भाजपला शिवसेनेचा १०० टक्के पाठिंबा; काँग्रेसची मदार मनसेवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 01:37 AM2019-04-20T01:37:12+5:302019-04-20T01:37:52+5:30

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना शिवसेनेने १०० टक्के पाठिंबा दिला आहे.

Shiv Sena supports 100 percent BJP; Congress leader MNS | भाजपला शिवसेनेचा १०० टक्के पाठिंबा; काँग्रेसची मदार मनसेवर

भाजपला शिवसेनेचा १०० टक्के पाठिंबा; काँग्रेसची मदार मनसेवर

Next

मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना शिवसेनेने १०० टक्के पाठिंबा दिला आहे. शिवाय आरपीआय आणि रासपाचाही पाठिंबा मजबूत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांना राष्ट्रवादीचा भरघोस पाठिंबा असून, मनसेने अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. परिणामी, मनसेच्या पाठिंब्यावर काँग्रेसची खरी मदार असून, दिवसागणिक रंगत असलेल्या या मतदारसंघातील प्रचार आणि प्रसाराकडे अवघ्या देशासह मुंबईचेही लक्ष लागून राहिले आहे; कारण येथून बॉलीवूडचा चेहरा असलेल्या ऊर्मिला मातोंडकर लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत.
गोपाळ शेट्टी यांचा प्रचार आणि प्रसार दिवसागणिक जोर धरत आहे. उत्तर मुंबई जिल्हा, मंडळ, वॉर्डतील महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने शेट्टी यांच्या प्रचार आणि प्रसारात सहभागी होत आहेत. दहिसर पूर्वेकडील हनुमान मंदिर जंक्शन येथे आयोजित निवडणुकीच्या मोहिमेत महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. दहिसर टेलिफोन एक्सचेंज येथेही हेच चित्र होते. बोरीवली पश्चिमेकडील चंदावरकर रोड, मालाड येथील कच्चा रोड येथे महायुतीच्या पदाधिकारी वर्गासह कार्यकर्ते जोमाने सहभागी होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी हेदेखील शेट्टी यांच्या प्रचारार्थ येथे दाखल झाले होते. याव्यतिरिक्त अन्य समाजाचे लोकही शेट्टी यांच्या प्रचारात सहभागी होत आहेत. मालाड, कांदिवली, चारकोप येथील प्रचारावर शेट्टी यांचा सर्वाधिक भर असून, मित्रपक्षाचे पदाधिकारी सोशल मीडियावरही अधिक भर देत आहेत.
काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारातही महाआघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने सहभागी होत आहेत. ‘आपलीमुंबईचीमुलगी’ अशा हॅशटॅगने सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असलेल्या ऊर्मिला यांना राष्ट्रवादीचा भरघोस पाठिंबा मिळत असला तरी त्यांची खरी मदार ही मनसेवर अवलंबून आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची ऊर्मिला यांनी घेतलेली भेट आणि त्यानंतर मनसेच्या पदाधिकारी वर्गाची घेतली भेट; याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. सभा आणि प्रचारांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असले तरीदेखील मनसेचा पाठिंबा कितपत मिळतो; यावर काँग्रेसचा जोर दिसून येईल. ऊर्मिला यांचा प्रचार लक्षवेधी ठरत असून, पुढील काळात मनसेचा पाठिंबा ऊर्मिला यांनी कितपत मिळतो यावर राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत.
>बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे...
महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून प्रचार, प्रसारास पाठिंबा मिळत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या जोरावर प्रचाराला आणखी बळ मिळते आहे.
- गोपाळ शेट्टी
>राष्ट्रवादी आणि मनसेचे साहाय्य
मित्रपक्षांबद्दल आदर आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहाय्य अपेक्षित आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा पाठिंबा जोरदार असून, महाआघाडीच्या जोरावर प्रचार आणि प्रसार व्यवस्थित सुरू आहे.
- ऊर्मिला मातोंडकर
>मित्रपक्ष म्हणतो तरी काय..?
>भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना शिवसेनेचा १०० टक्के पाठिंबा आहे. झोपड्या असो, चाळी असो; त्यांच्या प्रत्येक प्रचारात शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी होत असून, प्रचार याच वेगाने पुढे सुरू राहील.
- विनोद घोसाळकर, शिवसेना उपनेते
ऊर्मिला जेथे जेथे प्रचारासाठी जात आहेत; तेथे तेथे आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात सहभागी होत आहेत. आमच्या प्रचार आणि प्रसाराला आणखी वेग येईल.
- इंद्रपाल सिंग, अध्यक्ष, उत्तर मुंबई, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Shiv Sena supports 100 percent BJP; Congress leader MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.