Lok Sabha Election 2019: माढ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरेना; भाजपाचं गुपित कळेना!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 06:59 AM2019-03-14T06:59:46+5:302019-03-14T07:00:21+5:30

मुख्यमंत्री अन् संजय शिंदेंची भेट; मामांना लढवायचीय विधानसभा

Lok Sabha Election 2019: NCP candidate in the Mare; BJP secret! | Lok Sabha Election 2019: माढ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरेना; भाजपाचं गुपित कळेना!

Lok Sabha Election 2019: माढ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरेना; भाजपाचं गुपित कळेना!

- नितीन काळेल

सातारा : माढा मतदारसंघाचा तिढा सतत वाढत असून, राष्ट्रवादीचा उमेदवार ठरता ठरेना. तर दुसरीकडे भाजपचा बहुतांशी निर्णय राष्ट्रवादीवर अवलंबून असल्याने त्यांचंही गुमान कळेना, अशी स्थिती आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट झाली; पण मामांना विधानसभा निवडणूक लढवायची असल्यामुळे तिढा कायम असून, अशा घटनांमुळे दररोज घडतंय बिघडतंय असे चित्र आहे.

मागील दोन निवडणुकीपेक्षा यंदाची माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आणखी रंगतदार बनू शकते, असेच वातावरण आहे. कारण, आघाडीत मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असून, सतत नवनव्या उमेदवारांची नावे समोर येत आहेत. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे नाव मागे पडल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार हेच माढ्यातून उतरू पाहत होते; पण मतदारांचा वाढता विरोध पाहता त्यांनीही माढ्यातून काढता पाय घेतला. त्यामुळे आताही राष्ट्रवादीकडून खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांचे पुत्र रणजितसिंह यांचे नाव उमदेवार म्हणून पुढे आले; पण ठोस असे काहीच होत नाही. त्यातच प्रभाकर देशमुख यांनाही लॉटरी लागेल, असे सांगण्यात येते; पण मोहिते-पाटील हे देशमुखांचे काम करणार का? हाही प्रश्न आहे. तसेच मोहिते-पाटील पितापुत्रापैकी कोणा एकाला उमेदवारी मिळाली तर माळशिरस तालुक्यातील त्यांचे विरोधक जोरदार विरोध करणार, हे ठरलेले आहेच. तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे हेही मोहिते-पाटील यांना सहकार्य करण्याची आशाही नाही. अशा स्थितीत राष्ट्रवादीला उमेदवार देताना व निवडून आणताना यावेळी खूपच दमछाक करावी लागणार आहे. त्यासाठी सद्य:स्थितीत अनेकांना मानवणारा असा उमेदवार देणेच राष्ट्रवादीला परवडणार आहे.

दुसरीकडे भाजपचे बरेचसे गणित हे राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देते, त्यावर अवलंबून आहे. सध्या फक्त भाजप बघ्याच्या भूमिकेत आहे. शरद पवार हे उतरणार म्हटल्यावर भाजपात शांत वातावरण होते; पण पवारांनी माघार घेतल्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख चांगलेच अ‍ॅक्टीव्ह झाल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तोडीस तोड उमेदवार देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यावेळी माढा मतदारसंघातील दुष्काळात कमळ फुलविण्याची आलेली संधी दवडायची नाही, अशीच तयारी असल्याचे दिसून येत आहे. अशा सर्व घनशाघोळात माढा मतदारसंघातील राजकीय चित्र दररोज नवनवे वळणे घेताना दिसत आहे.

माढ्यात सध्या राजकीय चित्र सतत बदलत असून, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह हे भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे माढा मतदारसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीतून कोण आणि भाजप-सेना युतीतून कोण रिंगणात उतरणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, शरद पवार यांनी माढ्यातून लढणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर इच्छुकांनी जमवाजमव करायला सुरुवात केली आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019: NCP candidate in the Mare; BJP secret!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.