तुम्हाला २२ जागा दिल्यास आम्ही काय करायचे? विरोधी पक्षनेत्यांचा सवाल

By अतुल कुलकर्णी | Published: March 6, 2019 04:58 AM2019-03-06T04:58:27+5:302019-03-06T06:45:34+5:30

काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी करायचीच नाही, पण आपण आघाडी करतोय असे दाखवायचे या हेतूने प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीचे प्रतिनिधी मंगळवारी बैठकीस आल्याचे स्पष्ट झाले.

What do we do if you give 22 seats? The question of opposition leaders | तुम्हाला २२ जागा दिल्यास आम्ही काय करायचे? विरोधी पक्षनेत्यांचा सवाल

तुम्हाला २२ जागा दिल्यास आम्ही काय करायचे? विरोधी पक्षनेत्यांचा सवाल

Next

- अतुल कुलकर्णी 
मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी करायचीच नाही, पण आपण आघाडी करतोय असे दाखवायचे या हेतूने प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीचे प्रतिनिधी मंगळवारी बैठकीस आल्याचे स्पष्ट झाले. आम्हाला २२ जागा हव्या आहेत, अशी मागणी या आघाडीकडून लक्ष्मण माने यांनी केली. मात्र तुम्हाला २२ जागा द्यायच्या, राजू शेट्टी यांना दोन जागा द्यायच्या, अन्य मित्रपक्षांना एक-दोन जागा दिल्यावर शिल्लक राहणाऱ्या दहा-बारा जागा आम्ही वाटून घ्यायच्या का, असा सवाल बैठकीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.
बैठकीची सुरुवातच अशी झाल्यानंतर पुढे बैठकीला सूर लागलाच नाही. तुम्हाला किती जागा द्यायच्या याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी बोलून घेऊ, असे खासदार चव्हाण म्हणाले. बैठकीतूनच प्रकाश आंबेडकर यांना फोन लावण्यात आला. त्यांनी जागावाटपाची चर्चा राहुल गांधी यांच्याशीच करू असे सांगितले. मात्र तुम्ही २२ जागा मागत आहात, असा प्रस्ताव घेऊन आम्ही गांधी यांच्याकडे जायचे का, असा सवालही या वेळी खा. चव्हाण यांनी केला. जागांची चर्चा आमच्यासोबतच करावी लागेल, त्यातून मार्ग काढून अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी आपण त्यांच्याकडे जाऊ, असेही ते म्हणाले. पण आम्ही तर २२ जागा जाहीर करून बसलोय, असे लक्ष्मण माने यांचे म्हणणे होते.बहुजन वंचित आघाडी २२ जागांमध्ये नांदेड, बारामती आणि माढा या तीन जागा मागत आहे. आमची मनापासून इच्छा आहे की आंबेडकरांनी आमच्यासोबत यावे, ज्याअर्थी त्यांनी या तीन जागा मागितल्या याचा अर्थ ते आमच्याशी चर्चा करायला तयार आहेत, असे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. लक्ष्मण माने म्हणाले, मसुदा काय असावा यावर चर्चा झाली आहे, मात्र अंतिम निर्णय व्हायचा आहे. राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीत पुढील निर्णय होईल. आम्ही २२ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत, त्या २२ जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. या ताठरतेमुळे मंगळवारची बैठक कोणतीही चर्चा न होता संपली.
बैठकीस खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, हुसेन दलवाई, राष्टÑवादीतर्फे जितेंद्र आव्हाड, शिवाजीराव गर्जे, तर वंचित आघाडीतर्फे लक्ष्मण माने, अ‍ॅड. अण्णाराव पाटील, आनंद यादव, भारिप बहुजन महासंघाचे अशोक सोनवणे यांची उपस्थिती होती.
>शेवटपर्यंत नावे दिलीच नाहीत
दोन्ही काँग्रेस पक्ष आरएसएसच्या विरोधात आहेत, हे स्पष्ट करण्यासाठी तुम्हीच मसुदा तयार करा, अशी मागणीही लक्ष्मण माने यांनी केली. त्यावर तुम्ही तुमचे दोन सदस्य द्या, आम्ही आमच्याकडून दोन सदस्य देतो, सगळे मिळून चर्चा करून मसुदा तयार करतील, असे खा. चव्हाण म्हणाले. यावर बोलण्यास ज्येष्ठ विधिज्ञ माजिद मेमन आणि अ‍ॅड. गजानन देसाई यांना बैठकीसाठी बोलावून घेतले होते. मात्र समितीचा मसुदा तुम्हीच आधी तयार करून पाठवा, मग आम्ही आमचे मत देऊ, असे सांगत माने यांनी वंचित आघाडीच्या वतीने शेवटपर्यंत नावे दिली नाहीत.

Web Title: What do we do if you give 22 seats? The question of opposition leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.