मावळ लोकसभा निवडणूक : गाववाली मंडळी, नात्यागोत्यांना साद, प्रचार यंत्रणा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 06:04 PM2019-04-27T18:04:33+5:302019-04-27T18:09:41+5:30

पुणे व बारामती लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची फौज मावळच्या निवडणुकीकडे वळली आहे. पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीत बाहेरून नोकरी-व्यवसायासाठी स्थलांतरित झालेल्या मतदारांना टार्गेट करण्यासाठी मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी दोन दिवसांपासून येथे तळ ठोकला आहे.

Maval Lok Sabha election knocking on door | मावळ लोकसभा निवडणूक : गाववाली मंडळी, नात्यागोत्यांना साद, प्रचार यंत्रणा सज्ज

मावळ लोकसभा निवडणूक : गाववाली मंडळी, नात्यागोत्यांना साद, प्रचार यंत्रणा सज्ज

Next

हणमंत पाटील 

पिंपरी : पुणे व बारामती लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची फौज मावळच्या निवडणुकीकडे वळली आहे. पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीत बाहेरून नोकरी-व्यवसायासाठी स्थलांतरित झालेल्या मतदारांना टार्गेट करण्यासाठी मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी दोन दिवसांपासून येथे तळ ठोकला आहे. शिवाय महापालिका निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीतून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांना निवडणुकीच्या काळात तटस्थ राहण्यासाठी मॅनेज करणारी यंत्रणा कार्यरत झाली आहे.  

मावळ लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. राज्यातील तीन टप्प्यांतील निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे या भागातील राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मर्जी राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात डेरेदाखल झाले आहेत. आपल्या विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे काही नातेवाईक नोकरी व व्यवसायासाठी उद्योगनगरीत स्थलांतरित झाले आहेत. या सर्वांच्या निवासाचे पत्ते घेऊन ही मंडळी पिंपरी, चिंचवड, थेरगाव, वाकड, निगडी, आकुर्डी या भागात आली आहेत. कोणताही गाजावाजा न करता आपल्या गाववाल्या मंडळींची बैठक घेऊन त्यांना मतदान करण्यासाठी अपील केले जात आहे. 

तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिका २०१७ च्या निवडणूक काळात आमदार लक्ष्मण जगताप यांना मानणारा मोठा गट राष्ट्रवादीतून बाहेर पडला. हे नगरसेवक भाजपाच्या तिकिटावरून निवडून आल्याने महापालिकेत सत्तापालट झाला. तीन नगरसेवक असलेला भाजपाने ७७ चा जादुई आकडा गाठत एकहाती सत्ता मिळविली. परंतु, दोन वर्षांतील महापालिकेचा कारभार पाहून मूळ राष्ट्रवादीतून भाजपाचे गेलेले नगरसेवक वैतागले आहेत. आता पुन्हा त्यांना राष्ट्रवादीचा कारभार बरा होतो, असे वाटू लागले आहे. आताच्या भाजपामध्ये ६० टक्के नगरसेवक मूळचे राष्ट्रवादी व काँग्रेसचे आहेत. या नगरसेवकांचे आर्थिक हितसंबंध व नातेगोते राष्ट्रवादीच्या काही पुण्यातील नेत्यांशी आहेत. ही नेते मंडळी आपल्या नातेवाइकांची समजूत करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ठाण मांडून आहेत. त्याला मतदार किती प्रतिसाद देतात, यावर निवडणुकीची समीकरणे बदलणार आहेत. 

  • भाजपा व शिवसेना नेत्यांच्या दिलजमाईनंतर कार्यकर्त्यांच्या मनोमिलनास सुरुवात झाली. दरम्यान, भाजपा व आरपीआय या मित्रपक्षाने प्रभाग व वॉर्डनिहाय मतदारांशी संपर्क यंत्रणा सुरू ठेवली होती. त्याचा फायदा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना होण्याची शक्यता आहे. 

 

  • दरम्यान, राष्ट्रवादीचे स्थानिक नेते व पुण्यातील नगरसेवक महाआघाडीच्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत. मात्र, महायुतीकडून बाहेरून फौज मागविण्याऐवजी स्थानिक नेते, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा सोपविण्यात आली आहे. महाआघाडी व महायुती या दोघांकडून मावळची निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. त्यासाठी जोरदार यंत्रणा राबविण्यात येत आहे. मात्र, मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार यावरच  श्रीरंग बारणे व पार्थ पवार यांचे भवितव्य ठरणार आहे. 

 

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या नेते, कार्यकर्त्यांची एकजूट 

  • महायुतीची उमेदवारी जाहीर होईपर्यंत शिवसेना व भाजपामध्ये मावळ लोकसभेच्या उमेदवारीवरून तू तू मैं मैं सुरू होते. मात्र, खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी 
  • जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश व मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईने भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे हे पारंपरिक वाद बाजूला ठेवून नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी एकत्र आले.
  • त्यानंतर आमदार जगताप हे उमेदवारीअर्ज दाखल करताना, संकल्पनामा प्रकाशन, प्रचारफेरी व बैठकांना आवर्जून उपस्थित राहत आहेत. 
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, पालकमंत्री गिरीश बापट, गिरीश महाजन, लक्ष्मण जगताप, अ‍ॅड. सचिन पटवर्धन, गुलाबराव पाटील, रवींद्र मिर्लेकर अशी फौज मावळात येऊन गेली. 

 

महाआघाडीची फौज

  • शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, विश्वजित कदम, शरद रणपिसे, दिलीप सोपल, राहुल मोटे, राणा जगजितसिंह, भास्कर  जाधव, वंदना चव्हाण अशी फौज मावळ लोकसभा मतदारसंघात आली. 

Web Title: Maval Lok Sabha election knocking on door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.