लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कसं काय पाटील बरं हाय का? हे जुनं गाणं सर्वांच्या ओठी असते. मात्र, एका तरुणाला कसं काय पाटील... नमस्कार असे म्हणत चक्क ४७ हजारांना गंडविण्यात आले. खाली वाकून नमस्कार करीत मिठी मारून खिशातील रोकड लांबवण्यात आल्याची घटना शनिवारी जांभुळवाडी रस्त्यावर घडली.
याप्रकरणी २२ वर्षीय अज्ञात तरुणाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संग्राम लिपाणे (वय ३९, रा. जांभुळवाडी रस्ता, आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. लिपाणे व्यावसायिक आहेत. शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ते दत्तनगर येथील सन्मित्र सहकारी बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी गेले होते.
बँकेच्या दरवाजा बाहेर आरोपी तरुण उभा होता. लिपाणे यांच्याजवळ येऊन त्यांना ‘कसं काय पाटील’ असे विचारीत वाकून नमस्कार केला. त्यांना मिठी मारून पँटच्या उजव्या खिशामध्ये ठेवलेली रोकड हातचलाखी करून लंपास केली.