पालघरातील समस्या कायमच, ७० वर्षांत अनेक लोकसभा निवडणुका झाल्या तरीही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 01:59 AM2019-04-18T01:59:09+5:302019-04-18T01:59:37+5:30

प्रत्येक राजकीय पक्ष, संघटना व त्यांचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते आपण केलेल्या विकासाचे पाढे वाचायला सुरुवात करून विकासकामांचे श्रेय लाटतात

Problems in Palghar Despite the many parliamentary elections in 70 years, | पालघरातील समस्या कायमच, ७० वर्षांत अनेक लोकसभा निवडणुका झाल्या तरीही

पालघरातील समस्या कायमच, ७० वर्षांत अनेक लोकसभा निवडणुका झाल्या तरीही

Next

- पंकज राऊत

बोईसर : लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपरिषद व ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हटले की प्रत्येक राजकीय पक्ष, संघटना व त्यांचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते आपण केलेल्या विकासाचे पाढे वाचायला सुरुवात करून विकासकामांचे श्रेय लाटतात परंतु वास्तवात पालघर जिल्ह्यात आता पर्यंत कितीतरी निवडणुका झाल्यात परंतु गेली सत्तर वर्षे तेच प्रश्न आजही कायम असून तीच ती आश्वासन देणाऱ्यांना आता या समस्या कधी सुटणार? असा संतप्त सवाल मतदार व नागरिक उमेदवारांना विचारत असूनही पुन्हा जुनीच आश्वासन घेऊन उमेदवार प्रचाराकरीता येत आहेत.
प्रत्येक निवडणुकीमध्ये नागरिक समस्यांचा पाढा वाचून दाखवितात तेव्हा मात्र नेते मंडळी गाजरे दाखवून नंतर मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या बहुसंख्य भागात विकासाचे घोंगडे वर्षानुवर्ष भिजत पडले असून विकासाचे चित्र सर्वत्र विदारक आहे. याकडे कोण व केव्हा गंभीरपणे लक्ष देणार ?
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काही गावे ही वर्षानुवर्ष दुष्काळग्रस्त आहेत. आदिवासी रोजी- रोटीसाठी स्थलांतर करीत आहेत. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी व मजुरीसाठी आजही वणवण करावी लागते. आजही काही भागात शिक्षणाची पुरेशी सोय नाही. कुपोषण आश्रमशाळांची दुरवस्था, निकृष्ट दर्जाचे रस्ते, वाढीव वीज बिलांचा गोंधळ, विजेच्या टंचाईची प्रचंड समस्या, सार्वजनिक दळण वळणाचे भयावह वास्तव, वाहतूक कोंडी, प्रदूषण, अपुरी लोकल सेवा व आरोग्य सेवेचा उडालेला बोजवारा या मुळे आज शहरी, ग्रामीण व दुर्गम भागातील सर्वच नागरिक त्रस्त आहेत आदिवासी, शेतकरी, बागायतदार, मच्छिमार, कामगार, व्यवसायिक सर्वच मेटाकुटीला आल्याने हे भोग आम्ही अनेक पिढ्या सोसतोय किमान आमच्या पुढच्या पिढीच्या नशिबी तरी अशा वेदना येऊ देऊ नका अशी मागणी भोळे भाबडे मतदार आज करीत आहेत निवडणुकीत सर्वच पक्षांचे नेते हे करू ते करू अशी आश्वासने देतात. हे आश्वासनाचे गाजर अजून किती दिवस दाखविणार? असा प्रश्न सर्वत्र उपस्थित करून आजही रस्ते, वीज, पाणी या मूलभूत समस्या जैसे थे असून त्या लोकप्रतिनिधींना पूर्णपणे सोडविता आल्या नाहीत. फक्त कोणत्या कामांसाठी कशा पद्धतीने आणि किती निधी आणला हे पटवून देण्यात सर्व मग्न असतात गावोगावच्या समस्या कायम असून हे चित्र बदलण्याची अपेक्षा असतांना मात्र निवडणुकीच्या निमित्ताने आता गावोगाव निवडणुकीतील उमेदवारांसह कार्यकर्तेही फिरू लागले आहेत. त्याच आश्वासनांवर जनतेची बोळवण केली जात आहे.
कुठे आहे विकास? कोणी, कधी, कसा केला विकास?
गावपातळीपर्यंत तळागाळापर्यंत आम्ही विकासाची गंगा पोहोचविल्याची स्वप्ने भोळ्याभाबड्या मतदारांना दाखविली जात आहेत. तुरळक लोकप्रतिनिधी वगळले तर इतरांनी काय कामे केलीत. हा संशोधनाचा विषय ठरेल.झालेला विकास पाहायचा म्हटला तर गावात विकासाच्या खुणा बर्हिगोल भिंगातून शोधाव्या लागतील. एवढी सगळी बिकट परिस्थिती असताना प्रत्येक निवडणुकीत पक्षीय मंडळी आपल्या उमेदवाराला सोबत घेऊन आश्वासनाचे घोडे दामटत आहेत.जनताही निवडणुकीतील या गुळगुळीत आश्वासनांना बळी पडते. हा वारंवार येणारा अनुभव असतानाही पैसा आणि दारूच्या जोरावर मतदारांना भुरळ घातली जाते. त्यामुळे आगामी काळात तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती आहे.

Web Title: Problems in Palghar Despite the many parliamentary elections in 70 years,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.