lok sabha election 2019 its with luck that I made it out says amit shah after violence took place in bjps roadshow | नशीब बलवत्तर होतं म्हणून वाचलो; अमित शहांची आपबिती
नशीब बलवत्तर होतं म्हणून वाचलो; अमित शहांची आपबिती

नवी दिल्ली: भाजपा अध्यक्ष अमित शहांनी कोलकात्यातल्या रोड शोमध्ये झालेल्या हिंसाचारावरुन तृणमूल काँग्रेसवर शरसंधान साधलं. भाजपाच्या रोड शोमध्ये झालेल्या हिंसेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तृणमूल काँग्रेसला पराभव स्पष्ट दिसत असल्यानं हिंसाचाराचा आधार घेतला जात आहे. पण पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आवश्यकता नाही. राज्यातलं तृणमूल सरकार जनताच हटवेल, असं शहा म्हणाले. 

नशीब बलवत्तर होतं म्हणून काल मी वाचलो, अशा शब्दांत शहांनी आपबिती सांगितली. 'काल कोलकात्यात भाजपाचा रोड शो सुरू होण्याआधी तृणमूलच्या गुडांनी भाजपाचे पोस्टर फाडले. पण पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. भाजपाचा रोड शो सुरू होताच तृणमूलकडून हिंसाचार सुरू झाला. त्या ठिकाणी सीआरपीएफचे जवान नसते, तर तिथून निघणं कठीण झालं असतं. तृणमूलच्या गुंडांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. माझं नशीब चांगलं असल्यानं मी तिथून योग्य वेळी निघालो,' असं शहा म्हणाले. 

संपूर्ण देशात निवडणूक झाली. पण केवळ पश्चिम बंगालमध्येच हिंसाचार का झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही देशभरात निवडणूक लढवली. पण तिथे हिंसाचार झाला नाही. कारण तिथे तृणमूल नाही. फक्त पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला. कारण केवळ याच राज्यात तृणमूल सत्तेत आहे, अशी टीका शहांनी केली. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांनाही लक्ष्य केलं. दीदी, मी स्वत:ला देव समजत नाही. पण तुम्हीही समजू नका. कालच्या रॅलीत हिंसाचार झाला. अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या. पण हिंसाचाराचा जितका चिखल फेकाल, तितकं कमळ जोमानं फुलेल, हे दीदींनी लक्षात ठेवावं' असं शहा यांनी म्हटलं. 
 


Web Title: lok sabha election 2019 its with luck that I made it out says amit shah after violence took place in bjps roadshow
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.