Lok Sabha Election 2019: मुंबईत युतीच्या विरोधात लागणार काँग्रेस आघाडीचा कस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 01:56 AM2019-03-11T01:56:37+5:302019-03-11T07:03:11+5:30

मनसे, बहुजन आघाडी, एमआयएम फॅक्टर कितपत ठरणार प्रभावी?

Lok Sabha Election 2019: The Congress is all set to fight against the alliance in Mumbai | Lok Sabha Election 2019: मुंबईत युतीच्या विरोधात लागणार काँग्रेस आघाडीचा कस

Lok Sabha Election 2019: मुंबईत युतीच्या विरोधात लागणार काँग्रेस आघाडीचा कस

Next

मुंबई : निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख जाहीर करताच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात म्हणजेच २९ एप्रिलला मतदान होईल. गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहाही जागा भाजपा शिवसेना युतीच्या पारड्यात गेल्या होत्या. यंदा मात्र युतीला आपल्या जागा राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. युती आणि आघाडीच्या उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे.

दहा वर्षांपूर्वी २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहाच्या सहा जागा आघाडीला मिळाल्या होत्या. तर, २०१४ साली त्याच्या नेमके उलट निकाल आले आणि सर्व जागांवर भाजपा शिवसेना युतीने विजयाची नोंद केली. त्याला मोदी लाट आणि नव मतदारांचा घटक कारणीभूत ठरला. मागील दोन निवडणुकांप्रमाणे यंदाही एकाच पारड्यात सहा जागा जाणार की नवी समीकरणांची नोंद होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपाने पद्धतशीरपणे संघटनात्मक ताकद वाढवली. त्याचा परिणाम पुढे विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत भाजपाला झाला. तर, २०१४ सालच्या पराभवानंतर मरगळलेल्या काँग्रेसमध्ये बऱ्यापैकी धुगधुगी निर्माण झाली आहे. त्यातच, राहुल गांधी यांच्या मुंबईच्या सभेनंतर पक्षातील गटबाजी काहीशी मागे पडल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. शिवसेनेचा परंपरागत मतदार, भाजपाची वाढलेली ताकद, यासमोर काँग्रेसचा कस लागणार इतके नक्की. त्यातच, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचा सस्पेंन्स अद्याप कायम आहे. युती आणि आघाडीतील सरळ लढतींना प्रभावित करण्याची क्षमता या दोन्ही घटकांत आहे. मनसेने मोदीविरोधात बिगुल फुंकलेच आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदानावरील याचा परिणाम पाहावा लागणार आहे. तर, दुसरीकडे प्रकाश आंबेडकर आणि असदद्दीन ओवेसींच्या वंचित बहुजन आघाडीला आपल्याकडे वळविण्याचे मोठे काम काँग्रेस आघाडीला करावे लागणार आहे.

दक्षिण मुंबई
युतीच्या जागा वाटपात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे जातो. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी काँग्रेसचे दिग्गज उमेदवार मिलींद देवरा यांचा पराभव केला होता. कॉस्मोपॉलीटन चेहरा असलेल्या या मतदारसंघात गुजराती, राजस्थानी आणि मुस्लिम मते मोठ्या प्रमाणावर आहेत. युती झाली असली तरी भाजपाची पाठराखण करणारा हा वर्ग धनुष्य बाणासाठी बाहेर काढण्याचे मोठे आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे. शिवडी, वरळी या विधानसभा मतदारसंघासह मराठी पट्टयात शिवसेनेची स्वत:ची हक्काची मते आहेत. त्यामुळे उच्चभ्रू वर्गातील तसेच गुजराती, मारवाडी मते खेचण्याचे आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे. काँग्रेसच्या देवरा यांनी हक्काचा मतदारसंघ परत खेचण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने ओवेसींचा पतंग त्यांना आडवा जाणार का, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. मुस्लिम मतांमध्ये फूट पडू नये आणि काँग्रेसचा परंपरागत मतदार सोबत राहील यासाठी देवरा यांना मेहनत घ्यावी लागणार आहे.

२०१४ मध्ये मिळालेली मते
अरविंद सावंत (शिवसेना)- 3,74,609
मिलिंद देवरा (काँग्रेस)- 2,46,045
बाळा नांदगावकर (मनसे)- 84,773
मीरा सन्याल (आप)- 40,298
नोटा- 9,573

दक्षिण मध्य मुंबई
युतीच्या घोषणा होऊन काही आठवडे उलटले तरी येथील पेच कायम होता. रामदास आठवले यांनी स्वत:साठी या जागेचा आग्रह धरला होता. शिवसेनेने ही मागणी फेटाळून लावली. मतदारसंघ सोडणार नाही आणि राहुल शेवाळेच आमचे उमेदवार असतील असे उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. त्यामुळे युतीतील संभ्रम संपला आहे. काँग्रेसकडून एकनाथ गायकवाड की भालचंद्र मुणगेकर ही नावे चर्चेत असली तर गायकवाडांना कौल मिळेल, अशी चिन्हे आहेत. धारावीसह मोठ्या प्रमाणावरील झोपडपट्टी, गरीब वस्त्यांमध्ये विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष कार्यरत आहेत. या स्थानिक नेत्यांचे स्वत:चे उपद्रवमुल्य आहे. तो सर्वच उमेदवारांना हाताळावा लागणार आहे. आघाडीने गायकवाड यांना उमेदवारी दिल्यास तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने पाचशे फुटांच्या घरांचे आश्वासन दिले आहे. त्याचा धारावी पट्टयात लाभ होऊ शकतो.

२०१४ मध्ये मिळालेली मते
राहुल शेवाळे (शिवसेना)- 3,81,008
एकनाथ गायकवाड (काँग्रेस)- 2,42,828
आदित्य शिरोडकर (मनसे)- 73,096
बी. सुंदर (आप)- 27,687
गणेश अय्यर (बसपा)- 14,762

उत्तर मुंबई
भाजपाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार हे नक्की झाले आहे. काँग्रेसचा उमेदवाराचा शोध मात्र अद्याप संपलेला नाही. संजय निरूपम यांनी शेजारच्या मतदारसंघात धाव घेतल्याने काँग्रेसची अडचण झाली आहे. लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतरच्या महापालिका निवडणुकीत भाजपाने उत्तर मुंबईवरील आपली पकड मजबूत केली आहे. मुंबईतील भाजपाचा हा परंपरागत मतदारसंघ आहे. मोदी लाटेत तो आणखी भक्कम झाला. एक खासदार, चार आमदार आणि २४ नगरसेवक अशी लोकप्रतिनिधींची तगडी फौज असलेल्या या मतदारसंघावरील भाजपाची पकड स्पष्ट करायला पुरेशी आहे. दहिसर, मागाठाणेसह विविध भागातील शिवसेनेची मते भाजपाकडे वळायला फारशी अडचण नाही. मुंबई काँग्रेसमधील दिग्गज नेते या मतदारसंघात यायला उत्सुक नाहीत. त्यामुळे विविध सेलिब्रिटींच्या नावाची सध्या तरी केवळ चर्चाच सुरू आहे.

२०१४ मध्ये मिळालेली मते
गोपाळ शेट्टी (भाजपा)- 6,64,004
संजय निरुपम (काँग्रेस)- 2,17,422
सतीश जैन (आप)- 32,364
नोटा- 8,758
कमलेश यादव (सपा)- 5,506

उत्तर पश्चिम मुंबई
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन किर्तीकर तब्बल १ लाख ८३ हजारांचे मताधिक्य घेत विजयी झाले. काँग्रेस उमेदवार गुरूदास कामत यांचा दांडगा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची तगडी फौजही मोदी लाटेला थोपवू शकली नाही. पाच वर्षांनंतर येथील समीकरणे पार उलटीपालटी झाली आहेत. गुरूदास कामतांच्या अकाली एक्झिटमुळे संजय निरूपम यांचा मार्ग मोकळा झाला आहे. दिल्लीतील निरूपमांचे वजन वाढले असले तरी कामत गटाची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील राजकीय आघाड्या आणि पक्ष एकप्रकारे समदुखी अवस्थेत आहेत. युतीतील तणावाच्या काळात किर्तीकरांनी स्थानिक भाजपा आमदारांविरोधात संघर्षाचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेण्याचे मोठे आव्हान किर्तीकरांसमोर असणार आहे. तर, तिकडे निरूपम यांना कामत गटाला जवळ करावे लागणार आहे. किमान या गटाचे उपद्रवमुल्य तरी ते कमी करू शकतात का, यावर या मतदारसंघातील राजकीय समीकरणे अवलंबून आहेत.

२०१४ मध्ये मिळालेली मते
गजानन कीर्तिकर (शिवसेना)- 4,64,820
गुरूदास कामत (काँग्रेस)- 2,81,792
महेश मांजरेकर (मनसे)- 66,088
मयांक गांधी (आप)- 51,860
नोटा- 11,009

उत्तर मध्य मुंबई
एकेकाळचा काँग्रेसचा हा बालेकिल्ला होता़ मोदी लाटेत येथे भाजपाच्या पूनम महाजन विजयी झाल्या. मतदारसंघातील उत्तर भारतीय आणि मुस्लिम समीकरण काँग्रेसच्या जमेची बाब होती. शिवाय, उच्चभ्रू वर्गात दिवंगत सुनिल दत्त यांचा प्रभावही होता. पुढे प्रिया दत्त यांनाही त्याचा लाभ मिळाला. मोदी लाटेत ही समीकरणे बदलून गेली. उत्तर भारतीय मतदार भाजपाकडे सरकला. पूनम महाजन पुन्हा एकदा रिंगणात आहेत. काँग्रेसच्या गोटात मात्र संभ्रम आणि संशयाचे वाातावरण आहे. गटबाजीमुळे दत्त यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे घोषित केले होते. त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न उच्चस्तरावरून झाले. त्यामुळे दत्त पुन्हा निवडणूक लढविणार असल्याचे समजते. मात्र, मधल्या काळात संघटनेकडे झालेल्या दुर्लक्षाचा त्यांना फटका बसू शकतो.

२०१४ मध्ये मिळालेली मते
पूनम महाजन (भाजपा)- 4,78,535
प्रिया दत्त (काँग्रेस)- 2,91,764
फिरोज पालखीवाला (आप)- 34,824
आनंद शिंदे (बसपा)- 10,128
आनंद शिंदे (सपा)- 9,873

उत्तर पूर्व मुंबई
भाजपाचे किरीट सोमय्या या मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत़ पक्ष नेतृत्त्वाची खप्पा मर्जी झाल्याने यंदा त्यांचे तिकीट कापले जाणार अशी चर्चा होती. स्वयंसेवी संस्था आणि ट्रस्टच्या माध्यमातून सोमय्या यांनी मोठे जाळे उभारले असले तरी मराठी अमराठी वादातील त्यांची भूमिका त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. आघाडीच्या जागावाटपात मुंबईतील ही एकमेव जागा राष्ट्रवादीकडे जाते. राष्ट्रवादीकडून संजय दिना पाटील यांना पुन्हा संधी मिळणार हे नक्की झाले आहे. मात्र, मधल्या काळात मनसेने ही जागा मागितली होती. मात्र, मनसेला आघाडीत घेण्यास काँग्रेसने साफ नकार दिला. त्यामुळे भाजपाविरूद्ध राष्ट्रवादी अशी लढत याठिकाणी पाहायला मिळणार आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या धामधुमीत प्रचार मराठी विरूद्ध अमराठी असा सरकला तर भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे भाषिक मुद्दे प्रचारात येणार नाहीत, राष्ट्रीय विषयांवर रोख राहील याची भाजपाला काळजी घ्यावी लागणार आहे.


२०१४ मध्ये मिळालेली मते
किरीट सोमय्या (भाजपा)- 5,25,285
संजय दिना पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)- 2,08,163
मेधा पाटकर (आप)- 76,451
मच्छिंद्र चाटे (बसपा)- 17,427
अविनाश डोळस (भारिप बहुजन महासंघ)- 8,833

२००९ सालातील आकडेवारी
उत्तर मुंबई
संजय निरूपम (काँग्रेस)- २,५५,१५७
राम नाईक (भाजपा)- २,४९,३७८

उत्तर पश्चिम मुंबई
गुरूदास कामत (काँग्रेस)- २,५३,८९९
गजानन किर्तीकर (शिवसेना)- २,१५,४८४

उत्तर पूर्व मुंबई
संजय दिना पाटील (राष्ट्रवादी)- २,१३,५०५
किरीट सोमय्या (भाजपा)- २,१०,५७२

उत्तर मध्य मुंबई
प्रिया दत्त (काँग्रेस)- ३,२२,०४०
महेश जेठमलानी (भाजपा)- १,४४,१६२

दक्षिण मध्य मुंबई
एकनाथ गायकवाड (काँग्रेस)- २,५७,५२३
सुरेश गंभीर (शिवसेना)- १,८१,८१७

दक्षिण मुंबई
मिलिंद देवरा (काँग्रेस)- २,७२,४११
बाळा नांदगावकर (मनसे)- १,६९,७९०

Web Title: Lok Sabha Election 2019: The Congress is all set to fight against the alliance in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.