निवडणूक लोकसभेची असो वा विधानसभेची; तो न्यूयॉर्कहून येतो, मतदानाचं कर्तव्य बजावतो!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 05:30 PM2019-04-23T17:30:10+5:302019-04-23T17:32:01+5:30

वयाची १८ वर्षं पूर्ण झाल्यानंतर १९९९ मध्ये त्यानं पहिल्यांदा मतदान केलं होतं.

Navendu, executive flies down From New York to Goa for every election | निवडणूक लोकसभेची असो वा विधानसभेची; तो न्यूयॉर्कहून येतो, मतदानाचं कर्तव्य बजावतो!

निवडणूक लोकसभेची असो वा विधानसभेची; तो न्यूयॉर्कहून येतो, मतदानाचं कर्तव्य बजावतो!

Next
ठळक मुद्देमतदानाच्या दिवशी मिळणारी सुटी भटकंतीसाठी वापरण्याचा जणू पायंडाच पडला आहे. एक ३६ वर्षांचा तरुण प्रत्येक निवडणुकीत न चुकता न्यूयॉर्कहून येऊन मतदान करतो. वयाची १८ वर्षं पूर्ण केल्यानंतर १९९९ मध्ये त्यानं पहिल्यांदा मतदान केलं होतं.

लोकशाही राज्यव्यवस्थेत अधिकाधिक मतदान होणं खरं तर खूप आवश्यक आहे. घटनेनं दिलेला मतदानाचा अधिकार नागरिकांनी कर्तव्य समजून बजावायला हवा. पण दुर्दैवानं, आपल्याकडे तसं होताना दिसत नाही. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग, केंद्र-राज्य सरकारं प्रयत्न करतं. अनेक सेलिब्रिटी, मीडिया, सोशल मीडियावरूनही या संदर्भात जागृती केली जाते. मात्र, मतदानाचा टक्का ६०च्या आसपासच पोहोचतो. मतदानाच्या दिवशी मिळणारी सुटी भटकंतीसाठी वापरण्याचा जणू पायंडाच पडला आहे. मात्र दुसरीकडे, गोव्यातील एक ३६ वर्षांचा तरुण प्रत्येक निवडणुकीत न चुकता न्यूयॉर्कहून येऊन मतदान करतो. त्याचं नाव आहे, नवेंदू शिराली. मताचं मोल न जाणणाऱ्या तरुणांनी त्याच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी. 

नवेंदू गेली दहा वर्षं नोकरीनिमित्त अमेरिकेत आहे. या दशकभरात गोव्यात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत त्यानं मतदानाचा हक्क बजावलंय. भारतीय नागरिक म्हणून ते आपलं कर्तव्यच असल्याचं तो मानतो. वयाची १८ वर्षं पूर्ण केल्यानंतर १९९९ मध्ये त्यानं पहिल्यांदा मतदान केलं होतं. त्यानंतर त्यानं एकदाही हे राष्ट्रीय कर्तव्य चुकवलेलं नाही. नवेंदूनं आज पणजीच्या एका केंद्रावर मतदान केलं. आता लगेचच तो न्यूयॉर्कला परतेल आणि कामावर रुजू होईल. 

मतदानासाठी भारतात येताना नवेंदूला बरीच कसरत करावी लागते. अनेक कामं, मीटिंग्स पुढे ढकलाव्या लागतात. चालू असलेल्या प्रोजेक्टबाबत इथून सहकाऱ्यांशी संपर्कात राहावं लागतं. परंतु, देशावरील प्रेमाखातर आणि लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी तो हे सगळं जमवतो. त्याबद्दल काही मित्र त्याची टिंगल उडवतात, तर काही जण कौतुकही करतात. न्यूयॉर्कला जाण्याआधी नवेंदू बेंगळुरूत इन्फोसिसमध्ये होता. त्यावेळीही तो मतदानादिवशी गोव्यात हजर असायचा. 

आज अभ्यासू, हुशार मंडळींनी राजकारणात येण्याची गरज असल्याचं मत त्यानं 'टाइम्स'शी बोलताना मांडलं. नवेंदू पणजी विधानसभा मतदारसंघातील मतदार आहे. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून यायचे. ते संरक्षणमंत्री होऊन केंद्रात जाईपर्यंत नवेंदूनं अनेकदा त्यांना गोव्याच्या विकासाबाबतचे अनेक प्रश्न विचारले होते. आपली काही मतंही त्यांच्यापुढे मांडली होती.


मतदानाच्या निमित्ताने मुलगा घरी येतो याचा नवेंदूच्या आई-वडिलांना आनंदच वाटतो. परंतु, इतर कौटुंबिक कार्यक्रमांनाही त्यानं तितकंच महत्त्व द्यावं, अशी त्यांची इच्छा आहे. मागे एक-दोन वेळा त्यानं अशा कारणांसाठी भारतात येणं टाळलं होतं. परंतु, मतदान कधीच चुकलेलं नाही, चुकणार नाही, असा विश्वास त्यानं व्यक्त केला. 



 

Web Title: Navendu, executive flies down From New York to Goa for every election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.