पश्चिम बंगालमध्ये तारे-तारकांच्या लढती लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 04:14 AM2019-04-18T04:14:21+5:302019-04-18T04:14:51+5:30

चित्रपट अभिनेत्यांना निवडणुकीत उतरवून त्यांच्या लोकप्रियतेचा लाभ उठवण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांनी चालविला असला तरी, त्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आघाडीवर ठराव्यात.

Stars and stars in West Bengal are eye catching | पश्चिम बंगालमध्ये तारे-तारकांच्या लढती लक्षवेधी

पश्चिम बंगालमध्ये तारे-तारकांच्या लढती लक्षवेधी

Next

किरण अग्रवाल
कोलकाता : चित्रपट अभिनेत्यांना निवडणुकीत उतरवून त्यांच्या लोकप्रियतेचा लाभ उठवण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांनी चालविला असला तरी, त्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आघाडीवर ठराव्यात. त्यांनी तृणमूल काँग्रेसतर्फे सहा तारे-तारकांना पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे, तर भाजपनेही अशा तिघांना उमेदवारी दिली आहे. यातील आसनसोलच्या जागेवरील भाजप उमेदवार व विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री व प्रख्यात गायक बाबूल सुप्रियो व तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार, विद्यमान खासदार तसेच अभिनेत्री मुनमून सेन यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार आहे.
प. बंगालमध्ये ‘टॉलिवूड’च्या नायक-नायिकांना उमेदवारी देऊन जागा राखण्यात ममता बॅनर्जी आघाडीवर राहिल्या आहेत. बाकुडा मतदारसंघातून तब्बल नऊ वेळा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या वासुदेव आचार्य यांना गेल्या वेळी २०१४ मध्ये तृणमूल काँग्रेसच्या मुनमुन सेन यांनी पराभूत केले होते.
अर्थात निवडून आल्यानंतर मुनमुन सेन यांनी आपल्या मतदारसंघाकडे लक्ष न दिल्याची तक्रार जनतेने सुरू केली. त्यामुळे यंदा मुनमुन सेन यांना शेजारच्या आसनसोलच्या जागेवर भाजपचे उमेदवार बाबुल सुप्रियो यांच्याविरुद्ध ममतांनी रिंगणात उतरविले आहे. चित्रपट क्षेत्रातील या दोन्ही खासदार प्रतिस्पर्ध्यांतील लढत लक्षवेधी ठरली आहे.
पश्चिम बंगालमध्ये यंदा देशातील सर्वाधिक २० लाख, ६७ हजारांहून अधिक नवमतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तरुण मतदारांची ही मोठी संख्या पाहता त्यांना परिचित असलेले ग्लॅमरस उमेदवार देण्याची खेळी तृणमूल काँग्रेस व भाजपने केली आहे.२०१४मध्ये तृणमूलने अभिनेत्री मुनमुन सेन, संध्या रॉय, दीपक अधिकारी व तापस पॉल यांना रिंगणात उतरविले होते. त्यापैकी सेन व देव निवडून आले होते. त्यावेळी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी सक्रियपणे ममतांसोबत प्रचारात सहभाग घेतला होता. नंतर त्यांनी तृणमूलला सोडचिठ्ठी दिली. भाजपने गेल्यावेळी बाबूल सुप्रियो, संगीतकार बप्पी लहरी व जादूगार पी.सी. सरकार यांना तिकिटे दिली होती. राज्यात भाजपला दोनच जागा मिळाल्या. त्यात एक सुप्रियो असल्याने त्यांना मोदी मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली होती.यंदा तृणमूलने संध्या रॉय व तापस पॉल यांची तिकिटे कापली असून, सेन (आसनसोल), देव (घाटाल), मिमी चक्रवर्ती (जादवपूर), नुसरत जहॉ (बशीरहाट), शताब्दी रॉय (वीरभूम) व अर्पिता घोष (बालुरघाट) यांना रिंगणात उतरविले आहे. भाजपने बाबुल सुप्रियोखेरीज लॉकेट चटर्जी (हुगली) व जय बॅनर्जी (उलबेडिया) यांना उमेदवारी दिली आहे.
>डाव्यांचे वर्चस्व मोडण्यासाठी मिमी
‘टॉलिवूड’मधील टोटल दादागिरी, विलन, गॅँगस्टर, सुलतान आदी चित्रपटांतील आघाडीची अभिनेत्री मिमी चक्रवर्ती जादवपूरमधून तृणमूल काँग्रेसतर्फे लढत आहे. याच मतदारसंघातून यापूर्वी माकपाचे ज्येष्ठ नेते सोमनाथ चटर्जी नेहमी निवडून यायचे, तर दीर्घकाळ कम्युनिष्ट सत्तेचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले बुद्धदेव भट्टाचार्य याच विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत, म्हणून येथील डाव्यांचे वर्चस्व मोडण्यासाठी व भाजपला शह देण्यासाठी ममताने मिमीला उभे केले आहे.
>नुसरत होतेय ‘ट्रोल’ तरी...
जातीय संघर्षासाठी कुप्रसिद्धअसलेल्या बशीरहाटमध्ये भाजपशी दोन हात करण्यासाठी ममतांनी नुसरत जहॉँ या ‘बोल्ड’ अभिनेत्रीला रिंगणात उतरविले आहे. मॉडेल ते अभिनेत्री असा प्रवास केलेली नुसरत ही पार्क स्ट्रीट रेप केसमध्ये वादग्रस्त ठरली आहे. चालत्या कारमधील बलात्कार प्रकरणात चौकशी झालेल्या नुसरतने या केसमधील मुख्य आरोपीसोबत मुंबईत एक रूम बुक केल्याचेही चौकशीत पुढे आले होते. त्यामुळे उमेदवारीनंतर तिला सोशल मीडियात ‘ट्रोल’ केले गेले; पण तृणमूलने त्याची फिकीर न बाळगता नुसरतची उमेदवारी कायम ठेवली आहे.

Web Title: Stars and stars in West Bengal are eye catching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.