तुमचा नेता कोण? उद्धव ठाकरेंचा महाआघाडीला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 11:15 AM2019-03-30T11:15:01+5:302019-03-30T11:39:23+5:30

गुजरातमधील रोड शोवेळी उद्धव यांचा महाआघाडीवर हल्लाबोल

Who is your leader shiv sena chief Uddhav Thackeray asks mahagathbandhan | तुमचा नेता कोण? उद्धव ठाकरेंचा महाआघाडीला सवाल

तुमचा नेता कोण? उद्धव ठाकरेंचा महाआघाडीला सवाल

Next

अहमदाबाद: एनडीएविरोधात महाआघाडी करणाऱ्या विरोधकांचा नेता कोण, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. आमचा नेता एक आहे. विरोधकांनी त्यांचा नेता कोण ते एकदा सांगावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपा अध्यक्ष अमित शहा आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्याआधी भाजपाकडून रोड शो करण्यात येत आहे. या रोड शोआधी एनडीएच्या नेत्यांची भाषणं झाली. त्यावेळी उद्धव यांनी महाआघाडीवर हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी उपस्थितांनी 'मोदी, मोदी' अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी आमचा नेता एक आहे. पण महाआघाडीचा नेता कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'आमच्या रॅलींमध्ये मोदींच्या नावानं घोषणाबाजी होते. विरोधकांनी त्यांची एक रॅली काढून दाखवावी आणि त्यावेळी तिथे जमलेल्यांना एका व्यक्तीच्या नावानं घोषणा द्यायला सांगाव्यात,' असं आव्हान उद्धव यांनी दिलं. महाआघाडीतील पक्षांच्या, नेत्यांच्या विचारात साम्य नाही. कायम एकमेकांचे पाय खेचणारे नेते आज एकत्र आले आहेत. त्या सर्वांनाच पंतप्रधान व्हायचं आहे, अशी टीका उद्धव यांनी केली. 

मागील चार वर्षांमध्ये शिवसेना-भाजपामध्ये निर्माण झालेल्या दुराव्यावरदेखील त्यांनी भाष्य केलं. 'आज मी इथे आल्याचं पाहून काहींच्या पोटात दुखत आहे. त्याचा इलाज माझ्याकडे आणि अमित भाईंकडे आहे. आमच्यातली भांडणं पाहून काहींना आनंद झाला होता. आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन भांडत होतो. पण आता आमच्यातले वाद संपले आहेत. कारण आमचे विचार सारखे आहेत. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. आम्हाला खुर्चीची ओढ नाही. 25 वर्षे आम्ही सत्तेशिवाय एकत्र होतो. एक भगवा घेऊन आम्ही 25 वर्षे वाटचाल केली. त्यावेळी सोबतीला कोणीच नव्हतं. दिल्लीवर भगवा फडकावण्याचं आमचं स्वप्न होतं. ते 25 वर्षांनी पूर्ण झालं,' असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

Web Title: Who is your leader shiv sena chief Uddhav Thackeray asks mahagathbandhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.