणही अधिक आहे. 
आरटीओ पुरेशा मनुष्यबळाचा अभाव असल्याने मार्गांवरही वाहनांची तपासणी करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातही पीएमपी बसची तपासणी होत नव्हती. पण तक्रारी वाढल्याने मागील महिन्यापासून आरटीओने बसची तपासणी सुरू केली. याअंतर्गत शहरात विविध रस्त्यांवर बसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १२ बस सुस्थितीत नसल्याचे आढळून आले. प्रामुख्याने बसमधील फाटलेली, तुटलेली आसने, वायरींगमधील दोष तसेच अग्निशमन यंत्र नसणे या गोष्टी प्रकषार्ने जाणवल्या. तसेच इतर आवश्यक सुविधाही नव्हत्या. त्यामुळे याबाबत आवश्यक दुरूस्ती करून बस मार्गावर आणण्याबाबत पीएमपी प्रशासनाला नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे मार्गावरील या १२ बस बंद करण्यात आल्याची माहिती आरटीओतील अधिकाऱ्यांनी दिली.
------------------
पीएमपी बाबत आलेल्या तक्रारींनुसार मागील महिन्यापासून तपासणी सुरू करण्यात आली आहे. दोष आढळलेल्या बस मार्गावरून बंद करण्यात येत आहेत. पुढील काळातही ही कारवाई सुरू राहील. प्रवाशांनी याबाबत आरटीओकडे तक्रारी कराव्यात.
- विनोद सगरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी 


Web Title: Action by RTO on 12 PMP's
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.