सभा शरद पवारांची; पण पॉवर दिसली काँग्रेसची!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 01:42 AM2019-04-24T01:42:42+5:302019-04-24T06:49:31+5:30

सभेला दीड तास उशीर; ९० टक्के कार्यकर्ते काँग्रेसचे

Sharad Pawar's meeting; Power seen in Congress! | सभा शरद पवारांची; पण पॉवर दिसली काँग्रेसची!

सभा शरद पवारांची; पण पॉवर दिसली काँग्रेसची!

Next

- धीरज परब

मीरा रोड : राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारसभेसाठी सोमवारी सायंकाळी मीरा रोड येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेत गर्दी मात्र काँग्रेसची होती. मैदानाचा प्रत्येक कोपरा व्यापणाऱ्या या गर्दीतील ९० टक्के लोक काँग्रेसचे होते. बहुतांश उपस्थितांच्या गळ्यात काँग्रेसचे उपरणे व हातात काँग्रेसचेच झेंडे होते. राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी काँग्रेसने लावलेली ताकद यानिमित्ताने चर्चेचा विषय ठरली.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पहिल्यांदाच शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या रूपाने दिग्गज नेत्यांची जाहीर सभा सोमवारी शहरात झाली. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सावरकर चौक (गोल्डन नेस्ट) येथील मेडतिया मैदानाची सभेसाठी निवड करण्यात आली होती. या मैदानात सर्वत्र राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आरपीआयचे झेंडे लावण्यात आले होते. भले मोठे व्यासपीठ, त्यावर एलईडी स्क्रीन आणि दोन्ही बाजूला मोठे फलक लावण्यात आले होते.

सभेची वेळ सायंकाळी ६ ची होती; मात्र त्यावेळी सभेच्या ठिकाणी निम्म्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्याच होत्या. हळूहळू मोठ्या संख्येने लोक यायला सुरुवात झाली आणि काही वेळातच मैदानातील खुर्च्या भरल्या. मैदानात उभे राहायलासुद्धा जागा नसल्याने लोक बाहेर थांबले होते. बसण्यास खुर्ची मिळावी, म्हणून काहींची धावपळ चालली होती. पत्रकारांसाठी राखून ठेवलेल्या पहिल्या रांगेतील आसनेसुद्धा पदाधिकाऱ्यांनी बळकावल्याने काही पत्रकारांना उभेच राहावे लागले.

गर्दी जमवण्यासाठी पक्ष पदाधिकाºयांना त्यांच्यात्यांच्या भागातून लोक आणण्यास सांगण्यात आले होते. उत्तनवरून कोळी महिला पारंपरिक वेशात मोठ्या संख्येने आल्या होत्या. नेहरूनगर, शास्त्रीनगर, बेकरी गल्ली आदी परिसरांतून लोकांचे जत्थे पायी आले. लोकांना आणण्यासाठी बस, रिक्षा आदी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. मैदानात येताच त्यांना काँग्रेसचे उपरणे दिले जात होते. मैदानात चहा, बिस्किटे व पाण्याची सोय करण्यात आली होती. वाहने उभी करायला स्वतंत्र व्यवस्था केली होती. पोलिसांच्या आकडेवारीनुसार पाच हजार लोक सभेला उपस्थित होते.

व्यासपीठावर ७.३५ वाजता शरद पवारांचे आगमन झाले. त्याआधी अशोक चव्हाण आले. सभेच्या ठिकाणी लोक उशिराने येऊनही, त्यांना जवळपास तासभर ताटकळत बसावे लागले. सभा सुरू झाली, तेव्हाही लोकांचे येणे सुरूच होते. पवार यांनी पाऊण तासाच्या भाषणात मोदी व भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली. चव्हाण यांनी आपल्या १८ मिनिटांच्या भाषणात आरोपांच्या फैरी झाडल्या. माजी मंत्री गणेश नाईक, उमेदवार आनंद परांजपे, माजी आ. मुझफ्फर हुसेन, दिनकर तावडे यांनीसुद्धा भाषणे केली.
शहरात राष्ट्रवादीची ताकद नाममात्र उरल्याने प्रचाराची धुरा काँग्रेसचे मुझफ्फर यांच्याकडे दिली. प्रचारासह सभा नियोजनातही त्यांचा व काँग्रेस पदाधिकाºयांचा मोठा वाटा होता. शिवसेना-भाजप युतीकडून प्रचारासाठी कोणत्याही मोठ्या नेत्याची जाहीर सभा होण्याची शक्यता दिसत नसताना, आघाडीने पवार, चव्हाण यांची सभा घेत कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

लहानग्यांना झेंडे, उपरण्यांचे कौतुक
काहीमहिला त्यांच्यासोबत आपली लहान मुलंबाळं घेऊन आल्या होत्या. मुलांना एकूणच सभेचे वातावरण नवखे होते. एक मुलगी तर हातात झेंडा घेऊन कुतूहलाने फडकवत होती. मुलांना गळ्यात उपरणे घालून कौतुक वाटत होते. सभेला यायचे असल्याने मुलांना कुठे ठेवणार, म्हणून त्यांनाही सोबत आणल्याचे काही महिला म्हणाल्या. मैदानात गर्दी असली, तरी भाषणांमधील काही वक्तव्यांनाच उत्स्फूर्त दाद मिळाली.

पवार कारने, तर चव्हाण आले हेलिकॉप्टरने
शरद पवार हे खाजगी गाडीने मुंबईहून साडेसातच्या सुमारास सभास्थानी आले. अशोक चव्हाण हे ६ च्या सुमारासच हेलिकॉप्टरने शहरात दाखल झाले होते. सुभाषचंद्र बोस मैदानावर हेलिपॅड उभारण्यात आले होते. तेथून ते मुझफ्फर हुसेन यांच्या बंगल्यावर पवारांची वाट पाहत सुमारे दीड तास थांबले होते. सभा झाल्यावर दोघेही अन्य सहकाºयांसह मुझफ्फर यांच्या बंगल्यावर गेले. तेथे भोजन करून मुंबईला रवाना झाले.

नादुरुस्त जनरेटरने उडाली तारांबळ : काळोख पडू लागला असतानाच सभेसाठी आणलेले जनरेटर सुरू न झाल्याने, दुसरे जनरेटर मागवले; मात्र तेसुद्धा सुरू होत नव्हते. त्यामुळे आयोजकांची चांगलीच तारांबळ उडाली. जनरेटरची कशीबशी व्यवस्था करून सभास्थळी वीजपुरवठा सुरू करण्यात आला. पोलिसांनी याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. मैदानात जाताना कार्यकर्त्यांची तपासणी केली जात होती. त्यावेळी त्यांच्याजवळील पाण्याच्या बाटल्या काढून ठेवण्यास सांगितले जात होते.

Web Title: Sharad Pawar's meeting; Power seen in Congress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.