भाजपा-शिवसेना युतीविरुद्ध आता वंचित बहुजन आघाडी अशीच लढत: प्रकाश आंबेडकर  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 09:26 PM2019-03-02T21:26:08+5:302019-03-02T21:31:48+5:30

राममंदिराचं काय झालं? धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षणाचं काय झालं? विकास नेमका कुणाचा झाला? कोण आहे खरे लाभार्थी? असे सवाल करीतच आहे. तो आताही राजकारणी जेव्हा मते मागायला जातील तेव्हा करणारच आहे.

vanchit Bahujan aaghadi fight against the alliance of BJP-Shiv Sena : Prakash Ambedkar | भाजपा-शिवसेना युतीविरुद्ध आता वंचित बहुजन आघाडी अशीच लढत: प्रकाश आंबेडकर  

भाजपा-शिवसेना युतीविरुद्ध आता वंचित बहुजन आघाडी अशीच लढत: प्रकाश आंबेडकर  

Next

- धनाजी कांबळे-  
मुंबई : सध्याचे देशातील आणि राज्यातील वातावरण बघितले तर, आगामी लोकसभा निवडणुकीत ‘भाजपा-सेना विरुद्ध काँग्रेस आघाडी’ अशी लढत होईल. त्यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारही चुरशीची लढत देतील. पण विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए विरुद्ध वंचित बहुजन आघाडी’ अशीच थेट लढत होईल, असे भारिपचे नेते आणि ‘वंचित बहुजन आघाडी’चे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजगृहात अ‍ॅड. आंबेडकर यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांवर आपली रोखठोक मते ‘लोकमत’कडे मांडली.
आपला देश बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो. मात्र, आज काही लोक संविधानाला बाजूला करून मनुवादी व्यवस्था आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेषत: आज सत्तेत असलेल्या भाजपाच्या आमदार, खासदार, मंत्री असलेल्या लोकांनी अशा प्रकारची वक्तव्ये केलेली आहेत. त्याच्यावरून यांचा हेतू स्वच्छ नाही, हे स्पष्टपणे लक्षात येते, असे सांगून आंबेडकर म्हणाले की, आज आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटले जाते. तसेच देशाला बुद्धांचा देश म्हणतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची ओळख सांगताना किंवा बाहेरच्या देशातील पाहुण्यांचे स्वागत करताना बुद्धांची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत होते. पण, बुद्धांचे विचार प्रत्यक्षात कुणी आचरणात आणत नाही, याचे दु:ख वाटते. देशाच्या संरक्षणासाठी आपले जवान अहोरात्र सीमेवर पहारा देतात. शहीद होतात. मात्र, त्यांना मिळणाऱ्या सुविधा, सवलती याबाबत कोणतेच सरकार गांभीर्याने पाठपुरावा करीत नाही. आजही विविध संरक्षण दलांतील जवानांना कोणाला शहीद दर्जा द्यायचा आणि कोणाला नाही, यावरून वाद आहेत. खरं तर आपल्या कोणत्याही दलातील सैनिक असला तरी त्याचा सन्मान झालाच पाहिजे. पुलवामा हल्ल्यानंतर वेगवेगळे मतप्रवाह मांडले जात आहेत. लोकांना भावनिक केले जात आहे. कुणी शहिदांचे भांडवल करून मते देण्याचे आवाहन करीत आहेत. हे अतिशय खेदजनक आहे. आज सैनिक आहेत, म्हणून राजकारणीदेखील सुरक्षित आहेत, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे, या मताचा मी आहे. २०१९ च्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत सुशिक्षित मध्यमवर्गीय जनता कोणत्याच आमिषांना भुलणार नाही. ती आजही, पंधरा लाखांचं काय झालं? २ कोटी रोजगाराचं काय झालं?
राममंदिराचं काय झालं? धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षणाचं काय झालं? विकास नेमका कुणाचा झाला? कोण आहे खरे लाभार्थी? असे सवाल करीतच आहे. तो आताही राजकारणी जेव्हा मते मागायला जातील तेव्हा करणारच आहे. त्यामुळे आता निवडणूक सोपी राहिलेली नाही. ज्या भाजपाने सोशल मीडियाचा वापर करून सत्ता मिळवली, तोेच सोशल मीडिया आज त्यांच्यावर उलटला आहे, हे आपण लक्षात घ्या. 
आपल्या वंचित बहुजन आघाडीला कसा प्रतिसाद आहे, असे विचारले असता,जनतेतूनच ही आघाडी तयार झाली आहे. त्यामुळे सर्व समाजघटकातील, जातीधमार्तील स्त्री-पुरुष, तरुण-तरुणी स्वयंप्रेरणेने यात सहभागी झाले आहेत. माध्यमांमध्ये चर्चा करताना अनेकदा केवळ दलित, मुस्लिमांच्या मतांवर जिंकता येत नाही. इतर समाजाची मते मिळायची असतील, तर आघाडीत सामील व्हायला पाहिजे, असाही सूर ऐकायला येतो. पण, आमच्यासोबत आज बलुतेदार आणि आलुतेदार, गरीब मराठा, साळी, माळी, कोळी, आदिवासी, धनगर समाजाचे हजारो लोक आहेत. त्यांचे नेते आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये साधारण १८ ते २० सभा झाल्या. या सभांना लाखोंच्या संख्येने गर्दी होती. जमलेले लोक हे कुणी पैसे देऊन बोलावलेले नव्हते. घरातील भाजी-भाकरी बांधून, गाडीखर्च पदरचा करून आलेले होते. ही केवळ राजकीय लढाई नाही, तर स्वाभिमानाची, गरीब, कष्टकरी जनतेच्या न्याय हक्काची लढाई आहे, हे जनतेने ओळखले आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी आम्हाला शासनकर्ती जमात बनाह्ण असे सांगितले होते. पण आम्ही आमच्या आमच्यातच लढत शासनकर्ती जमात होण्यासाठी प्रयत्न करीत होतो. त्यात आमच्यातीलच काही लोक जातीवादी, धर्मांध पक्षांसोबत गेल्याने आता जनतेनेच आपला नेता निवडला आहे. त्यामुळे येणारा काळ आमचा असेल, यावरून तुम्ही समजून घ्या... असे हसत हसतच पण विश्वासाने प्रकाश आंबेडकर म्हणाले. 
एमआयएमचे नेते खासदार असुदुद्दीन ओवेसी यांच्यामुळे काँग्रेसची आघाडी करण्यात अडचण झाली आहे, असे बोलले जाते, त्याबद्दल विचारले असता, ह्यएमआयएमचे सगळे कार्यक्रम हे भारतीय संविधानानुसारच होतात. त्यामुळे त्यांना त्यांचा पक्ष वाढविण्याचे स्वातंत्र्य आहे. तसेच त्यांनी कुणाशी आघाडी करावी, याचेही त्यांना स्वातंत्र्य आहे. ओवेसी जे काही बोलतात, ते कायद्याच्या चौकटीत कुठेही असंवैधानिक असत नाही. त्यामुळे ते भडकाऊ भाषण करतात, अशी त्यांची बनविलेली प्रतिमा चुकीची आहे. काँग्रेसची अडचण दूर करण्यासाठी त्यांनी अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्येच जाहीर सभेत तुम्हाला अडचण वाटते, तर आम्ही बाजूला होतो. पण सन्मानाने काही जागा सोडा, असे म्हटले आहे. त्यामुळे काहीतरी कारणे दाखवण्याचा हा प्रकार आहे. त्याला मी काही फार महत्त्व देत नाही. 
भीमा कोरेगाव येथील एकतर्फी हल्ल्यावेळी आपण घेतलेली भूमिका सर्वच समाजातील जनतेला भावली होती. पटली होती. त्यामुळेच आज सगळ्याच समाजांमधून आपणास पाठिंबा मिळत आहे. पण याचे मतांमध्ये रूपांतर होईल का आणि भीमा कोरेगाव प्रकरणात आपण ज्यांची नावे सुरुवातीला घेतली होती, त्यांना शिक्षा व्हावी यासाठी आपली काय भूमिका राहणार आहे, असे विचारले असता, भीमा कोरेगावचा हल्ला कुणी घडवला, कसा घडवला याची चर्चा त्याच वेळी घडली आहे. सध्या या प्रकरणाचा न्यायालयीन आणि आयोगाच्या माध्यमातून तपास सुरू आहे. त्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर फार काही भाष्य करता येणार नाही. पण त्या हल्ल्यानंतर एक खदखद असंतोष जनतेमध्ये आहे. तुम्ही मतांमध्ये परिवर्तन होईल का, असे म्हणालात, तर प्रत्येक वेळी जमलेली गर्दी मतदान तुम्हाला करेलच असे असत नाही. विशेषत: पैसे देऊन, मजुरी देऊन, गाड्या पाठवून जमवलेली गर्दी मतदान करतेच असे नाही. पण जे लोक स्वत:च्या घरातून भाजीभाकरी घेऊन येतात, एक दिवसाची मजुरी बुडवून येतात, ती माणसं मात्र निश्चितपणे मतदान करतातच, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. आता या निवडणुकांमध्ये हे सगळ्यांनाच दिसून येईल. स्वाभिमानी जनता कधीच कुणाला विकली जात नाही. तीच सर्व वंचित समाजांमधील जनता आमच्यासोबत आहे. त्यामुळे दिल्लीत ज्या पद्धतीने जनतेने काँग्रेस आणि भाजपा दोघांनाही नाकारले आणि आम आदमी पक्षाला निवडून दिले, तशी परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. आणि जनतेला बदल हवा असतो. पर्याय हवा असतो. तो आता वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने उपलब्ध झाला आहे. 

Web Title: vanchit Bahujan aaghadi fight against the alliance of BJP-Shiv Sena : Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.