Puneri Misal - Fu Bai Fu, Fugdi Fu ... | पुणेरी मिसळ - फू बाई फू, फुगडी फू...
पुणेरी मिसळ - फू बाई फू, फुगडी फू...

- अभय नरहर जोशी -  

(स्थळ : बारामती मतदारसंघ  गीत : पारंपरिक रचना... चाल : पारंपरिक) 
 बारामतीच्या ताई दौंडच्या ताईंना उद्देशून...
फू बाई फू... फुगडी फू...
दमलीस काय माझ्या कांचन तू गं... कांचन तू...
आत पोकळ, बाहेर पोकळ राजकारणाचा खेळ
दौंड म्हणे बारामतीला आता नाही आपला मेळ
बाई फुगडी फू...
आत्या-भाची गोष्टी सांगे प्रीत त्यांची मोठी
गेली सोडून भाची आमची ‘कमळी’च्या ओटी
आता फुगडी फू...
नवी नवी असलीस तरी नको आता लाजू
चल मिळून दोघी, या निवडणुकीत झुंजू
आता फुगडी फू...
माझ्यासाठी ‘दादा’ गेला ‘इंदापूर’च्या घरी
घेऊ बरोबर त्यांना, ‘दौंड’वर करू शिरजोरी
आता फुगडी फू...
..............
दौंडच्या ताई बारामतीच्या ताईंना उद्देशून...
माफ करा आत्याबाई, काळ आला तसा
लढले तरी तुमचीच माना, टाकू नका फासा
आता फुगडी फू...
चुकला गडी, मागच्या वेळी झुंज दिली खाशी
थोडक्यात गेला तोल अन् फुटली ‘कप-बशी’
आता फुगडी फू...
बारा‘मती’ गुंगवू आम्ही, ‘घड्याळ’ पाडू बंद
भल्याभल्यांना भुलवतो बघा ‘कमळा’चा गंध
आता फुगडी फू...
भले भले शरण आम्हा, त्यांची दांडी करतो गुल
तापू द्या राजकारण किती, आम्ही असतो ‘कुल’
आता फुगडी फू...
फू बाई फू, फुगडी फू...


Web Title: Puneri Misal - Fu Bai Fu, Fugdi Fu ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.