बारामतीत भाजपा जिंकल्यास लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल- पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 09:38 AM2019-05-01T09:38:11+5:302019-05-01T09:59:31+5:30

शरद पवारांनी व्यक्त केला ईव्हीएमबद्दल संशय

people will lose faith on elections if bjp wins baramati lok sabha seat says ncp chief sharad pawar | बारामतीत भाजपा जिंकल्यास लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल- पवार

बारामतीत भाजपा जिंकल्यास लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल- पवार

Next

मुंबई: बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपानं विजय मिळवल्यास लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं. यंदाच्या निवडणुकीत भाजपानंबारामतीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. यंदा बारामती जिंकणारच असा विश्वास भाजपाच्या नेत्यांनी अनेकदा व्यक्त केला. याबद्दल भाष्य करताना 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी ईव्हीएमविषयी शंका उपस्थित केली.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा बारामती मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपानं यंदा कंबर कसली. बारामती पाडली, तर त्यावर पुस्तक लिहावं लागेल असं विधान काही दिवसांपूर्वीच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. याशिवाय यंदा बारामती सुप्रिया सुळेंना जड जाईल, अशी विधानं भाजपाच्या नेत्यांकडून करण्यात आली. यावर बोलताना शरद पवारांनी ईव्हीएमबद्दल संशय उपस्थित केला. 'ईव्हीएम हॅक करता येतात, असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात. मी या विषयातला तज्ज्ञ नाही. मात्र कोणतंही बटण दाबल्यास मत भाजपालाच जातं, अशी बातमी मध्यंतरी वाचनात आली होती. भाजपा नेत्यांचे बारामतीबद्दलचे दावे पाहता, त्यांनी काही नियोजन केलंय की काय, अशी शंका येते,' असं पवार म्हणाले.

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपा जिंकल्यास लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल, असं शरद पवार यांनी म्हटलं. लोकांचा निवडणुकांवरील विश्वास जपायला हवा. त्यासाठी निवडणूक आयोगानं आवश्यक सुधारणा घडवायल्या हव्यात. लोकांचा विश्वास उडाल्यावर मग ती कोणत्याही टोकाला जातात. त्यामुळे त्यांचा विश्वास जपणं गरजेचं आहे, असंदेखील पवार म्हणाले. बारामतीत राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर भाजपाच्या कांचन कुल यांचं आव्हान आहे. 

Web Title: people will lose faith on elections if bjp wins baramati lok sabha seat says ncp chief sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.