Exclusive: मोदी सरकार बनवू शकणार नाहीत, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली येईल यूपीएचे सरकार - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 04:51 AM2019-04-27T04:51:29+5:302019-04-27T22:59:38+5:30

देशात आज परिवर्तनाचे वातावरण असल्याचा राहुल गांधींचा दावा

lok sabha election 2019 narendra modi will not be able to form govt congress led upa will come to power says rahul gandhi | Exclusive: मोदी सरकार बनवू शकणार नाहीत, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली येईल यूपीएचे सरकार - राहुल गांधी

Exclusive: मोदी सरकार बनवू शकणार नाहीत, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली येईल यूपीएचे सरकार - राहुल गांधी

Next

- शीलेश शर्मा 

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर केंद्रात मोदी वा भाजपचे सरकार येणार नाही. काँग्रेस मित्रपक्षांसोबत नव्या सरकारची स्थापना करेल, असा दावा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत गुंतलेल्या राहुल गांधी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, बेरोजगार, शेतकरी, महिला, दलित-पीडित आणि गरिबांना आमच्या सरकारमध्ये ‘न्याय’ मिळेल. न्याय योजनेसाठी नवा कर लावणार नाही; तसेच प्राप्तिकर वा अन्य करांत वाढ केली जाणार नाही. आपल्या योजना गांधी यांनी स्पष्टपणे मांडल्या. आत्मविश्वासाने निवडणूक प्रचारात उतरलेल्या राहुल गांधी यांनी विशेष विमानात ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे शीलेश शर्मा यांच्या अनेक प्रश्नांवर स्पष्टपणे चर्चा केली. कठीण प्रश्नांना त्यांनी सहजपणे आणि ठामपणे उत्तरे दिली. उत्तरांत काही अंतर्विरोध नव्हता. त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, हा देश प्रेम, सद्भाव, एकमेकांसह प्रगती करण्यातून पुढे जाऊ शकतो...

सत्तेत आल्यास ‘न्याय’ योजना लागू करण्याची घोषणा तुम्ही केली आहे. त्यानुसार गरीब कुटुंबाला वर्षाला ७२ हजार रुपये देण्याचे  आश्वासन आहे. ही योजना केंद्राची असेल की, राज्यांचाही सहभाग असेल? जिथे काँग्रेसचे सरकार नाही तिथे ती कशी लागू करणार?
उत्तर : आम्ही प्रदीर्घ काळ या मुद्द्यावर अर्थतज्ज्ञांशी चर्चा केली. ही न्याय योजना मैलाचा दगड ठरेल, अशी माझी खात्री आहे. त्याद्वारे सर्वात गरीब २० टक्के लोकांना (सुमारे पाच कोटी कुटुंबे येतील) दरवर्षी ७२ हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतील. न्याय योजना हा काँग्रेसचा गरिबीवर अंतिम प्रहार असेल. तुम्ही लोकांच्या खिशात पैसे टाका. त्यातून लोक वस्तू विकत घेतील. त्यामुळे उत्पादनवाढ होईल आणि सुरू होईल बळकट आर्थिक चक्र. गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या चुकीच्या धोरणांनी लोकांच्या खिशातून पैसे काढून घेतले. म्हणजे नोटाबंदी, गब्बर सिंग टॅक्स. परिणामी अनौपचारिक, असंघटित क्षेत्राला मोठाच धक्का बसला. आम्ही ‘न्याय’द्वारे गरिबांना किमान उत्पन्नाची हमी देऊ आणि अर्थव्यवस्थेला रुळावर आणू. मोदी सरकारने ज्या पद्धतीने जीएसटी लागू केला, तसे करणार नाही. सुरुवातीला पायलट प्रोजेक्टच्या स्वरूपात योजना काही ठिकाणी राबवू. तिच्यात काही अडथळे आल्यास ते समजून घेऊ न दूर करू. त्यानंतर योजना संपूर्ण देशात लागू करू. आम्हाला विश्वास आहे की, २०३० पर्यंत आम्ही ‘न्याय’द्वारे देशातील गरिबी संपवून टाकू. मी हे स्पष्ट करतो की, हा पैसा ज्या चोर उद्योगपतींना मोदी यांनी दिला, त्यांच्याकडून आम्ही आणू व न्याय योजनेत वापरू. दहा वर्षांच्या यूपीए सरकारच्या काळात आम्ही १४ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर आणले आणि आता गरिबांना गरिबीच्या मुळातूनच बाहेर आणू. आमच्याकडे जी आकडेवारी आहे त्यानुसार २५ कोटी लोक आजही गरिबीचा फटका सोसत आहेत. नोटाबंदी आणि गब्बर सिंग टॅक्सद्वारे मोदी यांनी लोकांना गरीब केले.

देशाच्या महसुलावर या योजनेचा किती भार पडेल? त्याची भरपाई कुठून करणार?
आमच्या मते या योजनेमुळे ३.६ लाख कोटी रुपयांचा भार पडेल. हा भार जीडीपीच्या पहिल्या वर्षीच्या एक टक्क्यापेक्षाही कमी असेल व दुसऱ्या वर्षानंतर दोन टक्क्यांपेक्षाही कमी भार पडेल. जसजशी ही योजना पुढे जाईल, तसा जीडीपीवरील भार कमी होईल. कारण योजना सुरू झाल्यानंतर दरवर्षी गरिबांची संख्या कमी होऊ लागेल. ही योजना ठरवताना आम्ही वारंवार तिचा फक्त अभ्यास केला व तपासणीही करून घेतली. त्यामुळे ती राबवताना कोणतीही चूक होणार नाही.

या योजनेचा भार प्राप्तिकर दात्यांवर टाकणार?
मी मतदारांना स्पष्ट सांगू इच्छितो की, आम्ही या योजनेसाठी प्राप्तिकरात वाढ करणार नाही वा अतिरिक्त करही लावणार नाही.

वायनाडमधून तुम्ही निवडणूक लढत आहात. भाजपचे म्हणणे आहे की, त्यामुळे तुमचे दुबळेपण व अमेठीतून पराभूत होण्याची भीती व्यक्त होते. हा भ्रम कसा दूर करणार? अमेठीवासीयांना शंका आहे.
कोणताही भ्रम नाही. मी त्यांच्यासोबतच आहे, हे अमेठीची जनता जाणून आहे. अमेठीची जनता मला प्रेमाने, जिव्हाळ्याने अनेक वर्षांपासून सहकार्य करीत आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फूट पाडू पाहत आहे. त्यामुळे मी केरळमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण देश एक व एकत्र आहे, असा संदेश देणे, हाच वायनाडमधून निवडणूक लढविण्याचा अर्थ आहे. मोदी सरकार, भाजप व संघ देशाच्या संस्कृती व भाषेवर आक्रमण करीत असल्याचे दक्षिण भारतातील जनतेला वाटते. मला जनतेच्या भावनांची जाणीव आहे. वायनाडमधून निवडणूक लढवून दक्षिण भारतातील जनतेबद्दल सर्व भारतीयांना आदर व आपुलकी आहे, हे दाखवून देण्याचा माझा प्रयत्न आहे.

उत्तर प्रदेशात सपा-बसपा-काँग्रेस एकत्र निवडणूक लढले असते तर भाजपला रोखण्यात मदत झाली असती..?
काँग्रेस-सपा-बसपा आणि आरएलडीसह सर्व पक्ष एक झाले असते तर उत्तर प्रदेशात भाजपचा पूर्णत: पाडाव झाला असता. पण माझी आजही खात्री आहे की, सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष उत्तर प्रदेशात निवडणूक जिंकतील. देशात भाजपचा पराभव करायचा, यावर सर्व विरोधी पक्षांत एकमत आहे. तगडा उमेदवार देऊन भाजपला पराभूत करण्याचा प्रयत्न आहे. सपा-बसपाला वाटले की, तेच भाजपला हरवू शकतात. पाहू या काय होते.

प. बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांत आपण भाजपला रोखले तर भाजप सत्तेबाहेर होईल, असे आपणासही वाटते का?
संपूर्ण देशात आणि प्रत्येक राज्यात लोक मोदी व भाजपच्या विरोधात आहेत. जनता मोदी व भाजपला हमखास धडा शिकवेल; हे २३ मे रोजी निकालातून सिद्ध होईल. 

बालाकोटमधील जवानांची कारवाई आणि पुलवामातील जवानांच्या हौतात्म्याच्या नावाने पंतप्रधान मोदी मते मागत असल्याचा आरोप तुम्ही करीत आहात..?
हा प्रकार घृणास्पद आहे. यातून अशा व्यक्तीची संवदेनशीलताच नष्ट झाल्याचे दिसते. आमची सशस्त्र दले राजकारणापेक्षाही श्रेष्ठ आहेत. त्यांचा सन्मान राखायलाच हवा. राजकीय भाषणात त्यांचा उल्लेख होऊ नये. केवळ मते लाटून सत्ता काबीज करण्यासाठी काही जण त्यांचा वापर करीत आहेत. पुलवामा आणि बालाकोटनंतर सर्व विरोधी पक्ष सरकारच्या पाठीशी होते. काही बाबी राजकारणापेक्षा महत्त्वाच्या असतात; परंतु, पंतप्रधान मोदी व भाजपने काय केले, हे सर्वश्रुत आहे. त्यांनी याला राजकीय रंग दिला आणि विरोधी पक्षांवर टीका करण्यासाठी हत्यार बनविले. आमचे बंधू असलेले जवान पुलवामात शहीद झाले; तर दुसरीकडे जवानांनी बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला. जवानांचे श्रेय हिसकावून मते लाटण्यासाठी त्याचा वापर करायचा, हा मोदींचा प्रकार चुकीचा आहे.

मतांच्या ध्रुवीकरणासाठी मोदी व भाजप प्रचारातील भाषणांचा हत्यार म्हणून जो वापर करीत आहेत, त्याची तीव्रता बोथट कशी करणार?
भाजपचे राजकारणच समाजात द्वेष आणि फूट पाडणारे आहे. समाजांना आपापसात लढविण्यात त्यांना स्वारस्य आहे. त्यामुळे ते लोकांसाठी विकास करण्यात अपयशी ठरले. त्यांना जी शिकवण मिळाली, त्या मार्गाने ते जात आहेत. द्वेष, क्रोध आणि भय हे मानवतेचे मोठे शत्रू आहेत. याला विरोध करणे, त्याविरुद्ध उभे ठाकणे हाच मार्ग आमच्याकडे आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे आले पाहिजे. काँग्रेसद्वारे हा आवाज बुलंद होतो, हे जनता जाणून आहे. काँग्रेस सर्व धर्म, भाषा, संस्कृतीवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. लोकांमध्ये भय, क्रोध आणि फूट पाडू पाहणाºया विचारांविरुद्ध काँग्रेस अखेरपर्यंत लढेल.

नोटाबंदी घोटाळा असल्याचा आरोप तुम्ही सतत केला..?
नोटाबंदी आजवरचा सर्वात मोठा घोटाळा आहे. भाजप याला यश मानते; परंतु लाखो गरीब लोकांना आयुष्यभराची बचत काही मिनिटांत गमवावी लागली, ही वस्तुस्थिती आहे. छोटे उद्योग बंद पडले, हजारो लोकांचा रोजगार गेला. आकडेवारी पाहिल्यास नोटाबंदीनंतर ५० लाख लोकांचा रोजगार गेला. विकास दर घसरला. रिझर्व्ह बँकेत ९९ टक्के नोटा परत आल्या. कोणता काळा पैसा नष्ट झाला, हा माझा सवाल आहे. मला वाटते की, सकाळी झोपेतून उठल्यानंतर मोदी यांनी आरबीआयचा सल्ला न घेता नोटाबंदीचा निर्णय घेतला. नोटाबंदी अपयशी ठरल्याने आम्ही न्याय योजनेतून दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीद्वारे लोकांकडून जे हिसकावून घेतले त्याची आम्ही न्याय योजनेतून भरपाई करू.

भाजपचे नेते तुम्ही व प्रियांका यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत..?
मोदी व भाजप सत्तेवर आल्यापासून देशात राजकीय संवादाचा स्तर घसरला आहे. भाजपचे लहान नेतेही बड्या नेत्यांकडून धडे घेत आहेत. बडे नेतेच सातत्याने विरोधकांवर व्यक्तिगत हल्ले करत आहेत. माझ्यावरील टीका रोखण्याचा मार्ग माझ्याकडे नाही. मी केवळ त्यांच्या धोरणांबाबत त्यांच्यावर टीका करू शकतो आणि व्यक्तिगत टीकेपासून स्वत:ला दूर ठेवू शकतो.

ईव्हीएमच्या निष्पक्षतेबाबत काय सांगाल?
ज्या ज्या भागांतून ईव्हीएमबाबत तक्रारी आल्या आहेत, त्यातून एकच मुद्दा समोर आला आहे की, कोणत्याही पक्षाला मतदान केल्यास ईव्हीएममुळे ते भाजपला जात आहे. पूर्ण देशात ही स्थिती आहे व वास्तव आहे. जेव्हा एवढे लोक तक्रार करतात, तेव्हा नक्कीच काही समस्या आहे.

निवडणूक प्रचारात तुम्ही व प्रियांका गांधी यांच्याशिवाय पक्षाचे अन्य नेते का दिसत नाहीत?
आमचे सर्व नेते देशभर प्रचार करत आहेत. आपण जाऊन पाहा. राजस्थान, पंजाब, कर्नाटक सर्व ठिकाणी नेते दिसून येतील. आम्ही भाजपप्रमाणे काम करत नाही. त्यांचे सर्व नेते केवळ मोदींवर अवलंबून आहेत. मोदी लाट हाच ते विजयासाठी आधार मानत आहेत.

मागील निवडणुकीत काँग्रेसने वृत्तपत्रे व अन्य प्रसारमाध्यमांतून जसा प्रचार केला, तसा यंदा का दिसत नाही?
पक्षाचा जाहीरनामा व आपले विचार यांचा प्रचार व्हायला हवा. आम्ही मतदारांसाठी काय करू इच्छितो, ते त्यांना समजायला हवे. आम्ही भाजपप्रमाणे नाही. भाजप मोदी प्रचारासाठी हजारो कोटी रुपये खर्च करत आहे. त्यांचा जाहीरनामा पाहिलात? देशात बदल घडवून आणता येईल, असे काहीच त्यात नाही. पण भाजपला हजारो कोटी रुपये खर्च करण्यापासून रोखणारे आम्ही कोण?

इराणकडून तेल खरेदी करण्यावर अमेरिकेने निर्बंध आणले आहेत. आपण इराणकडून तेल आयात न थांबवल्यास आपल्यावर निर्बंधांची धमकी अमेरिकेने दिली आहे. याकडे आपण कसे पाहता?
मोदींचे नेतृत्व आणि त्यांचे सरकार यामध्ये देशाचे हित आणि सुरक्षा याला स्थान नाही. अन्य देशांशी संबंध सुधारण्याबाबतही धोरण नाही. सरकारचे परराष्ट्र धोरण काय आहे? असे वाटते की, मोदी यांच्या मुत्सद्देगिरीचा अर्थ केवळ जगातील नेत्यांची गळाभेट घ्या, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या, त्यांच्यासह चहा घ्या, असा आहे. चीन व पाकिस्तानशी आज आमचे कसे संबंध आहेत? शेजारी देशांशी संबंध कसे आहेत? जी घसरण दिसत आहे तीच मोदींची मुत्सद्देगिरी आहे काय?

आपल्या जाहीरनाम्यात मीडिया क्रॉस फोल्डिंगचा उल्लेख आहे. हा मीडियावर कंट्रोल करण्याचा प्रकार आहे?
आम्ही जे काही करू ते चर्चेद्वारे. मोदी यांनी मीडियाला दाबण्याचा प्रकार केला आहे. काँग्रेस सत्तेत असताना आपणास बोलण्याचे स्वातंत्र्य होते, हे तुम्हीही अनुभवले असेल. अनेकदा आमच्याबाबत चुकीचे लिहिले गेले असेल, पण आम्ही मीडियावर आक्रमण केले नाही.

शेतकऱ्यांसाठी काय आहे योजना?
या सरकारने शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली नाही. अगोदर त्यांना विश्वास द्यावा लागेल की, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यांच्या अडचणी आम्ही सोडवू इच्छितो. आमचे दोन अर्थसंकल्प असतील. एक राष्ट्रीय अर्थसंकल्प आणि दुसरा शेतकऱ्यांसाठी. यात शेतकऱ्यांसाठी एक वर्षाची योजना तयार करण्यात येईल. यात किमान आधारभूत किमतीत वाढ होईल, फळांवर प्रक्रिया करणारे प्लांट उभे करण्यात येतील, कर्ज माफ करण्यात येईल. याची पूर्ण माहिती आम्ही सुरुवातीलाच देऊ. कर्जाची परतफेड न केल्यास आम्ही शेतकऱ्यांना तुरुंगात टाकणार नाही. शेतकऱ्यांना एक विश्वास द्यायचा आहे की, तेही हवाई दल, सैन्य, नौदलाप्रमाणे महत्त्वाचे आहेत. दुसऱ्या टप्प्यात फूड प्रोसेसिंगवर लक्ष केंद्रित करायचे आहे. कारखान्यांना शेतीजवळ न्यायचे आहे. शेतात तंत्रज्ञान वापरायचे आहे. आमचे शेतकरी जे पिकवितात ते देशातील डायनिंग टेबलवर आणि मोठमोठ्या देशांच्या डायनिंग टेबलवर पोहोचवायचे आहे. यासाठी कोल्ड चेन बनविण्याची गरज आहे. स्टोरेज बनविण्याची गरज आहे. पण, अगोदर शेतकऱ्यांना विश्वास द्यावा लागेल की, आपण हे करू शकता. हरित क्रांती काय होते? हरित क्रांती शेतकऱ्यांना विश्वास देण्याचीच प्रक्रिया होती.

मोदी सरकारने दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे सांगितले होते. आपण बेरोजगारी समाप्त करण्यासाठी काय करणार?
मोदी यांनी अर्थव्यवस्थेला नोटाबंदी आणि जीएसटीच्या माध्यमातून दोन-तीन मोठे धक्के दिले. नोटाबंदीतून सर्वांच्या खिशातून पैसा काढून घेतला आणि तो अनिल अंबानी, मेहुल चोक्सी, नीरव यासारख्या लोकांच्या खिशात टाकला. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे आणखी एक परिणाम असा झाला की, जे आमच्या गावात आणि शहरात लोक आहेत, जे दुकानदार आहेत त्यांच्या खिशातून मोेदी यांनी पैसा काढला, तेव्हा लोकांनी खरेदी बंद केली. त्यामुळे वस्तंूची मागणी घसरली. त्यामुळे कारखान्यांनी काम करणे बंद केले. मालकांनी तरुणांना घरी पाठवले. परिणामी बेरोजगारी वाढली. आम्ही न्याय योजना घेऊन येत आहोत. यामुळे अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित होईल. कारखान्यात काम सुरू होईल. तरुणांना रोजगार मिळेल. जाहीरनामा तयार करताना आम्ही लाखो लोकांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, आम्ही व्यवसाय सुरू करू इच्छितो. पण, व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रथम १० ते १५ सरकारी खात्यांतून परवानगी घ्यावी लागते. तिथे लाच घेतली जाते. यासाठी जाहीरनाम्यात काही करा. आम्ही यासाठी ठरविले आहे की, जर एखादा तरुण कोणताही व्यवसाय करू इच्छित असेल तर त्याला तीन वर्षांसाठी सरकारी खात्यातून कोणतीही परवानगी घ्यायची गरज नाही. तीन वर्षांनंतर जेव्हा आपला व्यवसाय उभा राहील, ३०-४० लोक आपल्यासाठी काम करतील; त्यानंतर परवानगी घ्या. व्यवसाय तीन वर्षे चालला नाही तर काळजीचे कारण नाही. एका तरुणाने सांगितले की, मोदी सरकारने अनिल अंबानी यांना ४५,००० कोटी रुपये दिले. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला ३५,००० कोटी रुपये दिले. विजय मल्ल्याला १०,००० कोटी रुपये दिले. ते पळून गेले. त्यांनी किती तरुणांना रोजगार दिला? नीरव मोदीने १००- २०० लोकांना रोजगार दिला असेल. पण देशातून ३५,००० कोटी कमविले. जो पैसा या १०-१५ भांडवलदारांना दिला तो पैसा विनापरवानगी व्यवसाय सुरू करणाऱ्यांना बँक कर्जाप्रमाणे द्या. आम्ही म्हणालो, मंजूर आहे. पूर्ण बँकिंग सिस्टीम या व्यावसायिकांवर फोकस करेल.

काश्मीरमधील स्थिती वाईट आहे. काश्मीरची स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही काय कराल?
आम्ही २००४ ते २०१४ पर्यंत जम्मू-काश्मीरवर रणनीतीनुसार काम केले. टॅक्टिकल काम नाही. फसवाफसवी नाही. जम्मू-काश्मीर हिंदुस्थानसाठी खूपच महत्त्वाचे आहे. आम्ही लक्षावधी महिलांना बचत गटांद्वारे बँकांना जोडले, सगळ्यात मोठे उद्योगपती रतन टाटा यांना श्रीनगरला घेऊन गेलो. मला हे दाखवायचे होते की हा हिंदुस्थान आहे. पंचायत राज निवडणुका घेतल्या आणि अतिरेक्यांची जागाच नाहीशी केली. जनतेशी संवाद साधला. दहशतवादाबाबत झीरो टॉलरन्स धोरण राबवले. अतिरेकी हिंदुस्थानच्या लोकांना ठार मारत असतील तर झीरो टॉलरन्स. एक सेकंदही दहशतवाद सहन करणार नाही. जम्मू-काश्मीरच्या जनतेला सर्वांशी जोडू. मोदींनी राजकीय लाभासाठी पीडीपीबरोबर युती केली. ही युती होताच मोदी यांनी दहशतवाद्यांसाठी स्वत: जम्मू-काश्मीरची दारे उघडून दिली. अरुण जेटली माझ्या घरी एके दिवशी आले असताना त्यांना मी म्हटले की, हे तुम्ही हिंदुस्थानचे फार मोठे व्यूहरचनात्मक नुकसान करीत आहात. त्यावर जेटली म्हणाले, तुम्हाला माहिती आहे की काश्मीरमध्ये काय सुरू आहे. मी म्हणालो, काश्मीरमध्ये आग लागणार आहे. ते म्हणाले, कोणतीही आग लागणार नाही. सगळे कसे शांत शांत आहे. मी त्यांना विचारले, तुम्ही काश्मीरमध्ये किती लोकांशी बोलला आहात? माझे म्हणणे हे आहे की राजकीय संधीसाधूपणामुळे काश्मीरची खूपच हानी झाली आहे. २००४ ते २०१४ दरम्यान आमचे जे धोरण होते ते यशस्वी होते. तुम्ही स्वत: म्हणाला आहात की, २०१४ मध्ये दहशतवाद संपला आहे. श्रीनगरला ५० विमान उड्डाणे व्हायची. पण मोदी व्यवस्थितरीत्या काहीही करीत नाहीत.

तुम्ही राइट टू फूड दिले, राइट टू इन्फर्मेशन दिले व असे अनेक निर्णय घेतले. न्यायपालिकाही उत्तर देण्यास बांधील असावी, असे वाटते का?
हे बघा, मोदीजींनी हिंदुस्थानच्या इतिहासात पहिल्यांदा संस्थांवर हल्ले केले, न्यायपालिकेवर आक्रमण केले, निवडणूक आयोगावर आक्रमण केले, नोकरशाहीवर आक्रमण केले, नियोजन आयोगावर आक्रमण केले. या संस्था हिंदुस्थानच्या घटनेच्या प्रतीक आहेत. सत्ता मिळाल्यावर या संस्थांची स्वायत्तता (उदा. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य, वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य, निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य, नियोजन आयोगाची स्वायत्तता) आम्ही बहाल करू.

निवडणूक आयोगाबद्दल तुमचे मत काय?
तुम्ही ते बघतच आहात. राफेलवरून आपण देशात वातावरण तयार केले. अन्य विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलला नाही. काय कारण आहे?
प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो. मजबुरी असते. नरेंद्र मोदी माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत नाहीत का? पण मी घाबरत नाही. राफेलमध्ये चोरी झाली, हे स्पष्ट आहे. संरक्षण मंत्रालयाच्या कागदपत्रांतच लिहिलेय की, मोदींनी समांतर सौदेबाजी केली. फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी म्हटले की, मोदी यांनीच सांगितले की, अनिल अंबानी यांना कंत्राट देण्यात यावे. विमान १६00 कोटींना खरेदी केले जाईल, हिंदुस्थानात बनणार नाही. पर्रीकरांनीही म्हटले होते की, दुसरा करार मला माहिती नाही. त्यांना माहीत होते की, याचा तपास होईल. तपास होईल, तेव्हा दोनच नावे समोर येतील अनिल अंबानी आणि नरेंद्र मोदी.

दिल्लीत आम आदमी पार्टीसोबत समझोता झाला असता तर भाजपला चांगली टक्कर देता आली असती..?
काँग्रेस नेत्यांचा विरोध डावलून मी समझोत्याला हिरवा कंदील दिला होता. ‘आप’ला ४ जागा आणि काँग्रेसला ३ जागा असे ठरलेही होते. केजरीवाल यांनी मध्येच हरयाणा व गोव्यात समझोत्याची अट घातली. त्यामुळे समझोता होऊ शकला नाही.

मतदान झालेल्या तीन टप्प्यांत काँग्रेसला किती जागा मिळतील?
संख्याबळाची गोष्ट सोडा. लोकांचा मूड ओळखा. आज देशात परिवर्तनाचे वातावरण दिसत आहे. यामागे तीन कारणे आहेत. एक म्हणजे वाढलेली बेरोजगारी, दुसरे संकटातील शेती आणि तिसरे म्हणजे राफेल घोटाळा.


मोदी पुन्हा सत्तेवर येतील, असे आपणास वाटते का?
किती जागा येतील, हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही. पण, मोदी आणि भाजपची सत्ता पुन्हा येणार नाही, एवढे मी सांगू शकतो. संपुआ सरकार बनवेल. तुम्ही मोदींचा चेहरा पाहा, ते तणावात आहेत. डिस्टर्ब आहेत. मी जेथे जातो, तेथे लोकांशी बोलतो. लोक सांगतात की, काँग्रेस वर चढत आहे. भाजप खाली जात आहे. आता एकदम किती जागा येतील, हे मात्र मला माहिती नाही.

आपल्या दृष्टीने प्राधान्याचे पाच कोणते विषय आहेत?
आमचा भर रोजगारनिर्मिती, शेतकऱ्यांच्या समस्येवर तोडगा काढणे, अर्थव्यवस्था रुळावर आणणे आणि महिलांचे सबलीकरण यावर असेल. हे न्याय योजनेद्वारे केले जाईल. जीएसटीत बदल करून सुटसुटीतपणा आणणे, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बजेट, सरकारी विभागांतील रिक्त २४ लाख पदांची भरती आणि महिला आरक्षण विधेयक मंजूर करून घेणे यांना आम्ही प्राधान्य देऊ .

संपूर्ण देशाची विभागणी केल्याचा आरोप तुम्ही करत असता...
होय. या देशाची विभागणी दोन भागांत केली गेली आहे. त्यात एकीकडे १५-२० सर्वात श्रीमंत लोक़ अनिल अंबानी, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्यासारखे लोक आणि दुसरीकडे उर्वरित देश. देशाचे दोन भाग झाले आहेत. त्यामागे लॉजिक असे आहे की, १५ ते २0 लोक लाखो कोटी रुपये भारतातून घेतात. या १५-२0 लोकांचे नेते नरेंद्र मोदी आहेत. नीरव मोदी, मेहुल चोकसी, अनिल अंबानी आणि विजय मल्ल्या यांच्यासोबत माझे फोटो कधी आपण पाहिले आहेत का? मात्र पंतप्रधान या लोकांना गळ्याशी धरतात. त्यांचे काही तरी नाते जरूर आहे.

Web Title: lok sabha election 2019 narendra modi will not be able to form govt congress led upa will come to power says rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.