At 1:30pm, there is fog in Mumbai! : Railway, Karjat passenger cancellation | दुपारी दीड वाजता मुंबईत असते दाट धुके!; रेल्वेचा जावईशोध, कर्जत पॅसेंजर रद्द

ठळक मुद्देकर्जतला दुपारी दीड वाजता पोहोचणारी पुणे कर्जत पॅसेजर मध्य रेल्वेने दाट धुके पडत असल्याने रद्दअनेकांना सहन करावा लागला़ मनस्ताप

पुणे : थंडीचे दिवस असल्याने सध्या सकाळच्या वेळी दाट धुके पडत असल्याने काही रेल्वेगाड्यांना उशीर होत आहे़ पण, कर्जतला दुपारी दीड वाजता पोहोचणारी पुणे कर्जत पॅसेजर मध्य रेल्वेने दाट धुके पडत असल्याने रद्द केली आहे़ त्यामुळे मुंबईत दुपारी दीड वाजताही दाट धुके असते का अशा प्रश्न प्रवाशांना पडला आहे़ 
पुणे-कर्जत -पुणे (५१३१७/५१३१८) ही गाडी पुण्याहून सकाळी १११५ वाजता निघते व कर्जतला दुपारी दीड वाजता पोहचते़ तेथून  ती ३ वाजता निघून पुण्यात सायंकाळी साडेपाच वाजता पोहचते़ या पॅसेंजरच्या तिकीटाचा दर कमी असल्याने असंख्य गरीब नागरिक या गाडीने जाणे पसंत करतात़ 
पुणे-मुंबई दरम्यान घाट क्षेत्रात सकाळी दाट धुके असते़ त्यामुळे सकाळच्या वेळी गाड्यांना उशीर होऊ शकतो़ हे एकवेळ मान्य केली तरी ११ वाजता निघणारी पॅसेंजर धुक्यामुळे कशी काय रद्द होऊ शकते़ याशिवाय ही गाडी १२ ते १४ डिसेंबर दरम्यान रद्द करण्यात आली आहे़ १३ व १४ डिसेंबरलाही दाट धुके पडणार आहे, असे रेल्वे प्रशासनाला अगोदरच कसे काय माहिती पडले, असा प्रश्न सामान्य प्रवाशांना पडला आहे़ 
प्रवासी कमी असल्याचे कारण देऊन पुणे-लोणावळा दरम्यानची रात्रीची लोकल या अगोदरच रेल्वेने रद्द केली आहे़ आता धुक्याचे कारण देऊन पॅसेंजर रद्द केली आहे, त्यामुळे प्रवाशांचा संताप वाढला आहे़
पुणे-कर्जत-पुणे ही पॅसेंजर १२ ते १४ डिसेंबर दरम्यान रद्द करण्यात येत असल्याची माहिती ११ डिसेंबर रोजी रात्री उशिरा रेल्वेकडून जाहीर करण्यात आले़ त्यामुळे त्याची माहिती प्रवाशांपर्यंत पोहचू शकली नाही़ त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला़ 


याबाबत पंकज ओसवाल यांनी सांगितले की, आपण कर्जत रेल्वे स्थानकावर फोन करुन विचारल्यावर त्यांनी याबाबत काहीही माहिती नाही़ कंट्रोलरला विचारुन सांगतो, असे सांगण्यात आले़ गाडी रद्द करण्याविषयी पुणे रेल्वे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांना टष्ट्वीव करुन विचारणा केली़ तेव्हा त्यांनी धुक्यामुळे गाडी रद्द करण्यात आल्याचे सांगितले़ हे कारण न पटण्यासारखे आहे़ कारण ही गाडी ११.१५ वाजता सुटते़ तेव्हा धुके असण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे ओसवाल यांनी सांगितले़