पुणे : सहा सीटरमध्ये झोपलेल्या लहानग्या तीन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंचेचाळीस वर्षीय नराधमाने दोन चिमुकल्यांवर बलात्कार केला तर तिस-या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करताना मुलींनी गोंधळ घातल्यामुळे ती त्याच्यापासून बचावली.

येरवडा येथील अभिजित हॉटेल समोरील गल्ली क्रमांक 1 मध्ये 2 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता ही घटना घडली. डॉक्टरांच्या तपासणीमध्ये बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाल्याने नराधमाला अटक करण्यात आली आहे. भवरलाल सखाजी रांगे (वय 45, रा. संजय पार्क, लोहगाव विमानतळ रास्ता मूळ रा. राजस्थान ) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांचा पती आणि तीन मुली या पूर्वी लोहगाव येथे राहण्यास होते. तेथील कामावरून काढून टाकण्यात आल्यामुळे हे कुटुंब तेथील घर सोडून दिवसभर काम करून एका सिक्स सिटरमध्ये झोपत होते. घटनेच्या दिवशी रात्री फिर्यादी तिच्या आईकडे गेली होती आणि तिचा पती कामानिमित्त बाहेर गेला होता. फिर्यादीच्या वय नऊ, आठ आणि चार या तीन मुली त्यावेळी सिक्स सिटरमध्ये झोपल्या होत्या. आरोपी भवरलाल याने यापैकी दोन मुलींवर त्याने बलात्कार केला. तिस-या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करताना मुलींनी गोंधळ केल्यामुळे त्याचा हा प्रकार उघडकीस आला. येरवडा पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक मनिषा टुले पुढील तपास करीत आहेत.